आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिकता, परंपरेचा सांस्कृतिक गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनशैली तीही विकसित होऊ पाहणार्‍या शहरांमध्ये बदलताना एक सांस्कृतिक गोंधळ सोबत घेऊन येते. गेल्या वीस वर्षांमध्ये झालेले असे सांस्कृतिक गोंधळाचे बदल कसे आहेत, चांगले की वाईट हे अनुमान आता काढणे अवघड झाले आहे.

आधुनिकतेला आपल्याकडे स्वतंत्र परिमाण वा परिभाषा नाही. पाश्चात्त्यांकडून मेट्रो सिटीजमध्ये त्यांची संस्कृती झिरपायला गेल्या 20 वर्षांमध्ये दरवाजे खुले झाल्याने त्यांची जीवनशैली अनुसरायला लोकांना वेळ लागला नाही. त्यामुळे केवळ मातृभाषा येणे ही र्मयादा मानली जाऊ लागली. मातृभाषेबरोबर हिंदी, त्याहीपेक्षा इंग्रजी येणे ‘मस्ट’ होऊ लागले. हे नियम अर्थातच रोजच्या जगण्यात लिखित-अलिखित, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात भाषेच्या बाबतीत आले व त्यातून हिंग्लिश आणि मिंग्लिश भाषेची मिश्रता यायला लागली. हा बदल केवळ भाषेपुरताच मर्यादित राहिला नाही. तो रोजच्या घरातल्या व बाहेरच्या फॅशनमध्ये दिसायला लागला. जीन्सपासून प्लाजो-जेगिन्सपर्यंतचे बदल आपल्याकडे आले. पायघोळ पोलके जाऊन शॉर्ट स्कर्ट्सनी त्याची जागा घेतली. हाच बदल सौंदर्याच्या संकल्पनांमध्ये आज बघायला मिळतो.
खरे तर हे बदल पिरॅमिड इफेक्टमध्ये आपल्याकडे होतात. पाश्चात्त्यांची झलक मेट्रो सिटीज्मध्ये झिरपल्यानंतर त्यांचे अनुसरण विकसित होऊ पाहणारी शहरे करायला लागली. मेट्रोमधील मॉल संस्कृती, ब्रँड्स, सलुन्स, भाषेमधील मिर्शता छोट्या, विकसनशील शहरांमध्ये डोकवायला लागली. हा पिरॅमिड इफेक्ट आहे, असे आम्ही म्हणतो. वरकरणी हे सगळे बदल विकासदर्शक वाटतात. बहुतांश प्रमाणात ते आहेतही; पण परंपरांची घट्ट मुळे आपल्याकडे ज्या पिढीत रुजली आहेत ते या बदलांना आपल्या सोयीने घेतात. रोजच्या राहणीमानातील मुलीचे व मुलाचे कपड्यांपासून भाषेपर्यंतचे झालेले बदल त्यांचे पालक दोघांच्या बाबतीत भिन्न प्रकारे स्वीकारतात. अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका मराठी कुटुंबाशी माझी एकदा भेट झाली होती. बोलता बोलता संस्कारांचा विषय निघाला तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्ही आमच्या मुलाला घरात मराठी बोलायला लावतो; पण बाहेर त्याने अमेरिकेतच जन्मला व वाढला असल्याने त्यांच्याच संस्कृतीनुसार वागायची मुभा देतो. तो पार्टी एन्जॉय करतो, सगळं करतो. मुलीच्या बाबतीत हे सगळं पसंत करता का, तिला तेवढं स्वातंत्र्य देता का, असं मी विचारल्यावर ते म्हणाले, ‘छे छे, असं कसं, आपल्या भारतीय जीवनशैलीत, संस्कृतीत ते योग्य वाटत नाही.’ थोडक्यात या उदाहरणाचा उल्लेख करण्याचा उद्देश एवढाच की, बदलत्या जीवनशैलीचा आपण पूर्णत: स्वीकारही केलेला नाही व परंपरांनाही पूर्णत: सोडलेले नाही. दोहोंमध्ये समन्वय साधणे ही अत्यंत नाजूक आणि इनडिव्हिज्युअल अशी बाब बनली आहे. हा समन्वय एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबापर्यंत बदल झालेल्या जीवनशैलीमध्ये साधणे व्यक्तिसापेक्ष बनले आहे. त्यात इंटरनेटसारख्या जगभरातील अनेक माहितीची दालने उपलब्ध करून देणार्‍या माध्यमाने मोठी भर टाकली आहे. त्यामुळे जीवनशैली तीही विकसित होऊ पाहणार्‍या शहरांमध्ये बदलताना एक सांस्कृतिक गोंधळ सोबत घेऊन येते. गेल्या वीस वर्षांमध्ये झालेले असे सांस्कृतिक गोंधळासहचे बदल कसे आहेत, चांगले की वाईट आहेत, असे अनुमानच आता काढणे अवघड झाले आहे. काय पाहायचे, काय अनुसरायचे यावर आता लोकांची जीवनशैली नियंत्रण ठेवू शकत नाही.