आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhaskar Special : Military Not Right Direction, Police Misguided

भास्कर स्पेशल : लष्कर गाफील, पोलिसांची फितुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लष्कराला गाफील ठेवले आमच्याकडे भरपूर दारूगोळा असल्याचे भासवले गेले
जहांगीर अहमद बट हजरतबलमध्ये तैनात दहशतवाद्याचा जबाब
(बट यांचा सध्या श्रीनगरमध्ये कार्पेट व्यवसाय आहे)
जवळपास 32 दिवस आम्ही हजरतबलमध्ये होतो. मी ऑपरेशन बालाकोटमध्ये दहशतवादी संघटनेसाठी काम करत होतो. माझे टोपणनाव अली होते. माझ्यासोबत आणखी 17 मुजाहिद दर्ग्यामध्ये होते. आमचे लोक बाहेरचा चबुतरा व मिनारवर पहारा देत होते. गुरुवारचा दिवस होता. रात्री साडेदहा वाजता सुरक्षादलांनी दर्ग्याला वेढा घातला. आमच्याकडे खूपच कमी बंदुका होत्या. त्या आधारे आम्ही त्यांचा मुकाबला करू शकत नव्हतो; परंतु आम्ही फोनवर लष्कराची दिशाभूल करत राहिलो. ‘एक वर्षापर्यंत तुमच्याशी मुकाबला करू शकू इतका दारूगोळा आमच्याकडे आहे,’ असे आम्ही त्यांना भासवत राहिलो.
आम्ही सांगितले, ‘लष्कराने मध्ये पाऊल ठेवले, तर आम्ही फायरिंग करू. आयईडी पेरल्याचेही नाटक केले.’ दानपेटी झाकून त्या ठिकाणी आयईडी पेरल्याचे भासवले. तीन बंदुका मिनारवर ठेवल्या. बाहेर 1700 जवान होते. आम्ही अट अशी ठेवली की, दोन पाकिस्तानींना सीमेपलीकडे सोडून या, तरच आम्ही दर्ग्यातून बाहेर पडू. जवानांनी जुबेर व शाहीद यांना उडीमार्गे सीमेपलीकडे नेऊन सोडले. त्यानंतर आम्ही सहा-सात दिवस नागरिकांना टप्प्याटप्प्याने बाहेर सोडत गेलो. आम्ही सगळ्यात शेवटी बाहेर पडलो व घरी गेलो. काही निकामी झालेली शस्त्रे आम्ही सरेंडर करून टाकली व बहुतेक शस्त्रे तेथेच दडवली. पैकी अनेक शस्त्रे नंतर आम्हीच काढून नेली.
दहशतवाद्यांना आयबीने फोन दिला लष्कराला खबरबातच नव्हती
वजाहत हबीबुल्लाह
दहशतवाद्यांशी चर्चा करणारे अधिकारी (काश्मीरचे तत्कालीन विभागीय आयुक्त)
सरकारने दहशतवाद्यांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. सरकारला अशी भीती वाटत होती की, दहशतवाद्यांनी येथे ठेवलेल्या हजरत मोहंमद यांच्या दाढीच्या पवित्र केसाला नुकसान पोहोचवले, तर राज्यात दंगली उसळतील. 1963 मध्ये असे झालेही होते. पवित्र अवशेष गायब झाल्याची अफवा पसरल्याने झालेल्या दंगलीत 32 लोक मारले गेले होते. पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मनात 1984 चे सुवर्णमंदिर आणि 1992 च्या बाबरी मशीद प्रकरणामुळे तशी जास्त भीती बसली होती. चार राज्यांत निवडणुकाही होणार होत्या. त्यामुळे मला स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, काहीही करा, परंतु दर्ग्याचे नुकसान होऊ देऊ नका. 23 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 1993 या कालावधीत मी दररोज दर्ग्यात जात असे. दहशतवाद्यांशी चर्चा करत असे. एका कॉन्स्टेबलने सांगितले की, ‘दर्ग्यात 40 शस्त्रसज्ज दहशतवादी आहेत. प्रत्यक्षात तो दहशतवाद्यांना जाऊन मिळाला होता. त्याने जाणूनबूजून दहशतवाद्यांची संख्या जास्त असल्याचे सांगितले. जेणेकरून लष्कराने चढाई करावी आणि दर्ग्याचे नुकसान व्हावे.’
आयबी आणि लष्कराच्या गुप्तचरांमध्ये समन्वय नव्हता. आयबीने त्यांना बोलणी करण्यासाठी दर्ग्यामध्ये टेलिफोन सुरू ठेवला होता; परंतु दहशतवादी त्याद्वारे सीमेपलीकडे बसलेल्या म्होरक्यांशी बोलत होते. देश-विदेशातील मीडियाशीही ते बोलत असत; परंतु त्याची माहिती लष्करी गुप्तचरांना नव्हती.
आत्मसमर्पणाच्या वेळेची बंदूक नंतर दहशतवाद्यांजवळ सापडली
मोहंमद फहीम
दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण करणारे अधिकारी
(तत्कालीन उपअधीक्षक, आज डीएसपी आहेत)
मी त्या वेळी नियंत्रण कक्षात रात्र पाळी इन्चार्ज म्हणून तैनात होतो. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दर्ग्याबाहेर बागेत नूर खान नावाच्या दहशतवाद्याने त्याची शस्त्रे, बंदूक माझ्या हाती सोपवली. मी तशी रायफल प्रथमच बघत होतो. प्रत्येक दहशतवाद्याने एक-एक शस्त्र खाली ठेवले. 12 एके-47 रायफली, 1 स्नॅपर रायफल व 1 रॉकेट लाँचर सोपवण्यात आले.
दर्ग्यात पोलिस व लष्कराला मिळून शस्त्रे किंवा दारूगोळा काहीच सापडले नाही.
पवित्र अवशेष सुरक्षित होते; परंतु या घटनेनंतर खो-यात दहशतवाद्यांनी मूळ धरले. एक महिन्यानंतर दहशतवादी दर्ग्यात परत येऊ लागले. त्यांच्याकडे मी तीच स्नॅपर रायफल पाहिली जी की त्यांनी समर्पण केली होती. म्हणजे आमचे पोलिस अधिकारीही दहशतवाद्यांना मिळाले होते. ज्यांनी समर्पण केलेली शस्त्रे पुन्हा त्यांना सोपवली होती. नंतर असेही समजले की, दहशतवाद्यांनी बहुतांश शस्त्रे दर्ग्यातच दडवून ठेवली होती. आम्ही
ती शोधू शकलो नाही. प्रकरण शांत झाले तेव्हा तेथे जाऊन त्यांनी त्यांची शस्त्रे परत मिळवली.
दाखवण्यासाठी नंतर हजरतबलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. 1993 मध्ये तेथे 18 पोलिस तैनात होते. घटनेनंतर ही संख्या 110 वर नेण्यात आली.