आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

बाळासाहेब ठाकरे म्‍हणजे, आजच्या युगातली एक दंतकथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1985 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने मोठेच यश मिळवले आणि त्या वर्षीच्या वाढदिवसाचा अंक काढून सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘मार्मिक’चे प्रकाशन थांबवण्यात आले. तेव्हा पंढरीनाथ सावंत आणि मी तसे बेकारच होतो. नव्या स्वरूपात ‘मार्मिक’ सुरू करायचे घाटत होते. त्या निमित्ताने सावंत मला घेऊन प्रमोद नवलकरांच्या घरी गेला. तिथे थोडी चर्चा झाली. मग दोन-चार दिवसांतच आणखी एक-दोन बैठका झाल्या. त्यात या नव्या प्रयोगाला मदत करायचे मी मान्य केले होते. पुढे एक दिवस ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायचे आमंत्रण मिळाले. तिथे प्राथमिक चर्चा झाल्यावर पुन्हा एके दिवशी अचानक मला नवलकरांनी बाळासाहेबांच्या भेटीला नेले. तिथे मीच कार्यकारी संपादक म्हणून काम बघावे, असे सुचवण्यात आले. मी थक्क झालो. तेव्हा बाळासाहेबांनी एक खुलासा केला. मी डाव्या विचारांचा आहे म्हणून मला ‘मार्मिक’पासून दूर ठेवावे, असे सांगून त्यांना काही निकटवर्तीयांनी सावध करण्याचा प्रयत्न केला होता. पण म्हणूनच मी अधिक तटस्थपणे शिवसेनेची भूमिका समजून त्यांच्या मुखपत्रात मांडू शकेन, असे सांगून त्यांनी माझ्यावरच ती जबाबदारी टाकायचा हट्ट धरला होता. तिथेच हे प्रकरण थांबले नाही. नव्या स्वरूपात ‘मार्मिक’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला, तेव्हा ते अचानक सेना भवनातल्या ‘मार्मिक’ कार्यालयात येऊन थडकले आणि माझे त्यांनी अगत्याने अभिनंदनही केले होते. मी उठून त्यांना खुर्ची देऊ केली, तर संपादकाच्या खुर्चीत कधीच दुस-या कोणाला बसू देऊ नको, ती मानाची जागा आहे, असाही सल्ला दिला. अधिक एक कानमंत्रही दिला, ‘इथे तू संपादक आहेस आणि तुझा संपादकीय अधिकार अंतिम आहे हे विसरू नकोस.’ आणि तो शब्द त्यांनी पाळला. आज सत्तावीस वर्षांनी एक गोष्ट सांगेन, अनेक वृत्तपत्रे नोकरीच्या निमित्ताने फिरलो, पण जेवढे संपादकीय स्वातंत्र्य मला ‘मार्मिक’मध्ये मिळाले; तेवढे कुठल्याच व्यावसायिक वृत्तपत्रातही मिळाले नव्हते. जिथे शिवसेनेची भूमिका वा डावपेच चुकले, तेव्हा त्यावरही नेमकी टीका करायचे स्वातंत्र्य मी घेतले होते आणि शिवसेनाप्रमुख असूनही बाळासाहेबांनी माझी बाजू त्या प्रत्येक वेळी घेतली.

‘मार्मिक’मध्ये जाण्यापूर्वी बाळासाहेबांविषयी असलेल्या समजुतीचा त्या तीन वर्षांत पुरता भ्रमनिरास झाला. या माणसाबद्दल अन्य बहुतांशी पत्रकार व राजकीय अभ्यासकांच्या जशा समजुती आहेत, तसेच माझेही होते. पण प्रत्यक्षात त्यांच्या सोबत काम करताना बाळासाहेब ठाकरे हे किती साधे व सामान्य माणूस आहेत, त्याची जाणीव होत गेली. त्यांना जनमानसाची नस कळते, असे नेहमी बोलले जाते. पण ती त्यांना का कळते, याचा कधीच शोध घेतला गेला नाही. त्याचे रहस्य त्यांच्या सहवासात उलगडले. परिस्थिती व घटनाक्रमाने इतक्या उंचावर नेऊन ठेवलेल्या या माणसामध्ये एक सामान्य माणूस दडलेला होता आणि तो रस्त्यावरच्या सामान्य माणसाप्रमाणेच विचार करणारा होता. म्हणूनच ‘बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे’ असे विधान त्यांनी क्षणार्धात केले होते. विचारपूर्वक समीकरणे मांडून बोलणे वा भूमिका बनवणे; हा त्यांचा स्वभावच नव्हता. जेव्हा जे पटले ते घेतले आणि चुकले तर बदलले. मग त्यासाठी त्यांना कधी सारवासारव करावीशी वाटली नाही. यामुळे मते जातील वा त्यामुळे मिळतील, असे हिशोब त्यांच्या डोक्यात कधीच नसायचे. मी बरोबर आहे ते बोलतो आणि मी बोलतो म्हणजेच बरोबर आहे. मग लोकांना पटत नसेल तर त्यांनी शिवसेनेला मते देऊ नयेत; असा हटवाद त्यांच्यात होता. मात्र पत्रकार व अभ्यासकांना हा माणूस कधीच कळू शकला नाही, उमगला नाही. त्यांच्याविषयी माध्यमातून वा ऐकीव गोष्टीतून जे मत अशा पत्रकार अभ्यासकांनी करून घेतले होते, त्यानुसारच त्यांचे विश्लेषण माध्यमे करत राहिली. त्यांना कधी खरा बाळासाहेब ठाकरे समजून घ्यावासा वाटलाच नाही. त्यामुळेच त्यांची कधी चूक झाली तर त्यांच्यावर टीका कमी व्हायची. पण गैरसमजातून चुकीची व खोटी टीकाच अधिक झाली. ‘मार्मिक’ सोडल्यावर युतीची सत्ता असताना दै. ‘आपला वार्ताहर’मध्ये मी एकदा त्यांच्यासह सरकारी धोरणाचा समाचार घेतला होता, तेव्हा त्यांनी फोन करून रागावलास का, म्हणून विचारले होते. कारण मी वगळता अन्य नेहमीच्या टीकाकारांनी त्या संबंधाने अवाक्षरही लिहिले नव्हते. म्हणूनच मी म्हणालो, ‘चुकलो असेन तर चूक दाखवा, मी माफी मागायला येतो.’ तर साहेब म्हणाले, ‘चुकला नाहीस, पण तूच राहिला होतास काय माझ्यावर टीका करायला?’ त्यावर माझे उत्तर सोपे होते. ‘तुमची खरंच चूक झाली आहे, पण ती कोणी दाखवणार नाही; म्हणून दाखवली.’ तर या माणसाने मला शाब्बासकी दिली होती. असा हा दिलखुलास माणूस होता. ‘मार्मिक’मध्ये असताना एकदा नेत्यांच्या बैठकीत शरद जोशी यांच्याबद्दल सेनेने मौन धारण करायचे धोरण ठरवले होते. पण मी त्यांच्यावर टीका करणारा लेख ‘मार्मिक’मध्ये लिहिला. तेव्हा सेनेचे नेते अस्वस्थ झाले होते. पण बाळासाहेबांना लेख आवडला आणि त्यांनी धोरणापेक्षा माझ्या लेखाचे नेत्यांसमोर समर्थन केले होते. दुर्दैव इतकेच, की त्यांचा पिंड लेखकाचा नव्हता. व्यंगचित्र काढून कमीत कमी शब्दात त्याला बोच-या ओळी लिहाव्यात; अशी त्यांची भाषा होती. ती सामान्य माणसाच्या मनाला जाऊन भिडणारी असली तरी शब्दच्छल करणा-या माध्यमे व जाणकारांना कधीच कळली नाही. त्यामुळे असेल बाळासाहेब ठाकरे नावाची जी भ्रामक कल्पना या अभिजन विचारवंतांच्या मनात होती, त्यावर तुटून पडताना त्यांना ठाकरे कधी रोखता आला नाही, की ओळखता आला नाही. मात्र त्यांच्याच निरर्थक टीकास्त्राने या माणसाविषयी जेवढे कुतूहल निर्माण केले, त्यातून बाळासाहेबांना अधिकच मोठे केले व त्यांच्याविषयीच्या दंतकथा तयार झाल्या. आणि जेवढी ती सर्वसामान्यांसाठी दंतकथा होती, तेवढीच ती माध्यमे व पत्रकारांसाठी एक दंतकथाच राहिली. त्यांच्यावर जिवापाड प्रेम केलेल्या, श्रद्धा ठेवणा-या व कसलीही अपेक्षा न बाळगता त्यांचा कार्यकर्ता झालेल्या शिवसैनिकाने मात्र त्यांना नेमके ओळखले होते. तेच त्यांच्या शक्तीचे, सामर्थ्याचे व लोकप्रियतेचे रहस्य होते. ज्यांना ते समजून घ्यावेसे वाटले नाही त्यांच्यासाठी बाळासाहेब ही कायमच एक दंतकथा बनून राहील. व्यक्तिगत गोष्टी खूप सांगता येतील, पण त्या समजून घ्यायच्या तर आधी या दंतकथेचे तात्पर्य लक्षात घ्यावे लागेल. कारण बाळासाहेब ठाकरे ही एका सामान्य माणसाच्या नेता होण्याची व मोठा नेता होऊनही सामान्य माणूस राहण्याची; आजच्या युगातली दंतकथाच आहे.