आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलवर पर्यटन, फ्रान्स ते औरंगाबाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : दोघांनी भंगारातून या सायकली तयार केल्या. दुरुस्तीही स्वत:च करतात.)

औरंगाबाद - सतत कामात राहिले की माणसाला उबग येतो. मग मन रमवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याची मनस्वी इच्छा होते. याच इच्छेतून दोन फ्रेंच संशोधकांनी आगळावेगळा मार्ग निवडला. या पर्यावरणप्रेमी जोडगोळीने सायकलने जगभर पर्यटन करण्याचे ठरवले आणि फ्रान्स ते भारत अशी सायकलवारी करत ते गेल्या गुरुवारी औरंगाबादेत दाखल झाले. डॉ. योएल गिबोडॉट आणि डॉ. मायीआ ओरसी अशी या संशोधकांची नावे आहेत.

औरंगाबादेतील दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून हे दोघे औरंगाबादेत आले. ट्रस्टचे संस्थापक सचिव किरॉन वैष्णव यांनी त्यांचा पाहूणचार केला. योएलचा विपश्यनावर, तर मायीआचा पंचकर्मावर विश्वास आहे. दोघांनी केरळात याचे प्रशिक्षणही घेतले. जुलै अखेरीस ते जिनेव्हाहून सायकल प्रवासाला निघाले होते.

सायकलीही रिसायकल्ड : योएल आणि मायीआ दोघे विज्ञान शाखेचे पदवीधर असून पर्यावरणाबाबत त्यांना प्रचंड आस्था आहे. फ्रान्समध्ये त्यांचा ४० जणांचा ग्रुप आहे. यातील सर्वच जण रिसायकल्ड वस्तूंचा वापर करण्याचा प्रचार करतात. टाकाऊ वस्तूंतून त्यांनी दागिने, कपडे, शोभेच्या वस्तू एवढेच नव्हे, तर जुनाट इमारतींचे रिनोव्हेशन करून तेथे सहा कल्चरल हॉल उभे केले आहेत. भटकंतीसाठी ते वापरत असलेल्या सायकलीही भंगारातून तयार करण्यात आल्या आहेत.

असा झाला प्रवास
फ्रान्स, स्वीझरलैंड, उत्तर इटाली, स्लोवेनीया, कर्शिया, बोस्नीया, मोंटेनेरो, मॅकडोनीया, उत्तर ग्रीस, टर्की, इराण, यूएई, ओमान एवढा प्रवास केल्यावर येथून पाकिस्तान प्रवास धोकादायक होता. म्हणून आेमान ते कोचीन हा प्रवास त्यांनी विमानाने केला. तेथून केरळ, मूनसर हिल स्टेशन, पाँडेचरी असा प्रवास सायकलने केला. तेथून पुणे आणि गुरुवारी सकाळी औरंगाबाद गाठले. आठवडाभर ते वेरूळ, अजिंठा आणि नजिकचे पर्यटन स्थळे पाहतील. नंतर रेल्वेने वाराणसी, कुलू मनाली आणि मग परतीचा प्रवास सुरू करतील.

दोघे पीएचडी
योएल गिबोडॉट हा जिनेव्हाजवळील लॉन्स ली सॉनीयर या लहानशा गावात राहतो. त्याने भौतिकशास्त्रात बीएस्सी केले असून तीन वर्षांपूर्वी पार्टीकल फिजीक्समध्ये पीएचडी केली आहे.

मायीआ ओरसी ही अर्जेंटिनाजवळील ब्युअनोज एअरेज येथील आहे. मायीआने फिजिक्समध्ये बीएस्सी केले असून अ‍ॅस्ट्रॉनॉमीमध्ये पीएचडी पदवी संपादन केली आहे. या दोघांनाही सततच्या व्यग्रतेचा अक्षरश: उबग आल्याने त्यांनी पर्यटनासाठी हा मार्ग निवडला.

वॉर्म शॉवरची मदत
जगभरात सायकलिंग करणार्‍यांची ‘वॉर्म शॉवर’ ही संघटना आहे. त्यांची याच नावाची एक वेबसाईटही आहे. संघटनेचे प्रतिनिधी एखादा सायकलस्वार आपल्या शहरात आला तर त्यास राहण्याची, सायकल सर्विसींगची सोय करून देतात. पुण्यात साठ वर्षांच्या सौ. पाठक याचे काम बघतात. औरंगाबादेत येण्यापूर्वी त्यांनी पाठक यांचा पाहूणचार घेतला होता.

पूर्वी सायकलच तर होती
५०-६० वर्षांपूर्वी सायकल हेच प्रवासाचे साधन होते. आज वाहनांतून किती प्रदूषण होते याचा कोणीच विचार करत नाही. हे प्रदूषण टाळण्यासाठी सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे. -डॉ. योएल गिबोडॉट, फ्रेंच प्रवासी संशोधक

आम्ही ट्रॅफीकचा एक भाग
सायकलकडे दुर्लक्ष करणे किंवा कुत्सितपणे पाहणे चूकीचे आहे. फ्रान्समध्ये आम्ही अचानक समूहात सायकल चालवत निघतो आणि रस्ते ब्लॉक करतो. सायकलस्वारांचे अस्तित्व दाखवून द्यायचा प्रयत्न करतो. -डॉ. मायीआ ओरसी, प्रवासी संशोधक

सायकलच का?
निसर्गाशी एकरूप होण्यासाठी म्हणूनच सायकल सर्वात चांगले वाहन असल्याचे हे दोघे संशोधक सांगतात. त्यांच्या सायकलींवर पाण्याची बाटली, लाइट, घंटी, बॅगा ठेवण्यासाठी कॅरेज, टेंट आणि नो हॉर्नचा संदेश देणारा बोर्ड आहे. भारत, इराणमध्ये हॉर्न वाजवण्याची पद्धत आहे. युरोप, अमेरिका व युक्रेनमध्ये हे शिवी दिल्यासारखे मानले जाते, असे योएल म्हणाला.

असा प्रवास
- ८ महिन्यांत १२ हजार किलोमीटर प्रवास
- डिसेंबर अखेरीस नाताळ साजरा करण्यासाठी ते मायदेशी परतणार.
- प्रवासात पर्यावरण संवर्धन व टाकाऊतून टिकाऊ संदेश.
- सायकलीही भंगारातूनच तयार करण्यात आल्या.