आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बड्या’ पक्षांतील कुरघोडीने भारिप-बमसंला ‘लॉटरी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दलितांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने राज्यात दलित चळवळीला चालना मिळाली. आता ही रिपब्लिकन चळवळ गटातटाच्या राजकारणात विभागली गेली आहे. कुठलाही गट स्वबळावर निर्विवाद यश संपादन करू शकलेला नाही. यासंदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बमसंला मिळालेल्या यशामुळे राज्यभर ‘अकोला पॅटर्न’ची चर्चा होते. मात्र, अकोला जिल्ह्यातील ‘बड्या’ पक्षांतील अंतर्गत ‘कुरघोडीमुळे’च भारिप-बहुजन महासंघाला यश संपादन करता आले आहे.
सर्वांना न्याय, समता याचा लाभ मिळावा, प्रबळ संघटनांद्वारे दुर्लक्षित राहिलेल्या जातींना लोकशाहीची सर्वच द्वारे उघडी होऊन त्यांचा विकास साधावा, या उद्देशाने अनेक पक्ष व गट निर्माण झाले आहेत. भारिप-बहुजन महासंघ (अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर), भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई गट), दलित पँथर, पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) आदींसह एकूण 44 रिपब्लिकन चळवळींचे गट किंवा पक्ष राज्यात अस्तित्वात आहेत. या जाती समूहातील नेत्यांचा सौहार्द आणि समन्वयाचा अभाव असल्याने या पक्ष-संघटनांचे आणि गटांचे अक्षरश: तुकडे पडले आहेत. आता दिसणा-या संघटना व पक्ष यांची जनमानसावरील प्राबल्य स्थिती काय? हा एक संशोधनाचा विषय आहे. स्वबळावर निवडून येण्याची ताकद किंवा संख्याबळ नसल्याने धर्मनिरपेक्ष पक्षांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या ठिकाणी आपली उपेक्षा होत असल्याचे कारण पुढे करून काही नेत्यांनी स्वबळावर, तर रामदास आठवले यांनी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा बाजूला करून जो पक्ष आपणास साथ देईल, त्या पक्षाची साथ घेतली. आता रामदास आठवलेंनी भाजप-सेना युतीसोबत घरोबा केला. राजकीय पत असल्याने या नेत्यांची स्वत:ची व्यवस्थित घडी बसलेली आहे. त्यातच आपल्या पक्षालाही यश मिळाल्यास दुग्धशर्करा योग ठरू शकतो.
भारिप-बहुजन महासंघ किंवा रिपाइंच्या कुठल्याही गटाला यशासाठी धडपड करावी लागली आहे. एखाद्या व्यक्तीला लॉटरी लागावी आणि त्याचे भाग्य फळफळावे, असे काहीसे भारिप-बमसंसोबत झाले. अकोला जिल्ह्यात इतर पक्षांतील कुरघोडीमुळे भारिप-बहुजन महासंघाच्या पदरी यश पडले. भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याभोवती आंबेडकर घराण्याचे वलय आहे. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारिप-बहुजन महासंघाला लाभ होतोच. शिवाय अकोला जिल्ह्यात दलित मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे भारिप-बमसंने अकोला जिल्ह्यात पाय रोवले. सन 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारिपला दोन जागा मिळाल्या. त्याचा अभ्यास केला, तर सत्य उघड होते ते धक्कादायक म्हणता येईल. इतर पक्षांतील अंतर्गत कलह आणि मतांमधील प्रचंड फूट भारिप-बमसंच्या पदरात विजयाचे माप टाकून गेली. तत्कालीन बोरगाव मंजू व आताच्या अकोला पूर्व मतदारसंघात भारिप-बमसंचे आमदार हरिदास भदे यांनी सन 2009 मध्ये नशिबाच्या साथीने दुस-यांदा विजय संपादन केला. या मतदारसंघात सन 2004 व सन 2009 च्या दोन्ही निवडणुकांमध्ये विजय मालोकार विरुद्ध शिवसेना अशा लढतीत हरिदास भदेंची सीट निघून गेली. या ठिकाणी विजय मालोकार आणि शिवसेना सोबत राहिली असती, तर भारिप-बमसंला विजय मिळवणे शक्य झाले नसते. भारिप-बमसंच्या ताब्यात असलेल्या बाळापूर मतदारसंघातही हाच प्रकार घडला. भाजपकडील मतदारसंघ आपल्याकडे ओढण्यासाठी काँग्रेस व भारिपमध्ये चढाओढ लागली होती. त्यातच भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचा फटका कुणबी समाजाचे नेते नारायणराव गव्हाणकर यांना बसला. नारायणराव गव्हाणकरांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपमधीलच एका नेत्याने डमी उमेदवाराला उभे केले होते, त्याचाच फटका गव्हाणकरांना बसला. काँग्रेसमध्येही हेच घडले. पहिले तिकिटासाठी दोन गटातओढाताण झाली. एका गटाने तिकीट मिळवून आपल्या गटाचे वर्चस्व सिद्ध केले, तर दुस-या गटाने ती सीट पाडून आपल्या गटाचा मतदारसंघात कसा दबदबा आहे, हे दाखवून दिले. याचा फायदा भारिप समर्थित अपक्ष उमेदवार बळीराम सिरस्कार यांना झाला. त्यामुळेच भारिप-बमसंला स्वबळावर अकोला जिल्ह्यातून दोन आमदार निवडून आणण्यात यश आले. अकोला जिल्ह्यात मोठ्या पक्षातील अंतर्गत राजकारणाचा मुद्दाच भारिप-बमसंच्या पथ्यावर पडला आहे.
मागण्या, समस्या सोडवण्यासाठी स्थापन झालेले पक्ष सत्तेच्या लालसेपोटी काहीही करण्याची तयारी ठेवत आहेत. कुठलाही पक्ष आपले प्राबल्य सिद्ध करू शकलेला नाही. निवडणूक जिंकण्यासाठी आघाडीची आवश्यकता असते, हे स्पष्टपणे दिसून आले आहे. मतदारसंघाचा कानोसा घेऊन तिकीटवाटप झाल्यास बंडखोरी टळू शकेल. शिवाय पक्षनिष्ठा जपणा-या कार्यकर्त्यांनाही न्याय देता येईल.