आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि ती सोडून गेली, घरटे मला सोपवून (दिव्य मराठी ब्लॉग)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी मी घर बदलले. कुटुंब पुण्याला शिफ्ट केले असल्याने आता जरा लहान घरात राहायला आलो. सामान लावले. आवरासावर केली... माझे नवीन घर... दोन-एक दिवस जराही करमले नाही. पुस्तकांमध्ये मन रमवायचा प्रयत्न केला. परिसर निरिक्षण केले. तेव्हा मला आढळून आले, की बाथरुमच्या खिडकीत दोन इवलीशी अंडी आहेत. त्यावर पक्षिणीही होती. सुरवातीला मी तेथे गेल्यावर ती जरा भेदरुन बघायची. तिच्या डोळ्यांत मला भीती स्पष्ट दिसायची. मी जवळ गेलो तर उडून जायची. अंडी मागे सोडून... रात्री 12 वाजता जरी मी तेथे गेलो तरी ती जागी राहायची. तिचे डोळे सताड उघडे. कदाचित तिच्या मनात भीती बसली असावी. मी अंड्यांना नुकसान पोहोचवेल किंवा तिला पकडेल असे विचार तिच्या मनात असावेत.
पण एक मात्र नक्की मी येथे राहायला आलो तेव्हापासून ती प्रचंड अस्वस्थ होती. तिच्या प्रायव्हसीत मी नकळत एन्ट्री केली होती. तिच्या नव्या घरात घुसखोरी केली होती. असा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर लक्ष ठेवण्याचा माझा आणि पक्षिणीचा पाठशिवणीचा खेळ सुरु होता. मी अंडी बघण्याचा जवळपास दररोज प्रयत्न करीत होतो. मजा वाटायची. पिले बाहेर आलीत का हे मला दररोज जाणून घ्यायचे होते. मी त्यांची जणू वाट बघत होतो. पण वाटायचे, आता या अंड्यांमुळे मला खिडकी उघडता येत नाही. उद्या अंड्यांमधून पिले बाहेर आल्यावर चांगलाच गोंधळ घालतील. सर्वत्र घाण करतील. पण तरी मी स्टॅंडबायची भूमिका घेतली. बघुयात काय होतंय ते... अशा प्रकारे माझा बघण्याचा आणि तिच्या भाषेत सांगायचे तर तिचा अंडी वाचवण्याचा खेळ सुरु होता. पण हा खेळ काल अचानक खंडित झाला...
काल मी माझ्या नवीन घराचे फोटो पुण्यात राहायला गेलेल्या कुटुंबाला पाठवले. यावेळी पक्षीण आणि अंडींचाही फोटो काढण्याचा मोह झाला. माझ्याकडे येथे कॅमेरा नाही. मी मोबाईल घेऊन सरसावलो. पक्षीण अंड्यावर बसली होती. मला तिचाही फोटो काढायला होता. पण माझ्या हातातील मोबाईल बघून ती उडून गेली. मी अंड्यांचे फोटो काढले. ती कुठे गेली असेल याचा जरा शोध घेतला. तर समोरच्या घराच्या गच्चीवर तिच्याच प्रकारचे काही पक्षी बसले होते. त्यात तिही होती. मला वाटले की काही वेळात ती परत येईल...
मी ऑफिसला आलो. पण ती परत आली असेल ना, अशी रुखरुख माझ्या मनाला लागलेली होती. त्यामुळे घरी गेल्याबरोबर मी पहिले बाथरुममध्ये गेलो. घरट्याच्या दिशेने हळूच पावले टाकली. बघितले तर घरट्यात केवळ अंडी होती. पक्षीण दिसत नव्हती. माझ्या मनात अनामिक विचारांचे वादळ आले. ती कुठे गेली असेल. अंड्यांना वाऱ्यावर सोडून. परत येणार ना. की कायमची निघून गेलीये... मी अनेकदा बाथरुममध्ये जाऊन बघितले. अगदी रात्री 12 वाजताही. पण ती कुठेच नव्हती. अंडी अगदी अनाथ दिसत होती. जणू आईविना बाळ. आता माझ्या मनात विचारांनी थैमान माजले. कुठे गेली असेल ती... मी एवढा काय गुन्हा केला...
कदाचित मी अंड्यांना नुकसान पोहोचविले असेल असा ग्रह तिने केला असावा. किंवा समोरच्या घराच्या गच्चीवर आलेल्या सहकाऱ्यांनी तिला सांगितले असावे, की तुझी अंडी आता नुकसानग्रस्त झाली असतील. किंवा होतील. मानवाच्या हातून काही सुटत नाही. एकंदर मानवाबद्दल असलेले अविश्वासाचे वातावरण माझ्याबाबतही तयार झाले असावे.
पण ती मात्र गेली. घरटे एकटे सोडून. अंडीही सोडून. आता मला आणि अंड्यांतील त्या कोवळ्या जिवांना वाट आहे तर त्या पक्षीणीची... ये गं बाई आता... चिमुकले वाट बघत आहेत...
vijaylad007@gmail.com