आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कबुतरांशी कट्टी म्हणजे निसर्गाशी बट्टीच समजा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच काय, पण जगातल्या कुठल्याही मोठ्या शहरातील कबुतरे ही केवळ माणसाने त्याचे नकटे नाक खुपसल्यामुळेच एवढी वाढली आहेत. कबुतरे शाकाहारी आहेत म्हणून त्यांना खायला घातलं जातं. फक्त कबुतरेच नाही, तर जगातल्या कोणत्याही रानटी पशुपक्ष्यांना खायला घालणे पूर्णपणे चूक आणि अशास्त्रीय आहे. गेली कित्येक दशके आपल्या समाजातील हजारो माणसे निसर्गसंवर्धनाचा एकमेव मार्ग म्हणजे पशुपक्ष्यांना खायला घालणे, या गैरसमजुतीतून अक्षम्य चुका करत आली आहेत. हा टिपिकल मानवकेंद्रित विचार आहे. वास्तविक ज्या लोकांच्या धर्मात भूतदयेचा विचार सांगून त्याप्रमाणे कृती करण्यास प्रोत्साहन दिले गेले आहे, अशा लोकांच्या बैठका घेऊन त्यांच्या भूतदयेला शास्त्रीय वळण लावण्याची गरज आहे.


निसर्गाने पक्ष्यांना जन्माला घालताना चोच दिलेली असते, चा-याचीही सोय केलेली असते. त्यांना जर नैसर्गिक अधिवासात अन्न कमी पडायला लागले तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या विणीवर होतो. वीण घटते. याउलट अन्नब्रह्म कृपावंत असेल तर एरवी चार अंडी घालणारे पक्षी सहा किंवा आठ अंडीसुद्धा घालतात. लोकसंख्या चक्राच्या आ-या कशा फिरतात, हे एखाद्या नैसर्गिक अधिवासाची सद्य:स्थिती कशी आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे, यावर अवलंबून असतं. लोकसंख्या नियंत्रणाची सर्व सूत्रे निसर्ग स्वत:कडे ठेवतो. असे असताना कोणत्याही जिवाला खायला घालणे म्हणजे शुद्ध (शाकाहारी!) मूर्खपणा आहे. आपण मुंबईत काय आणि पुण्यात काय; हजारो ऐतखाऊ कबुतरे निर्माण करून ठेवली आहेत. कबुतरे मस्त मजा करताहेत, आपणच भोगतोय. मला वाटते की, कबुतरांची निसर्गात जगायला अत्यंत नालायक अशी लोकसंख्या आहे. या कबुतरांची रसद तोडणे हा एकमेव आणि दीर्घकालीन परिणाम साध्य करू शकेल, असा उपाय आहे. यात कुठलीही हत्या नाही, हिंसा नाही. चोचीला अन्न मिळत नाहीये, हे एकदा कबुतरांना कळू द्या. ती जरा तरी हातपाय हलवायला लागतील. त्यांना व्यायाम घडेल. त्यांचा मेद झडेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती पांगतील. कारण अन्नाच्या शोधात त्यांचे रानटी भाईबंद जशी वणवण करतात तशीच वणवण, तसाच तडफडाट (आणि फडफडाट!) त्यांनाही फरावा लागेल. या प्रक्रियेत त्यांच्यात स्थानच्युती (Displacement
) होईल. कबुतरांच्या अंगावरची मुंबईकरांनी प्रदान केलेली कवचकुंडले एकदा का उतरवली की ती बाहेर पडतील. त्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. निसर्गाचा कायदा लागू होईल. मग हळूहळू एक इंटरेस्टिंग फेज येईल. जेवढ्या प्रमाणात चारा उपलब्ध असेल तेवढ्याच प्रमाणात यशस्विरीत्या जगणा-या लोकसंख्येचा प्रतिपाळ करून निसर्गदेवता स्वत:च समतोल साधेल. हा ख-या अर्थी परिणामकारक परंतु दीर्घकालीन उपाय आहे. लोकमानस तयार करावे लागेल. कारण हा धार्मिक प्रश्न आहे आणि म्हणूनच जास्ती गुंतागुंतीचा आहे.


कावळे, मांजरी, बहिरी ससाणे आणि काही प्रमाणात माणसाला खाद्य म्हणून उपयोगी पडणे हीच कबुतरांची निसर्गातील भूमिका आहे, हे मान्य करण्यासाठी धर्माचा चश्मा काढून शास्त्रीय ज्ञानाचा चश्मा चढवावा लागेल. शास्त्रीय ज्ञानाच्या चष्म्यातून कबुतरांची पांढरी अंडी फोडून खाणारे कावळे आणि पूर्ण वाढलेल्या कबुतरांवर लाजवाब चापल्या दाखवत झेपा टाकून त्यांना ठार मारणा-या वाघाच्या मावशा दिसतील. मुंबईत मांजरी किती आहेत हे मला माहीत नाही, पण समस्त मुंबईकरांनी मार्जारव्रत धरायला हरकत नाही. मांजरी वाढवा आणि कुत्र्यांना आवरा! मांजरांची संख्या वाढली तर कुबतरांबरोबर उंदीरही कमी होऊन माणसांना कमी कुत्री चावतील.


कबुतरांच्या विष्ठेत नेमके काय असते आणि त्याचा माणसावर नेमका काय परिणाम होतो याबाबत मला माहीत नाही. पण मला एवढे नक्की माहीत आहे की, अति झालं की बिघडतं! बाय द वे. कबुतरे पूर्णपणे शाकाहारी नाहीत बरं! पावसाळ्यात बाहेर पडणारी गांडुळे खाणारी कबुतरे काही पक्षी निरीक्षकांनी पाहिली आहेत. कबुतरांना पकडणे आणि त्यांना खेड्यापाड्यांमध्ये नेऊन सोडणे हा उपायसुद्धा करायला हरकत नाही. ती टोळधाडीसारखी पिकांवर तुटून पडणार नाहीत. कबुतरांना जाळी टाकून पकडता येईल. कदाचित काही कबुतरांचे ढाबळीवाल्यांमध्येही वाटप करता येईल. शहरांमधल्या ढाबळींमधून सुटून बाहेर पडलेल्या शोभिवंत पाळीव व रानटी कबुतरांमध्ये प्रजनन होऊन पाळीव कबुतरांचे वाण तयार झाले. त्यामुळे अशी ढाबळींमधली कबुतरे आणि फार मोठा प्रश्न झालेली कबुतरखान्यांमधली कबुतरे यांचे मेतकूट जमायला हरकत नाही. कबुतरखान्यांची, पशुपक्ष्यांवर दया करायला शिकवणारी जुनी परंपरा मोडीत काढण्यापेक्षा पुण्य मिळवण्याचे शास्त्रीय उपाय शोधून काढणे सयुक्तिक नाही का?
दरम्यान, काही पटकन करता येण्यासारखे प्रॅक्टिकल आणि अहिंसक उपाय सुचवावेसे वाटतात. 1. कबुतरांच्या घरटी करण्याच्या आणि दुपारच्या वेळी ‘टाइमपास’ करण्याच्या जागा बंद करणे. 2. दुपारच्या वेळी विश्रांती घ्यायच्या जागांवर उदाहरणार्थ - सदनिकांच्या सज्जांमध्ये वा-यावर फडफडणा-या, काळ्या रंगाच्या कपड्यांच्या गुढ्या उभारणे. (कबुतरे पाळून त्यांच्या लढती लावणारे ढाबळीवाले अशा गुढ्यांना ‘छापी’ म्हणतात.) 3. शिक्रा किंवा बहिरी ससाण्यासारख्या शिकारी पक्ष्यांचे आवाज ध्वनिमुद्रित करून ते कबुतरांचे दाट थवे आढळणा-या ठिकाणी मोठ्यांदा आणि वारंवार ऐकवणे.


यामुळे कबुतरे आपोआप कमी होतील. प्रयोगात्मक पातळीवर ही सेवा उपलब्ध करून देण्यास आमची ‘निसर्गवेध’ ही संस्था तयार आहे. 4. मुंबईतील कॉर्पोरेट जगातून निधी संकलन करून बहिरी ससाण्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष बहिरी ससाणे आयात करून त्यांच्या सेवेचा लाभ घेणे. या उपायांनी काही प्रमाणात कबुतरांचा त्रास कमी करता येणे शक्य आहे.