आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Becomes AAP And Fadnavis Seen As Kejriwal In Maharashtra Politics

ANALYSIS: जाणून घ्या, भाजप कसे ठरले \'आप\' तर फडणवीसांचा झाला \'केजरीवाल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीत कॉंग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात मोठा जनक्षोभ उसळला होता. तत्कालिन सरकारच्या धोरणांना आणि सद्यःस्थितीला विरोध करणारा तरुण वर्ग हजारेंच्या मागे ठामपणे उभा राहिला होता. त्यानंतर या आंदोलनातील समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन करुन दिल्लीत सत्ता स्थापन केली. पण सत्तेचा डोलारा त्यांना सांभाळता आला नाही. असेच काहीसे देवेंद्र फडणवीस यांचे झाले आहे. राज्यातील राजकीय डोलारा फडणवीस यांना सांभाळता आला नाही. त्यामुळे जास्त जागा असतानाही भाजपची अवस्था राज्यात अगदी 'आप'सारखी झाली आहे.
दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला सर्वांत जास्त जागा मिळाल्या. इतर पक्षांच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्याने यशाची हवा आपच्या डोक्यात गेली. आता आमच्याशिवाय कोणताही पक्ष तारणहार राहिलेला नाही, असे त्यांना वाटू लागले. याची प्रचिती आपच्या नेत्यांच्या बोलण्यात, वागण्यातून जाणवू लागली. पण एवढ्या जागा मिळाल्या असल्या तरी बहुमताचा जादुई आकडा त्यांच्यापासून दूरच होता. त्यामुळे कोणत्यातरी पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार होता. मात्र कोणताही पक्ष एवढ्या सहजपणे पाठिंबा देण्यास तयार नव्हता. पण सत्तेचा मोह आपला काही स्वस्थ बसू देईना. ज्या कॉंग्रेसच्या विरुद्ध प्रचार करुन जास्त जागा निवडून आणल्या होत्या त्याच पक्षाचा पाठिंबा स्वीकारण्याचा अजबगजब निर्णय आपने घेतला. आणि आपचे वाईट दिवस सुरु झाले.
या निर्णयाची झळ आपला बसली. कॉंग्रेसने आपला बदनाम करुन सोडले. जनतेने आपवर दाखवलेला विश्वास पार उडाला. त्यानंतर कॉंग्रेसने योग्य वेळ साधत आपची साथ सोडली. पण याचे घागरही आपवरच फोडले. अशा प्रकारे आपला राजकीय पाणी पाजले. आता नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे, की जर दिल्लीत निवडणूका झाल्या तर आपला सर्वांत कमी जागा मिळतील. सत्तेची गणिते भाजपच्या बाजूने फिरली आहेत.
आपची जशी प्रतिष्ठा गेली तीच अवस्था केजरीवाल यांची झाली आहे. एक वेळ अशी होती, की केजरीवाल यांना हिरो समजले जात होते. त्यांची तुलना चक्क तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासोबत केली जात होती. पण सत्तेत आल्यावर त्यांनी घेतलेले युटर्न, घाणेरडे राजकारण आणि फसलेले निर्णय यामुळे आता केजरीवाल हिरो नव्हे तर झिरो झाले आहेत.
अशीच काहिशी अवस्था भाजप सरकारची महाराष्ट्रात झाली आहे. भाजपला जर कमी जागा मिळाल्या असत्या तर शिवसेनेसोबत सहज युती झाली असती किंवा पूर्ण बहुमत मिळाले असते तर त्यांचेच सरकार आले असते. या दोन्ही परिस्थितीत महाराष्ट्रात स्थीर सरकार आले असते. पण या निवडणुकीत भाजपला एवढ्या जागा मिळाल्या आहेत, की सत्ता स्थापनही करता येईना आणि एखाद्या पक्षासमोर झुकताही येईना. याची नेमकी जाण असलेल्या पवारांनी अगदी योग्य पद्धतीने याचा लाभ उचलला. त्यांनी मतमोजणी झाल्यावर लगेच भाजपला पाठिंबा जाहिर केला. आता राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याने भाजप नेत्यांच्या अंगावरही मुठभर मांस वाढले. त्यांनी शिवसेनेला मागे रेटण्यास सुरवात केली.
राज्यातील या राजकीय घडामोडींमुळे भाजप आणि सेनेतील युती पुन्हा होऊ शकली नाही. अखेर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपला सरकार स्थापन करावे लागले. ज्या राष्ट्रवादीच्या विरुद्ध प्रचार करुन भाजप सत्तेत आली होती, त्याच पक्षाचा पाठिंबा भाजपने घेतला. पण तोही एवढ्या छुप्या पद्धतीने की जनतेला तो रुचलाही नाही. शिवाय काल विधानसभेत जो काही राजकीय गोंधळ झाला, त्याचे दोषारोपण थेट भाजपवरचे केले जात आहे. याची झळ भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही.
राज्यात भाजपची सत्ता आली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस विरोधी पक्षाची भूमिका अदा करणार आहेत. यावेळी भाजपची अवस्था अगदी आपसारखी झालेली असेल. कठोर निर्णय घेता येणार नाहीत. कायम बचावाचे राजकारण करावे लागेल. भाजपची प्रतिष्ठा हळूहळू गेलेली असेल. जनभावना नकारात्मक झालेली असेल. अशा वेळी निवडणुका झाल्या तर भाजपचे मताधिक्य प्रचंड घसरलेले असेल. यावेळी भाजपच्या थोड्याच जागा निवडून येतील.
फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आणि त्यानंतर झालेला शानदार शपथविधी समारंभ यानंतर ते जणू महाराष्ट्राचे हिरो असल्याप्रमाणे वावरत होते. त्यांना तसे प्रोजेक्टही करण्यात येत होते. पण काल घडलेल्या घडामोडींनंतर त्यांची प्रतिमा डागाळलेली आहे. सोशल मीडियात तर त्यांची खुप खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळे त्यांचा केजरीवाल झाल्याची अनुभूती जनतेला येत आहे. मुख्यमंत्री म्हटले, की जी भावना मनात येते ती फडणवीस गमावून बसले आहेत. ती पुन्हा मिळवणे जवळपास अशक्य आहे. हे भाजपला आणि फडणवीस यांना भविष्यात दिसून येईल.