आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Wins In Madya Pradesh, Delhi, Rajasthan, Chhattisgarh

चारही राज्यांच्या सत्तेच्या चाव्या भाजपच्या खिशात... कॉंग्रेसचे टीक टीक वाजते डोक्यात...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/भोपाळ/रायपूर/जयपूर- लोकसभेची सेमिफायनल समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकांमध्ये जनतेने सत्तेच्या चाव्या भाजपकडे सोपविल्या आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला सरळसरळ बहुमत मिळाले असले तरी दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी थोडी आकडेवारीची कसरत करावी लागणार आहे.
मध्य प्रदेशमध्ये भाजपला 165 जागा मिळाल्या आहेत तर कॉंग्रेसला केवळ 58 जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुजन समाज पक्षाला 4 जागा मिळाल्या असून अपक्षांनी 3 जागांवर करिष्मा दाखविला आहे. एकूण 230 जागांच्या या विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 116 हा जादुई आकडा मिळविणे आवश्यक आहे. भाजपला 164 जागा मिळाल्या असल्याने सत्तेचा हार शिवाराजसिंह चौहान यांच्या गळ्यात पडला आहे.
राजस्थानमध्ये भाजपला 162 जागा मिळाल्या आहेत तर कॉंग्रेसला 21 जागाच मिळवित्या आल्या. बहुजन समाज पक्षाने येथेही खाते उघडले असून 3 जागा मिळविल्या आहेत. राष्ट्रीय जनता पार्टीला 4 जागा तर अपक्ष 9 जागांवर निवडून आले आहेत. एकूण 199 सदस्यसंख्या असलेल्या या विधानसभा भवनात बहुमतासाठी 101 जागांची गरज आहे. भाजपला येथे 162 जागा मिळाल्या असल्याने या राज्यातही भाजपची सत्ता येणार आहे. दरम्यान, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या गळ्यात विजयी हार पडणार असल्याचे दिसून येते.
छत्तीसगडमध्ये भाजपला 49 जागा मिळाल्या असून कॉंग्रेसला 39 जागांवर समाधान मानावे लागले. येथे बहुजन समाज पक्षाला एक जागा तर एक अपक्ष निवडून आला आहे. या राज्यातही सत्तेच्या चाव्या भाजपच्या खिशात आहेत. एकूण 90 सदस्यसंख्या असलेल्या येथील विधानसभेत बहुमतासाठी 46 जागा मिळविणे आवश्यक आहेत. भाजपच्या नेतृत्वात स्थापन करण्यात येणाऱ्या सरकारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री रमणसिंहच पुन्हा मुख्यमंत्री असतील की नवा चेहरा दिला जाईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दिल्लीतील निवडणूक निकालांची सर्वांनाच उत्सूकता लागली होती. आम आदमी पक्षाने या निवडणुकीत रंगत आणली होती. येथील निवडणुकीत कॉंग्रेसला पराजयाचा मोठा धक्का सहन करावा लागला आहे. भाजपला 32 जागा मिळाल्या असून आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत तब्बल 28 जागा मिळविल्या आहेत. कॉंग्रेसला केवळ 7 जागा वाचविता आल्या असून दोन अपक्ष निवडून आले आहेत. येथे भाजपला सत्ता स्थापन करायची असल्यास अपक्ष किंवा आम आदमी पक्षाचा पाठिंबा मिळविणे अनिवार्य असणार आहे. एकूण 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 36 जागा मिळविणे आवश्यक आहे.
टीप- वरील सर्व आकडे चारही राज्यांमधील आमच्या वार्ताहरांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहेत. ही निवडणूक आयोगाची आकडेवारी नाही.