आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BLOG: बनारसमधली छठ पूजेची धमाल आणि प्रयागच्या त्रिवेणी संगमावरचा अनोखा अनुभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो क्रेडीट - मृण्मयी रानडे - Divya Marathi
फोटो क्रेडीट - मृण्मयी रानडे
आजचा इथला तिसरा दिवस. आलो तेव्हापासूनच बनारसमध्ये छठ पूजेचा माहौल आहे. बाजारात ऊस, शिंगाडे, कमरक, वगैरेंचे ढीग लागलेत. आणि सगळ्या प्रकारची फळं. आज संध्याकाळी हजारो भाविक गंगाकिनारी जमणार आहेत. अलाहाबादलाही तेच असणार, त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आम्ही सकाळी लवकर जायचं ठरवलं. सकाळी सातला निघालो. १२५ किमी आहे अलाहाबाद, इथल्या भाषेत इलाहाबाद. म्हणजेच प्रयाग, त्रिवेणी संगमाची जागा. आजचा चालक होता पोरगेलासाच, फैज नावाचा. वाटेत एके ठिकाणी गरम कांदाभजी आणि चहा घेतला. गावात शिरता शिरताच रस्त्यावर अनेक लोक गाडीला हात दाखवत थांबवायचा प्रयत्न करू लागले. फैज म्हणाला, ते नावाडी होते, संगमावर जाण्यासाठी नावा चालवणारे. त्यातल्या एकाला गाडीत घेतलं आणि नदीकाठी जायला निघालो. किनाऱ्याला लागून मोठा किल्ला आहे, पण तो लष्कराच्या अखत्यारीत असल्याने फार थोडा भाग पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे. गाडीतून उतरलो, तर नावाडी मागे लागले. चार, पाच, सहा हजार काहीही सांगत होते. आम्ही उडालोच.
विचारलं, किती वेळ लागेल?
दो ढाई घंटे!
एवढा वेळ, कशाला बुवा?
हां, नहाएंगे, पूजा करेंगे, तो वक्त लगेगाही ना.
आम्हाला काही आंघोळ वगैरे करायची नव्हती. मग आम्ही फैजला विचारलं. शेवटी चार हजारवाल्याशी डील केलं. फैजलाही सोबत चल म्हटलं. आणि डुगडुगत्या नावेत जाऊन बसलो.

नाव थोडी पुढे गेली असेल तर सीगल्स घिरट्या मारू लागले. आणि शेजारी एक छोटी नाव आली, शेवेच्या पुड्या विकत होता तो नावाडी. शेव कशाला ते कळेना. फैज म्हणाला, या पक्ष्यांना शेव फार आवडते, त्यांना घालण्यासाठी. आम्ही दोन पुड्या घेतल्या, ६० रुपयांना. शेव पाण्यात फेकली की पक्षी त्यावर झडप घालून ते फस्त करत होते. फार मज्जा वाटली ते पाहून. कुठून आॅस्ट्रेलियाहून आलेले हे पक्षी, शेवेचे अॅडिक्ट झाले होते! दोन पुड्या कधीच संपल्या, मग आणखी दोन घेतल्या. अर्ध्या एक तासाने प्रत्यक्ष संगमापाशी पोचलो. गंगा आणि यमुनेचे प्रवाह एकमेकांत मिसळलेे होते, वेगळे रंग स्पष्ट दिसत होते. तमाम हिंदूंच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र स्थळ. मला मात्र या भौगोलिक चमत्काराची जास्त उत्कंठा वाटत होती. कन्याकुमारीला समुद्र वेगळे दिसतात, तसंच हे. अनोखं दृश्य. संगमाजवळ अनेक नावा एकत्र उभ्या होत्या, त्यातला एकीतनं एका पुजाऱ्याने आमच्या नावेत टुणकन उडी मारली. आणि पूजा कशी करायची वगैरे बोलू लागला. मला काही पूजा करायची नव्हती, पण बाकीच्या तिघींना इच्छा होती. मग त्याने काहीतरी मंत्र बडबडले. बडबडलेच, एकाही शब्दाचा अर्थ लागत नव्हता. नारळ दिलेन तेही ओलेच होते, म्हणजे ते सरळसरळ रिसायकल होत होते. त्याने या तिघींना डोक्यावरनं ओढण्याही घ्यायला लावल्या. आणि प्रसादही त्यानेच आणलेले पेढे. त्या संगमाचं पावित्र्य, सौंदर्य, शांतता एंजॉय करण्यासाठी मला फारच प्रयत्न करावा लागला या सगळ्यानंतर. शेवटी तो निघाला, त्याने आम्हाला हायजॅक केल्यासारखंच वाटलं मला.

आम्ही परतीला लागलो. पुन्हा पक्ष्यांना शेव घालत घालत काठावर परतलो. जवळच निद्रिस्त हनुमानाचं मंदिर आहे, पण तिथे खूप मोठी रांग होती, मग आम्ही काही आत गेलो नाही. इथे छोटासा बाजार भरलेला होता. सुप्रसिद्ध इलाहाबादी पेरू होते, वरून लाल, आत पांढरे. चना चाट होती. या भागांत लोकप्रिय, खरं तर 'परदेशी पर्यटकप्रिय' असलेला लेमन टी होता. चविष्ट चाट, गोड पेरू आणि चाट मसाला घातलेला लेमन टी. अहाहा, काय नाश्ता झालाय त्या दिवशी. फैजला कोणी ओळखीचं भेटलं, त्याने सांगितलं की, गावात छठच्या निमित्ताने गर्दी लोटलीय आणि वाहनं अडकलीत. मग आम्ही आनंद भवन वगैरे इतर प्रेक्षणीय स्थळं न पाहता बनारसला परत जाण्याचं ठरवलं. दोनपर्यंत घरी पोचलोही. फार भूक नव्हती, मग दिनेशने खिचडी, पापड, सोबत ताजा मुळा असं जेवायला घातलं. त्यावर नानीने आठवणीने तूप वाढलं. जेवून आम्ही थोडा वेळ झोपलो. आणि संध्याकाळी बनारसच्या गंगेत नौकानयन करायला निघालो. हाॅटेलपासून काही अंतरापर्यंत रिक्षा जात होती, पण पुढे दशाश्वमेध घाटापर्यंत चालतच जावं लागणार होतं. साधारण एक किमी अंतर असेल. एरवी हे अंतर चालायला दहा मिनिटं लागली असती, पण त्या दिवशी अर्धा तास तरी लागला. कारण वाटेत होते छठपूजेसाठी गंगाकिनारी निघालेल्या बिहारी आयाबहिणींचे जथ्थेच्या जथ्थे. त्यात रस्त्यावरची दुकानं. आणि जन्मसावित्री गायीगुरं. सोबत मयूर होता म्हणून घाटापाशी पोचू शकलो, नाहीतर नावेपर्यंत जाताच आलं नसतं. मुंबईपुण्यातली गणपती विसर्जन मिरवणुकीतली गर्दी साधारण अशी असते. पण त्या गर्दीलाही एक शिस्त असते. इकडे शिस्त नावालाही नव्हती. नाही म्हणायला पोलिस मात्र सर्वत्र होते लक्ष ठेवून. गर्दीतलं कोणी हरवल्याच्या/सापडल्याच्या घोषणाही ध्वनिक्षेपकावरनं चालू होत्या.

पुढील स्लाईडवर वाचा, उर्वरित ब्लॉग...
बातम्या आणखी आहेत...