आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: \'सल मनातली\' - खरंच मी बाबांसोबत असं वागायला नको होतं!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक दिवसांपासून इच्छा होती की एखादी चांगली नोकरी असावी आणि एक चांगला स्मार्टफोन असावा. शेवटी मुंबईला चांगल्या पगाराची नोकरी लागली आणि स्वप्न पुर्ण झाले. विशेष म्हणजे मी घेतलेल्या HTC च्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा खुपच छान होता. मला फोटोग्राफीची आवड होतीच. त्यामुळे मी त्याच्याने खुप फोटो काढले. मनसोक्त फोटो काढले. मला भेटायला माझे आईबाबा मुंबईला आले होते, तेव्हा त्यांना 'एलिफंटा' दाखवायला घेऊन गेलो, त्यावेळीसुध्दा याच मोबाईलने त्यांचे भरपूर फोटो काढले. त्या फोटोतील अनेक आठवणी मनात अजून ताज्या आहेत. सोबतच अनेक आठवणी त्या मोबाईलशीही नकळत जोडल्या गेल्या. नंतर मुंबईची नोकरी सुटली आणि पुन्हा औरंगाबादला परतलो. औरंगाबादला परतल्यावर काही दिवसातच तो मोबाईल खराब झाला. अनेक ठिकाणी रिपेअरींगसाठी दाखवून सुध्दा तो रिपेअर होऊ शकला नाही. त्या मोबाईलची बॅटरी फुगली होती. त्यामुळे बॅटरीचा प्रॉब्लेम असेल म्हणून 650 रुपयांची नवीन बॅटरी मी दिल्लीवरून मागवली. ८ -१५ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ती बॅटरी आली. आता वाटले मोबाईल सुरू होईल. मात्र बॅटरी लावून सुध्दा मोबाईल सुरू झाला नाही. त्यानंतर मी एका दुकानात मोबाईल रिपेअरिंगसाठी दिला. तेथे कळाले की मदरबोर्डमध्ये खराबी होती. विशेष म्हणजे जेथे मी हा मोबाईल रिपेअरिंगसाठी दिला होता त्या व्यक्तीने सांगितले की, या सिरिजच्या अनेक स्मार्टफोनमध्ये सेम असाच प्रॉब्लेम असल्याचे कळावे. ऐकून दुःखच झाले. मात्र मी ठरवले की, दुसरा मोबाईल मी घेणार नाही आणि हा असाच जपून ठेवणार. त्यानंतर अनेक दिवस मी माझा जुनाच की पॅडचा मोबाईल वापरत राहिलो. तो HTC चा मोबाईल घरात जपून ठेवला. जेव्हा जेव्हा तो नजरेस पडायचा तेव्हा थोडे दुःख व्हायचे, तसेच मी घेतलेला पहिला महागडा स्मार्टफोन म्हणून थोडे बरेही वाटायचे. तो मोबाईल 17000 रुपयांचा होता आणि माझ्या आयुष्यात एवढी मोठी इनव्हेंस्टमेंट मी फार कमी वस्तूंसाठी केली होती. त्यापैकीच तो एक.
माझे लग्न ठरले. होणाऱ्या पत्नीला मी एक चांगला स्मार्टफोन गिफ्ट केला. व्हॉट्सअप, फेसबुक यावर ती चांगलीच अॅक्टीव्ह झाली. मात्र माझ्याकडे साधा मोबाईल असल्याने ती नाराजही होती. तीला माझ्याशी चॅटींग करता येत नव्हते. अनेक वेळा तीने इच्छा बोलून दाखवल्यावर मीसुध्दा नवीन मोबाईल घेतला. या दरम्यान माझ्या मोठ्या भावाने वडीलांना एक MP3 किपॅडचा मायक्रोमॅक्सचा मोबाईल घेऊन दिला. त्यावर ते नेहमी गाणे ऐकत असायचे. त्यांना तो मोबाईलही खुप आवडला होता. ते नेहमी गाणे लावून सकाळी फिरायला जात. मात्र अनेक दिवस आवडीने वापरल्यानंतर त्यांच्याही मोबाईलला प्रॉब्लेम येऊ लागला. त्यांच्या मोबाईलवर कॉलच येत नव्हता. त्यामुळे त्यांची फार घालमेल होत होती. त्यांना दुसरा मोबाईल दिला आम्ही वापरायला मात्र त्यांना त्यांच्या जुन्या मोबाईलशिवाय करमत नव्हते. हीच त्यांची घालमेलपाहून आम्ही त्यांना नवा XIAOMI RED MI 2 हा नवा स्मार्टफोन गिफ्ट केला. तो त्यांना खुप आवडला. तोपर्यंत माझे लग्न झाले होते. त्यामुळे आमच्या घरात सर्वांकडेच स्मार्टफोन होते. केवळ आई आणि बाबाच बाकी होते. त्यातही बाबांना मोबाईल घेतल्यामुळे ती कमीसुध्दा पुर्ण झाली, तर आईला असला मोबाईल आवडत नव्हता. नवीन मोबाईल आल्यामुळे बाबा चांगलेच खुष होते. तरीही त्यांना त्यांचा जुना मोबाईल ठिक व्हावा अशी इच्छा होती. त्यांनी मला ती अनेकदा बोलूनही दाखवली. मात्र माझ्या आळशीपणामुळे मी त्यांना नेहमी टाळाटाळ करत राहिलो. शेवटी त्यांनीच त्यांच्या एका मित्राच्या मुलाच्या मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात तो मोबाईल दाखवला. तेथे त्यांना कळाले की, याच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहे. ते मोबाईल माझ्याकडे घेऊन आले आणि त्यांनी सांगितले तु जिथे मोबाईल रिपेअरिंगला टाकला होता, तेथे माझासुध्दा मोबाईल रिपेअरींगला टाक. सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. अनेक वेळा पाठीमागे लागल्यानंतर मी त्यांचा मोबाईल रिपेअरिंगला टाकला. बाबांना आल्यावर सांगितले की, मोबाईल रिपेअरिंगला टाकला आहे आणि त्याला 150 रुपये खर्च येईल. बाबा म्हणाले, फक्त दिडशे रुपये, चांगले आहे. कधी देणार आहे तो मोबाईल असे त्यांनी विचारले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
माझ्या कामाच्या गडबडीत मला तो मोबाईल आणायचे लक्षातच राहिले नाही. दोन दिवस झाले तो मोबाईल काही ना काही अडचणींमुळे आणायचे राहिलेच. या दरम्यान एका दिवशी मी ऑफिसमध्ये असताना आईचा फोन आला.
ती म्हणाली, "तुझा जुना मोबाईल जो बंद पडला होता, तो बाबांनी 200 रुपयांना भंगारवाल्याला विकला."
हे ऐकताच मला मोठा धक्का बसला. मला फार वाईट वाटले. मला काय बोलावे कळत नव्हते. मी आईला ओरडलो. मात्र फार उशीर झाला होता. भावाने आईकडून फोन घेत सांगितले की, "जाऊ दे आता कोणावर ओरडू नकोस. विषय सोडून दे."
मी फोन ठेवला.
पुन्हा ऑफिसात कामाला लागलो. मात्र, कामात मन लागत नव्हतं. राहून राहून तोच विषय मनात खदखदत होता. ऑफिसमधून घरी गेलो. वडीलांशी जास्त बोललोच नाही. कारण मला माहिती होते, मी जर बोललो तर काही तरी उलटे सुलटे बोलून बसेन. म्हणून मी शांतच होतो. रात्री जेवलो आणि झोपलो. मात्र झोप लागत नव्हती. सारखा सारखा तोच विषय मनात खदखदत होता. कशी तरी झोप लागली. सकाळी उठलो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो. तितक्यात बाबा म्हणाले, "अरे तो मोबाईल रिपेअरिंगला टाकला होता, तो कधी आणणार!"
तितक्यात आई म्हणाली, अहो त्याचा मोबाईल विकल्याने तो अपसेट झाला आहे.
हे ऐकताच माझा बांध तुटला आणि मी बडबडायला लागलो. बाबांना रागाच्या भरात काही वाही बोललो. तुम्हाला कळतयं की नाही. "तो मोबाईल नाही, तर माझी आठवण आहे." असे नाही नाही ते बरेच बोललो आणि ऑफिसला निघून गेलो.
ऑफिसला जाताना मनाला प्रश्न विचारले की, आपण आज जे काही केले ते बरोबर होते का?
उत्तर 'नाही' असे मिळाले . आपण चुकीचेच वागलो आहे हे पटायला लागले.
तेव्हा एकदम आठवले की, लहानपणी बाबांनी अत्यंत आवडीने अनेक वस्तू घरात आणल्या होत्या. त्यापैकी अनेक वस्तू आम्ही तोडल्या होत्या, काही हरवल्या होत्या. त्यावेळी त्यांना राग आलाही असेल, मात्र ते आमच्या हातून घडले असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले होते. त्यांनी अत्यंत आवडीने आणलेली लोलक असलेल्या घड्याळीची काच मी आणि माझ्या भावाने घरात बॉल खेळताना फोडली होती. त्यावेळी आम्ही फार घाबरलो होतो. बाबा नोकरीवरून घरी आले. त्यांनी ते पाहिले मात्र ते आम्हाला काहीच म्हणाले नाही. त्यांनी त्या काचेच्या ठिकाणी एक मेनकापड (प्लास्टीक) लावले आणि पुन्हा ती घड्याळ सुरू केली. अशा अनेक आठवणी मनात तरळू लागल्या. मन गहिवरून आले. हे सर्व मनात सुरू असताना ऑफिस कधी आले कळालेच नाही.
ऑफिसला गेलो. काम करण्यास सुरूवात केली. तितक्यात आईचा फोन आला.
ती म्हणाली "बाबा सकाळीच त्या भंगारवाल्याला शोधायला गेलेत. काहीच खाल्लं नाही त्यांनी. तु बाहेर पडलास, त्यानंतर ते लगेच बाहेर पडले. त्यांना त्या भंगारवाल्याचे दुकानही कोठे आहे माहित नाही."
मला काय बोलावे ते कळतच नव्हते. मी फोन ठेवला आणि तसाच कामाला लागलो. राहुन राहुन मनाला फार खात होतो. सारखे साऱखे आपल्या चुकीची जाणीव होत होती. पण आता फार उशीर झाला होता. त्यानंतर दुपारी आईचा पुन्हा फोन आला.
ती म्हणाली "बाबांनी त्या भंगारवाल्याकडून तो मोबाईल परत आणला."
मी म्हणालो कसं काय? मग ती सांगायला लागली.
"तु ऑफिसला गेल्यावर बाबा सकाळीच घराबाहेर पडले. नाश्ताही केला नाही. तसेच उन्हात गेले. नतंर दुपारी घरी आले. मी विचारलं त्यांना कुठे गेला होतात. तेव्हा म्हणाले त्या भंगार वाल्याला शोधायला गेलो होतो. त्यानंतर मी त्यांना त्याच्या दुकानाचा पत्ता सांगितला. तेव्हा ते लगेचच त्या दुकानाकडे गेले. तिथेच उन्हात दीड दोन तास वाट पाहिल्यानंतर तो भंगारवाला आला आणि त्यांनी विनंती करून मोबाईल परत आणला."
आई बोलत होती, मात्र मला काय बोलावे ते कळतच नव्हते. खुप वाईट वाटले आणि फोन मिळाल्याच्या आनंदपेक्षा बाबांना बोलल्याचे दुःख मनात जास्त सलत होते. संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाताना बाबांचा रिपेअरींगला टाकलेला मोबाईल घेतला आणि घरी गेलो. बाबांना त्यांचा मोबाईल दिला. त्यांना तो मोबाईल सुरू झाल्याचे पाहून आनंद झाला, पण मला आतून फार वाईट वाटत होते. थोड्या वेळाने आईने मला माझा मोबाईल परत केला.
ती म्हणाली हाच, "आहे ना तो... नीट बघून घे."
मला तर काहीच बोलावेसे वाटत नव्हते. मी तो मोबाईल घेतला आणि माझ्या कपाटात ठेवला. नंतर आईने सांगितले की, मोबाईल आणण्यासाठी बाबांनी उन्हात काय काय खटाटोप केले याबद्दल. ते ऐकून तर खुपच वाईट वाटले.
त्या दिवशी मनाला प्रश्न पडला. आपण खरंच असं का वागलो?
बाबांनी तो मोबाईल कदाचित त्यांच्या मोबाईलला लागणारे 150 रुपये घरातील पडीक सामानातून जमवण्याचा तर प्रयत्न केला नसेल.
त्यांना आपण बोलल्यावर काय वाटले असेल?
त्यांच्या मनात असा विचार आला असेल का?, की याच मुलानी माझ्या कित्येक आवडीच्या गोष्टी तोडल्या, फोडल्या तेव्हा मी काहीही म्हणालो नाही, मात्र आता याची एक बंद पडलेली गोष्ट विकली तर तो किती बोलतोय?
अथवा ते मनातल्या मनात स्वतःला खात होते, की आपण तो मोबाईल विकायला नको होता..
अशा एक ना शंभर प्रश्नांनी मनात गर्दी केली.
ईमेल - rahulakransubhe@gmail.com
www.rahulakransubhe.weebly.com
Facebook - https://www.facebook.com/rahulakransubhe
Whatsapp - 9762771320