आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BLOG: बनारस हिंदू विद्यापीठाचा रम्य परिसर, सुबह-ए-बनारस, आणि पहाटेची नावेतून फेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो क्रेडीट - मृण्मयी रानडे - Divya Marathi
फोटो क्रेडीट - मृण्मयी रानडे
सकाळी दहाला बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) पाहायला जायचं होतं. थोडा वेळ आराम केला, नाश्ता करून निघालो. इथेही आम्हाला ईरिक्षा बरी वाटली. त्याला थांबवून घेतलं कारण विद्यापीठाचा परिसर प्रचंड मोठा आहे. प्रवेशद्वारही भलंमोठं. बीएचयूमधलं विश्वनाथ मंदिर पाहण्याजोगं आहे. मुख्य मंदिरापेक्षा तेच बरं, असं तिथली स्वच्छता, शांतता, मोकळा प्रशस्त परिसर पाहून वाटलं. इथे गर्दी फार नव्हती किंवा आवार मोठं असल्याने वाटत नव्हती. मंदिरात, आसपासच्या हिरवळीवर मुलं अभ्यास करत होती. मंदिराच्या बाहेर दुकानं आहेत, खाऊची आणि टिपिकल टूरिस्टी. मंदिरातून आम्ही बीएचयूमधल्या कला भवनमध्ये गेलो, इथे खूप मोठं संग्रहालय आहे. जुन्या मूर्ती, शस्त्रास्त्रं, चित्रं पाहण्यात तासनतास जातात. बनारस शहराबद्दल माहिती देणारं एक दालन आहे. बीएचयूच्या स्थापनेत ज्यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता त्या पं. मदनमोहन मालवीयांविषयी माहिती देणारंही एक दालन आहे. इथे आत मोबाइल वा कॅमेरा नेता येत नाही, ते ठेवण्यासाठी लाॅकर्स आहेत. आम्ही बॅग्सही त्यात ठेवल्या व मोकळ्या हाताने फिरलो. नाहीतर बॅग सांभाळणं फार जिकिरीचं होतं अनेकदा. संग्रहालयाची उत्तम देखभाल ठेवलेली आहे, परंतु फार कमी लोक इथपर्यंत पोचतात. आम्ही गेलो तेव्हा दहा माणसंही असतील नसतील.
BHU विश्वनाथ मंदिरातली एक भिंत
विद्यापीठाच्या परिसरात जिकडेतिकडे विद्यार्थी होते. प्रत्येक विभागाची एक इमारत, दोन मजली असेल पण आडवी पसरलेली, भोवती हिरवळ आणि झाडं. असे अनेक विभाग आहेत. प्रत्येक विभागाचं वसतिगृह वेगळं आहे. सर्व इमारती एकसारख्या. एखाद्या सुनियोजित शहरासारख्या. बीएचयूचं शैक्षणिक क्षेत्रातलं स्थानही फार वरचं आहे. इथे शिकायला यायला फार आवडलं असतं, असं सारखं वाटत राहिलं. हा सगळा परिसर आम्ही रिक्षातनं फिरलो, कारण ऊन खूप होतं आणि इतकं चालणं शक्य नव्हतं.
घरी आलो, जेवून आराम केला आणि पुन्हा एकदा साडी खरेदी मोहिमेवर. पण या खेपेला तासभरच तिथे घालवला. आणि भटकायला बाहेर पडलो. आम्हाला बनारसच्या सुप्रसिद्ध गल्ल्या पाहायच्या होत्या. मग आम्ही सुमीतच्या घरी जायचं ठरवलं. पत्ता ठाऊक असला तरी कोणाच्या मदतीशिवाय तिथे पोचणं केवळ अशक्य. मग छोटेलाल आमच्या सोबत आले. शुभांगी पंढरपूरची आहे, पण तीही या गल्ल्या पाहून हबकलीच. वर्षाताईला सुमीत बाइकवरून घेऊन गेला, चालायला त्रास होईल म्हणून. तर ती येताना म्हणाली, मी चालतच येते आपली, बाइकवर भीती वाटते खूप. गायीगुरांना हुकवत, वाटेतले शेणाचे पो चुकवत सुमीतच्या घरी पोचलो. ३०० वर्षं जुनं हे घर. इकडच्या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे सगळी घरं एकमेकाला लागून, काॅमन भिंती. दोन घरांच्या मध्ये जागा, अंगण वगैरे प्रकार नाही. उभी, चारमजली घरंं. हे शहर बडा पुराना है, शेकडो वर्षांपासून इथे लोक येत जात राहिले आहेत, त्यामुळे वस्ती जुनी आहे. पूर्वी घरांमध्ये तळमजल्यावर गोठा असे. दार वाजलं की पहिल्या मजल्यावरच्या खोलीतनंही उघडायची सोय आहे. मला खूप आवडलं होतं ते. (दिल्लीला गेले होते अनेक वर्षांपूर्वी. बंगल्यांची वस्ती. तिथेही बेल वाजली की अगदी वरच्या मजल्यावरच्या खोलीत असलेला माणूस दारात आलेल्या व्यक्तीशी बोलायचा, व ओळख निघाल्यावर वरूनच दार उघडायचं. भन्नाट कल्पना.) असो, तर घरी गेलाे. हे पाळंदे कुटुंबाचं घर. पिढीजात पौरोहित्याचा व्यवसाय. सुमीतच्या भाषेवर हिंदी व भोजपुरीचे संस्कार होते, परंतु त्याच्या वडिलांची भाषा सदाशिवपेठेतही शोभावी अशी. आईचीही. इतक्या वर्षांच्या वास्तव्यानंतरही जपलेली. थोडा वेळ गप्पा मारून आम्ही निघालो, पुन्हा बाहेर पडायलाही सुमीतची मदत लागलीच, नाहीतर आम्ही तासनतास तिथेच घुटमळत राहिलो असतो हे नक्की. मुख्य रस्त्यावर येऊन ईरिक्षा करून घरी पोचलो.

पुढील स्लाईडवर वाचा, उर्वरित ब्लॉग... उद्याचा शेवटचा दिवस
बातम्या आणखी आहेत...