आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG : \'सेल्फी\'वाल्यांनु काय करालात... (असंवेदनशीलतेचा कळस )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्राचे लग्न.. वाढदिवस.. पार्टी.. निरोप समारंभ.. कॉलेजचे वर्ग या ठिकाणाहून निघालेले सेल्फीचे भूत आता थेट मढ्यांच्या डोक्यावर बसू लागलंय.. नेपाळमध्ये झालेल्या विध्वंसानंतर नेपाळमधील भयावह स्थितीचे वेगळे वर्णन करायला नको. जगभरातील अनेक लोकांना दोन दिवस अन्न पाणी गोड लागले नाही. कारण विकासाचा पतंग कितीही उडत असला, तरी त्याला झुलवणारा असतो तो माणुसकीचा दोरखंड.. त्यामुळेच आजची संवादाची साधने बनलेल्या सोशल मीडिया व्हॉट्स अप, फेसबूक, ट्वीटर आणि अनेक मार्गांनी लोकांनी आपल्या संवेदना मांडल्या. ते सर्व वाचून इंटरनेटच्या या जाळ्याचं पुन्हा एकदा अप्रूप वाटून गेलं.. पण दुसरी बाजू कशी झाकून राहणार.. ती दुसरी बाजू पाहिली आणि संवेदनशील लोकांच्या या गर्दीतील असंवेदनशील लोकांबाबतचा राग जास्त उफाळून आला.. एका बाजुला ढिगाऱ्यांखाली गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढणारे बचाव पथकाचे जवान तर, दुसऱ्या बाजुला त्याच ढिगाऱ्यांवर उभे राहून Selfie साठी Smile देणारे बहाद्दर... त्यांना पाहिले आणि याचसाठी झाली का ही प्रगती? असे क्षणभर वाटून गेले...

बऱ्याचदा काही नेते मंडळी सेलिब्रिटी किंवा नामंकित व्यक्ती एखाद्या विषयावर वादग्रस्त वक्तव्य देत असतात. त्यानंतर त्यांच्यावर माध्यमांसह सगळेच तुटून पडत असतात. पण मग तोच नियम असले प्रकार करणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्यांना नको का? की केवळ ते प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांच्यावरच ही बंधने लादायची आणि आपण काहीही करायला मोकाट? हा दुजाभाव करता कामा नये. उलट अशा प्रकारे समाजातील विविध गोष्टींबाबत असंवेदनशीलतेचे दर्शन घडवणाऱ्यांवरही तेवढ्याच आवेशाने हल्ला चढवायला हवा. त्यांनी केलेले कृत्य चुकीचे आहे हे त्यांना दाखवून द्यावे लागणार. त्यामुळे असा प्रकार निदर्शनास येताच सोशल मिडिया, माध्यमे आणि प्रत्यक्षपणे आपण त्याला विरोध करणे गरजेचे आहे. कारण आपण अनेकदा पाहतो की, बहुतांश लोक अपघातानंतर जखमींची मदत करण्याऐवजी फोटो काढण्यावर भर देतात. मग अशा प्रकारांना जर वेळीच विरोध केला नाही, तर अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरताना बरोबर आणि चुकीचे यामध्ये असलेली अत्यंत सूक्ष्म रेषा तरुणाईला कधीच दिसणारच नाही, आणि ते अत्यंत धोक्याचे आहे.

काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारचे एक-दोन असंवेदनशील 'बहाद्दर' भेटले होते. एका पठ्ठ्याने आजोबाच्या मृत्यूनंतर चक्क त्यांच्या मृतदेहासमोर सेल्फी काढून पोस्ट केला. तर दुसऱ्या एका महाभागाने पत्नीच्या मृत्यूनंतर स्मशानात सेल्फी घेतला होता. त्याने तर सलग पाच दिवस स्टेटस अपडेट करत मृत्यूला सोहळ्याचे स्वरुप दिले होेते. त्यावेळी गंमत म्हणून त्याकडे पाहिले आणि दुर्लक्ष केले. पण नेपाळमधल्या प्रकारानंतर या विषयाकडे गमतीने पाहणे म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठे दोषी आपणच. अर्थात आपण काय करणार? हा प्रश्नही ओघाने येतोच. आपण प्रत्येकाला पकडून जाब विचारू शकत नाही.. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य या शब्दाचा नको तेवढा बडेजाव करून शेवटी अशा प्रकारे विरोध करणाऱ्यांना शांत बसवले जाते.

पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काहीही असू शकते का... कदाचित नेपाळमध्ये सेल्फी घेणारे हे पठ्ठे तेथील स्थानिक नसतील, पर्यटक असावेत. पण जर त्यांच्याच कुटुंबातील एखादी व्यक्ती त्या ढिगाऱ्याखाली दबलेली असती, तर त्या ढिगाऱ्यावर चढून सेल्फी काढायला ते खरंच धजावले असते? मग केवळ आपल्या स्वकीयांना काही झळ नाही, म्हणून अशा प्रकारे भावना बोथट झाल्याचे प्रदर्शन करायचे का? की आता भावनाही केवळ स्वकीयांसाठीच बाहेर पडू लागल्या आहेत ?
nitin.sultane@gmail.com