आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजघराण्यात जन्मली, प्राॅपर्टी व्यवसायामुळे कोट्यधीश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चान लाइवा यांचा जन्म शाही घराण्यात झाला, मात्र बालपण गरिबीत गेले. त्यांनी आपले भवितव्य स्वबळावर घडविले. त्यांचे जीवन श्रीमंतीतून गरिबीकडे आणि पुन्हा गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याच्या चकित करणाऱ्या प्रवासासारखे आहे.
स्वबळावर श्रीमंत होणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये आज त्यांची गणना होते. त्यांचे वय आज ७५ वर्षे आहे. त्या ५.७ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या उद्योजक असून फुवा इंटरनॅशनल ग्रुपच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे.
चीनमधील काही सर्वात चांगल्या व महागड्या प्रॉपर्टीज या कंपनीकडे आहेत. यात रिजेंट बीजिंग, चांगअल क्लब, बीजिंग हाँगकाँग जॉकी क्लब यांचा समावेश होतो. चीनच्या सर्वात मोठ्या खासगी चायना रेड सँडलवूड म्युझियमच्या त्या संस्थापक व संग्रहालयतज्ज्ञदेखील आहेत.
मांचू शाही कुटुंबात १९४१ मध्ये त्यांचा जन्म झाला. तो काळ कठीण होता. जपानी सैनिकांनी चीनच्या सीमेवर चाल केली होती. राजघराण्याचे महत्त्व लयाला जात होते. त्यांचे बालपण गरिबीत गेले. शिक्षण अपूर्ण सोडावे लागले. चानने लहानपणी आपल्या घरात रक्तचंदनाच्या अनेक शानदार कलाकृती पाहिल्या होत्या.
१९६०-७० मध्ये त्यांनी पाहिले की चंदनाच्या मौल्यवान वस्तूंना नष्ट करण्याचा सपाटा लावला होता. त्यांच्या भावानेदेखील घरातील चांगले फर्निचर काढून टाकले. एका नातलगाने जुन्या अँटिक ड्रेसिंग टेबलला कवडीमोल भावात विकले.
जुन्या वस्तू बाळगणे म्हणजे अपराध केल्यासारखे वाटण्याचा तो काळ होता. त्यांना याचे दु:ख होते. त्यांनी अशा वस्तू जमवायला सुरुवात केली. याच काळात वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी पहिला बिझनेस सुरू केला. फर्निचर दुरुस्तीचे छोटे दुकान टाकले. २० वर्षांनी त्या हाँगकाँगला आल्या. येथे त्यांनी आपले स्वप्न साकारण्याचे ठरविले.
जुने अभिजात फर्निचर रिफर्बिश करण्याचे काम सुरू केले. हाँगकाँगमध्ये बिझनेस यशस्वी ठरला. यातून मिळालेला पैसा हाँगकाँगमध्ये प्रॉपर्टी खरेदीत गुंतवला. १२ पेक्षा अधिक प्रॉपर्टीज घेतल्या. अशा रीतीने त्या प्रॉपर्टीज बिझनेसमध्ये आल्या. खरेदी-विक्री सुरू केली. कामाचा आवाका वाढला. १९८० मध्ये बीजिंगला परतल्या.
तेथेही हाच व्यवसाय सुरू ठेवला. १९९८ मध्ये वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी फुवा इंटरनॅशनल ग्रुप स्थापला. काही वर्षांतच १.५ दशलक्ष चौरस मीटर्सची प्रॉपर्टी विकसित केली. बीजिंगमधील सर्वात मोठ्या प्रॉपर्टी विकासक म्हणून त्यांची ख्याती झाली.
१९९९ मध्ये त्यांनी चायना रेड सँडलवूड म्युझियम स्थापन केले. २५ हजार चौरस मीटर परिसरात हे विकसित केले आहे. जबाबदारीची जाणीव असल्याने आपण यशस्वी झाल्याचे त्या मानतात. कंपनी आणि कर्मचाऱ्यांविषयीचे उत्तरदायित्व आहे. त्यामुळेच अधिक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. हीच जबाबदारीची जाणीव त्यांनी समाज व देशातही पेरली. ज्या कंपन्या सातत्याने चांगले काम करतात त्याच टिकाव धरतात.
त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव असते. चान म्हणतात एका आईचे काम आव्हानात्मक आणि कठीण असते. तिची करुणा आणि प्रेम समाजाच्या गरजा पूर्ण करते. २००५ मध्ये त्यांनी १३० दशलक्ष युवान आपत्ती व्यवस्थापनासाठी देणगी दिले. कंपनी चालवताना माझ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी माझी आहे अशा आैद्याेगिक विचारसरणीची मांडणी त्यांनी केली. तुमच्याजवळ अतिरिक्त पैसा असेल तर तो तुम्ही गरजवंतांना दिला पाहिजे.
या भूमिकेतूनच आपण सामाजिक स्तरावर खर्च करतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना बॉस मॉम म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...