आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणापेक्षाही जातिअंत महत्त्वाचा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


’शाळेच्या दाखल्यावरून जात काढल्याचा परिणाम राजकारणातील दलितांचे प्रतिनिधित्व कमी होण्यावर होईल का?
अ‍ॅड. आंबेडकर : माझा मुद्दा हा होता की शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख करणे बंद केले पाहिजे.याचा कोणताही परिणाम निवडणुकीच्या आरक्षणांवर होण्याची शक्यता नाही.मी ‘अमूक’ आहे, हे दाखवण्याचे अनेक प्रकार असतात. शाळेचा दाखला हा त्यापैकी एक;परंतु जातीचा दाखला काढण्यासाठी शाळेचा दाखला लागत नाही.जातीचा दाखला मिळवण्यासाठी लागणारे पुरावे वेगळे आहेत. त्यामुळे शाळेच्या दाखल्यावरची जात गेल्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची सूतराम शक्यता नाही. निवडणुकांमधली आरक्षणे किंवा राखीव जागा यासंदर्भात मी एक शब्दही बोललेलो नाही. आरक्षित जागांचा निर्णय आर्थिक निकषांच्या आधारे घ्यायचा की जातीच्या हे नंतर ठरवता येईल.
’शाळेच्या दाखल्यावरून जात
गेल्याने ती मनातूनही नाहीशी होईल?

अ‍ॅड. आंबेडकर : ‘जात’ ही मुळात एक भावना आहे. ती मानसिकता बनली आहे. ही मानसिकताच कुठे तरी बदलण्याची नितांत गरज आहे. त्याची सुरवात शाळेच्या दाखल्यावरची जात काढण्यापासून होऊ, अशी माझी भूमिका आहे. शेवटी कोणत्याही राजकारणापेक्षा जातीअंत होणे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणताही बदल सहजासहजी स्वीकारला जात नाहीच. समाजाला जातिअंताकडे नेण्याची प्रक्रिया तरी सुरू करावी लागेलच ना. त्यासाठीची अनुकूल वेळ आता असल्याचे मला दिसते. आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढले आहे. यातून निर्माण होणारी ‘नेक्स्ट जनरेशन’ कोणत्याच जातीची असत नाही; परंतु कितीही म्हटले तरी समाजात अजूनही पितृसत्ताक व्यवस्थाच बलवान आहे. त्यामुळे वडिलांची जात ‘नेक्स्ट जनरेशन’ला आपोआप चिकटते. वास्तविक या नव्या पिढीला जात दाखवण्याची गरज वाटत नाही. तरीही वडिलांची जात त्यांना स्वीकारावी लागते. माझे म्हणणे हे आहे, की ज्यांना स्वत:हून जात नाकारायची इच्छा आहे, त्यांच्या दाखल्यावरून तरी जात काढून टाका.
’दलित नेत्यांनी आपल्या भूमिकेला
विरोध केला आहे...

अ‍ॅड. आंबेडकर (उसळून) : ...मुळात कोणाला तुम्ही नेते म्हणता हाच खरा प्रश्न आहे. माझ्या भूमिकेला विरोध करणारे सगळे ‘पॅरासाइट’ (परजिवी) नेते आहेत. त्यांना स्वत:चे अस्तित्व नाही. ते कोणी विचारवंत नाहीत ना समाज त्यांच्या मागे आहे. विरोध करणा-या तथाकथित नेत्यांना जातीव्यवस्था टिकून राहावी असे वाटते. त्याशिवाय त्यांना त्यांचे राजकारण खेळता येणार नाही. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. दुस-या चीच मते ते मांडत असतात. आंबेडकरी चळवळीत या परजिवी नेत्यांना काडीची किंमत नाही. त्यांच्या शब्दाला समाजात मान नाही. त्यामुळे ज्यांना जात ठेवावी असेच वाटते, त्यांचे मत माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाही. असे असताना अकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न अशा परजिवी नेत्यांकडून होत आहे. मी त्यांना नेते मानतच नाही; परंतु माझ्या मताला एकाही लेखकाने, विचारवंताने किंवा चळवळीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोध दर्शवलेला नाही.
’शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही आपली भूमिका चांगली असली तरी त्यासाठीची वेळ अद्याप यायची असल्याचे मत व्यक्त
केले आहे...

अ‍ॅड. आंबेडकर : त्यांना मराठा समाजाला दुखवायचे नाही. एवढे जर स्वत:ला पुरोगामी समजतात तर मग दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाला सामोरे जाण्याची ताकद त्यांनी का ठेवली नाही? त्या वेळी का गप्प बसले? त्यांचे राजकारण मराठ्यांभोवती फिरते. त्यामुळे साहजिकच ते माझ्या मताशी सहमती दाखवणार नाहीत.
’तुम्ही जातिअंताची भाषा करीत असतानाच काही ओबीसी घटक ‘बौद्ध’ होऊ इच्छितात. हा समाजातला विरोधाभास आहे?
अ‍ॅड. आंबेडकर : ओबीसींमधले काही घटक बौद्ध होत असतील तर मी त्याचे स्वागतच करीन. जातीच्या जाचामुळेच त्यांना जात सोडावी लागत असावी. त्यामुळे जन्माने दिलेली जात संपवून ते बौद्ध होत आहेत. हा प्रवास एकाअर्थी जातिअंताच्याच दिशेने सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.