आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्रतस्थ अभ्यासक: अभिनिवेशरहित संवादी व्यक्तिमत्त्व...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वसंतराव पळशीकरांच्या निधनामुळे गांधी विचारांचा एक समर्थ भाष्यकार हरपला. वसंतरावांनी महाराष्ट्राला वैचारिक शिस्त शिकवली. भडक भाषेपेक्षा अचूक भाषा कशी वापरावी याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या अभिनिवेशरहित शैलीने अनेक कार्यकर्त्यांंत सकारात्मक बदल झाले. राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान, साहित्य अशा सर्व क्षेत्रात त्यांनी खूप लिहिले.

महाराष्ट्रातील प्रयोगशील शिक्षणाच्या चळवळीचे ते प्रमुख मार्गदर्शक होते. गांधीवादी असूनही त्यांनी त्यापलीकडे जाऊन तत्त्वज्ञानाची सर्वसमावेशक मांडणी केली. त्यांचे जगणे एखाद्या दुर्मिळ आणि जगणं समृद्ध करणाऱ्या ग्रंथासारखे होते.
वैचारिक निष्ठा, संशोधन प्रक्रिया आणि एकूणच ज्ञानव्यवहाराचे बाजारीकरण झाल्याच्या काळात वसंतराव पळशीकर यांच्यासारखी माणसे मिथकासारखी आहेत. त्यांच्या जाण्यातून ज्ञानावरील निष्ठेने विचारकर्म करत राहणाऱ्या पिढीचा अस्त झाल्याची जाणीव त्यांच्या जाण्याएवढीच अस्वस्थ करणारी आहे.

महाराष्ट्राच्या वैचारिक चर्चाविश्वाला सशक्त करण्यात येथील विद्यापीठीय वर्तुळाचे जेवढे योगदान आहे, त्यापेक्षा काकणभर सरस योगदान हे औपचारिकदृष्ट्या या क्षेत्राचा भाग नसलेल्या अभ्यासकांचे आहे. विद्यापीठांची ज्ञानावरील मक्तेदारी नाकारत या अभ्यासकांनी अत्यंत मूलभूत स्वरूपाचे योगदान मराठी विचारविश्वाला दिले. कॉ. शरद पाटील, डॉ. रा. चिं. ढेरे, वसंतराव पळशीकर ही त्यापैकी काही नावे.

वसंतराव पळशीकर यांच्या निधनाने या अभ्यासकांच्या पिढीतील शेवटचा दुवा निखळला आहे. वसंतराव गेली जवळपास १२ वर्षे अर्धांगवायूने आजारी होते, त्यामुळे स्थानबद्ध होते. कार्यकर्ते आणि अभ्यासक यांच्यातील दुवा बनून जगलेल्या त्यांच्यासारख्या माणसाला ही स्थानबद्धता त्रासदायकच होत असणार. मात्र, नवी काय वैचारिक मांडणी होत आहे हे जाणण्याची त्यांची इच्छा शेवटपर्यंत जिवंत होती. विचारावरची श्रद्धा आणि माणूस बदलू शकतो हा दृढविश्वास त्यांच्या पिढीच्या जीवननिष्ठेच्याच मुळाशी होता तोच वसंतरावांमध्येही ओतप्रोत होता. या जीवननिष्ठेपोटी वसंतराव पळशीकर एका व्रतस्थ अभ्यासकाचे आयुष्य जगले. त्या जगण्यात अभ्यास होता. समाजप्रबोधन होते. इंग्रजी वाचू शकणाऱ्या मराठी वाचकाला आणि आपल्या भाषेला समृद्ध करणारं लेखन करण्याची कटिबद्धता होती. पटलेला विचार स्वतः जगणं होतं आणि तो विचार घेऊन परिवर्तनाचे लढे उभारण्यासाठी उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्याचे वैचारिक भरणपोषणही होतं. वसंतराव जोपर्यंत हिंडते-फिरते होते तोपर्यंत त्यांचे हे सर्व कार्य चालू होते. ते वाईत मुक्कामी असले तरी महाराष्ट्रभर भ्रमंती चालू असे. वेगवेगळ्या गटांमध्ये वावर आणि चर्चा सातत्याने चालू असे.

१९८०च्या उत्तरार्धापर्यंत ज्या परिवर्तनवादी सामाजिक चळवळी महाराष्ट्रात उभ्या राहिल्या, त्यांच्या कार्यकर्त्यांची अनेक सकस वैचारिक शिबिरे वसंतरावांनी घेतली. वेगवेगळ्या विचारव्यूहांचे अंतरंग उलगडून दाखवणे, त्यातील विविध छटांतील फरक स्पष्ट करणे, लढे उभारताना त्यामुळे होणारे फरक स्पष्ट करणे हे अशा शिबिरांतून त्यांनी सातत्याने केले. विचार जर आचारात आणले नाहीत तर त्याला काही अर्थ नाही हे खूप स्वाभाविकपणे स्वीकारले गेलेले मूल्य आहे. मात्र, आचाराला जर विचाराची बैठक नसेल तर त्यातूनही अपेक्षित परिणाम साधणार नाही, परिवर्तन घडून येणार नाही हे मूल्य रुजविण्याचे अखंड प्रयत्न वसंतरावांनी त्यांच्या जगण्यातून केले. विचार आणि आचार यात द्वैत नाही तर द्वंद्वात्मकता असावी, परस्परपूरकता असावी हा आग्रह राहिला. त्यांचा हा वैचारिक संस्कार महाराष्ट्रातील अनेक परिवर्तनवादी संस्था-संघटना आणि व्यक्तींवर झाला याचे मोल फार मोठे आहे.

आधी प्रा. मे. पुं. रेगे यांचे सहकारी म्हणून आणि नंतर स्वतंत्रपणे ‘नवभारत’ या वैचारिक नियतकालिकाची धुरा वसंतराव पळशीकर यांनी समर्थपणे सांभाळली. गांधीविचार, लोकशाही समाजवाद आणि फुले-आंबेडकरी विचार या तिन्ही परिवर्तनवादी विचारप्रवाहांसंबंधी काही मूलभूत लेखन त्यात त्यांनी केले. ‘नवभारत’मधील त्यांनी लिहिलेली विस्तृत पुस्तक परीक्षणेदेखील अत्यंत मार्मिक आणि नवी दृष्टी देणारी आणि त्यांच्या व्यासंगाची साक्ष देणारी असत. नवनवीन साहित्यकृती चित्रपट, विविध वाङ््मयीन प्रवाह, मानसशास्त्रीय विचार, कला विचार, शिक्षण विचार अशा अनेक विषयांच्या सखोल अभ्यासातून त्यांची दृष्टी ही अत्यंत व्यापक झालेली होती. त्यामुळे विचारप्रणालीच्या बांधीवपणाचे महत्त्व मान्य करत, मात्र तिच्यातील बंदिस्तपणा नाकारत ते नव्या दृष्टीने लिहिते राहिले. मातृहृदयी आणि भावनाप्रधान म्हणून पाहिले गेलेल्या साने गुरुजींच्या लेखनातील मूल्यविचारात उलगडून दाखवणारा त्यांचा लेख असो किंवा महात्मा गांधींच्या ‘हिंद स्वराज्य’वरील त्यांचे भाष्य असो, जमातवादी राजकारणाचे विविध पोत उलगडून दाखवणारे त्यांचे लेखन असो किंवा मराठी वैचारिक साहित्याची त्यांनी घेतलेली झाडाझडती असो; संशोधक-अभ्यासक आणि कार्यकर्त्यांच्या नव्या पिढ्यांना वैचारिक खाद्य पुरविणारी अनेक बीजे त्यांच्या लेखनात सापडतात. कोणत्याही व्यक्ती, विचार किंवा प्रक्रियेकडे नव्या दृष्टीने पाहण्याची वसंतरावांची ताकद विलक्षण होती.
महाराष्ट्रात शिक्षणाच्या क्षेत्रात नवे प्रयोग करू पाहणाऱ्यांनाही वसंतराव पळशीकर यांनी महत्त्वाचे देणे दिले आहे. अध्ययन-अध्यापन पद्धतींना प्रत्यक्षतावादाच्या तावडीतून सोडवले पाहिजे या विचाराला आज सार्वत्रिक मान्यता आहे. मात्र, अशी मान्यता नव्हती तेव्हाही या क्षेत्रात काही नवे प्रयोग महाराष्ट्रात केले गेले. त्या प्रयोगांना वसंतराव कायम सहाय्यभूत राहिले. शिक्षणाच्या क्षेत्रात आज ज्ञानरचनावादाचा दबदबा आहे. वर्गात शिक्षकाच्या हुकूमशाहीला आव्हान दिले जात आहे. मात्र, शिक्षण विद्यार्थिकेंद्री आणि संवादात्मक बनविण्याचे हे प्रयत्न शिक्षणाला महागडा साधनकेंद्री तंत्रज्ञानकेंद्री व्यवहार बनून टाकत आहेत. शिक्षण खर्चिक करता आनंददायी करण्यात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे लोकशाहीकरण करण्याचे जे काही महत्त्वाचे प्रयत्न महाराष्ट्रात झाले, त्यालाही वसंतराव पळशीकर पूरक राहिले. पर्यावरणवादी विचाराला भारताच्या वर्णजातीबद्ध समाजातील विषमतेच्या संदर्भात मांडताना कोणते बदल करावे लागतील, याही संदर्भात वसंतरावांनी मोलाचे चिंतन केले होते. या दोन्हीतून परंपरा आणि नवता या दोन्हीकडे द्वंद्वात्मकपणे पाहण्याची गांधीवादी वृत्ती वसंतराव पळशीकर यांच्यात कशी मुरलेली होती याचीच प्रचीती येते. वसंतराव पळशीकर यांच्या जीवनकार्याचा यथोचित गौरव महाराष्ट्र फाउंडेशनने ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन केला होता. विचारवेध संमेलनाचे अध्यक्षपदही वसंतरावांनी भूषवले होते. हे सर्व करताना अत्यंत साधी राहणी, स्वतःची कामे स्वतः करण्याची वृत्ती ही वसंतरावांच्या आणि वेणुताई (त्यांच्या पत्नी) यांच्या जगण्यातून अगदी प्रकर्षाने जाणवत असत.

(लेखिका एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई येथे राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत.)
(chaitra.redkar@gmail.com)

गांधी विचारांचा भाष्यकार हरपला
शनिवारी सकाळी वाजता वसंतराव पळशीकर यांचे निधन झाले. गांधी विचारांचा एक समर्थ भाष्यकार हरपला. समाजवादी चळवळीतील आमच्या पिढीचे वैचारिक भरणपोषण ज्यांच्या संवादातून झाले ते मे. पु. रेगे, नरहर कुरुंदकर, विनायकराव कुलकर्णी वसंतराव पळशीकर असे चार विचारवंत होते. यापैकी रेगे सर हे सारस्वती मिश्कीलपणाने बोलत, कुरुंदकरांना वाद ओढवण्याची हौस असे, विनायकराव पार्टीची, लोहियावादाला धरून पोटतिडकीने बोलत, वसंतराव मात्र पूर्णपणे अभिनिवेशरहित पण ठामपणे मांडणी करीत. एखाद्या विषयाची ते ज्या तऱ्हेने सर्वांगाने चिकित्सा करीत, त्याचा पदरन्् पदर उलगडत जात, ते ऐकत राहावे असे वाटत राही. एखाद्या सर्जनला साजेशा शांतपणे ही प्रक्रिया चाले. त्यात कुणावरही अन्याय होऊ नये याची ते पुरेपूर काळजी घेत. समाजप्रबोधन पत्रिका नवभारत या वैचारिक नियतकालिकांत त्यांचा मोठा वाटा असे. काही वेळा पत्रिकेचे अंक तर एकटाकी लिहिल्यासारखे असत. ते केवळ लिहितच नसत, तर कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष बोलण्यातही त्यांना रस असे.

एकदा सुरेश पगारेने त्यांना धुळ्याला एका शिबिरासाठी बोलावले, त्यात मोजकेच कार्यकर्ते सहभागी होऊ शकले. सुरेश जाम वैतागला होता, पण एवढा प्रवास करून आलेले वसंतराव मात्र शांतपणे त्या मोजक्या कार्यकर्त्यांसमोरही तेवढ्याच तन्मयतेने बोलले. त्यावेळी आम्ही भडक विचारांचे होतो, वाद घालण्याची संधी शोधत असल्यासारखे वागत होतो, पण वसंतरावांनी आम्हाला वैचारिक शिस्त शिकवली. भडक भाषेपेक्षा अचूक भाषा कशी वापरावी याचा वस्तुपाठ घालून दिला! ‘असे बोलू नका’, असे ते कधीच म्हणाले नाहीत, पण त्यांच्या अभिनिवेशरहित शैलीचा नकळत आमच्यावर परिणाम होत गेला हे खरे! राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान, साहित्य अशा सर्व क्षेत्रात त्यांनी खूप लिहिले. मकरंद साठेंसारखा नाटककार असो की, भालचंद्र नेमाडेंसारखा कादंबरीकार असो, सर्वांचा पळशीकरांशी संवाद असे. पण, पुस्तकरूपाने त्यांचे लेखन फारसे उपलब्ध नव्हते. सुदैवाने किशोर बेडकिहाळसारखा समर्थ शिष्य त्यांना लाभला त्याने पळशीकरांच्या विखुरलेल्या लेखनाचे चार खंड संपादित करून मराठी विचारविश्वाला एक देणगीच दिली.
गांधी विचारांचा चिकित्सक भाष्यकार ही भूमिका त्यांनी समर्थपणे बजावली. ‘हिंद स्वराज’ या गांधींच्या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली विवेचक प्रस्तावना वाचताना भाष्यकाराचे महत्त्व समजते. किशोरने त्यांच्या लेखसंग्रहाला दिलेले ‘चौकटीबाहेरील चिंतन’ हे शीर्षक वसंतरावांच्या विचारांचे सार्थ वर्णन करणारे आहे. वसंतराव मूळचे हैदराबादचे. त्यांची एक बहीण आजही तेथेच असते. त्यांचे शिक्षण हैदराबादलाच झाले. पुढे ते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या सहवासात आले. मग ते भूदान चळवळीत सामील झाले. कोरापुट ग्रामदानाच्या कामात ते सहभागी होते. त्यांच्या पत्नी वेणूताई या दाभोळकर घराण्यातील. त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. त्यांना माधव, अनु मेघना अशी तीन मुले. गेली बारा वर्षे वसंतराव अर्धांगवायूने आजारी होते. त्यांच्या लेखसंग्रहातून त्यांचे हे विचार आपल्यासोबत कायमच राहतील हे आपले भाग्य!
- अरुण ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते

उत्तर आधुनिक तत्त्ववेत्ता पडद्याआड : मेधा पाटकर
‘वसंतरावांचेजाणेम्हणजे एका आचार-विचार संस्थेचे जाणे आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर दुनियेच्या इतिहासाचा गाढा अभ्यासक, तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांचे तज्ज्ञ, विकासाच्या संकल्पनांचे विश्लेषक आणि भविष्याचा वेध घेत पर्यायांची मांडणी हे वसंतरावांचे वैचारिक भांडवल. त्यांचे हे काम म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी भेट होती. स. ह. देशपांडेंसोबतचा त्यांचा लेखविवाद खूप गाजला होता. अत्यंत सखोल वाचन, चिकित्सा आणि सरळसुंदर भाषा ही त्यांची ठेव संपूर्ण महाराष्ट्रासाठी राहिली आहे. ‘विकास’ या संकल्पनेसोबतच ‘शिक्षण’विषयकही त्यांचे विचार अत्यंत प्रगल्भ होते. गांधीवादी असूनही त्यांनी त्यापलीकडे जाऊन तत्त्वज्ञानाची सर्वसमावेशक मांडणी केली. नर्मदा प्रश्नावर त्यांच्याशी झालेल्या चर्चा, त्यांचे खोऱ्यात येणे, आंदोलनाला व्यापक विचारांची बैठक देणे हे त्यांचे वेगळेपण पुन्हा मिळणारे. त्यांचे जगणे एखाद्या दुर्मिळ आणि जगणं समृद्ध करणाऱ्या ग्रंथासारखे होते. त्यांचे विचार आधुनिकतेपलीकडचे उत्तर आधुनिक होते.

शिक्षण आणि पर्यावरणातील तत्त्ववेत्ता : प्रा. मिलिंद मुरुगकर
‘उचितगुणअसूनही त्यांनी वैद्यकीय प्रवेशाची वाट नाकारली. कोणत्याही विद्यापीठाचा आधार घेता राज्यशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, पर्यावरणशास्त्र आणि शिक्षणशास्त्र अशा अनेक विषयांत स्वप्रेरणेने त्यांनी गती मिळविली अनेक तज्ज्ञ वसंतरावांचे मार्गदर्शन घेत. व्यासंगी लेखन, शिबिरांतील चर्चेद्वारे अनेकांच्या वैचारिक जडणघडणीत, वैचारिक जीवनात त्यांचा प्रभाव राहिला. महात्मा गांधींचा स्वतंत्र दृष्टिकोनातून तौलनिक अभ्यास करणारा पळशीकरांसारखा दुसरा माणूस नाही.’
बातम्या आणखी आहेत...