आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मौका सभी को मिलता है !’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आमदार हर्षवर्धन जाधव यांचे नाव राज्याला पहिल्यांदा समजले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मराठवाड्यातून निवडून आलेले पहिले आमदार म्हणून. त्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचे नाव राज्यभर झाले. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचे निमित्त झाले. आता पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जाधव पुन्हा चर्चेत आले. राजकीय पक्षातून बाहेर पडणा-यांचा स्वाभिमान बहुतेकवेळा दुखावतो. जाधवसुद्धा याला अपवाद नव्हते. पक्षात आपल्या मताला किंमत नाही, अशीही त्यांची भावना होती. अर्थात पक्ष सोडला असला तरी 2014 ची निवडणूक होईपर्यंत तांत्रिकदृष्ट्या ते मनसेचेच आमदार असतील.

मनसे ‘सेटलमेंट’ करते, तिकिटासाठी मनसेत लाच द्यावी लागते, असे आरोप जाधव यांनी पक्ष सोडताना केले. त्यांचे आरोप तथ्यहीन असतील, अशातला भाग नाही. परंतु, राजकीय भाषेत लाचेला ‘पक्षनिधी’ म्हणतात. राजकीय सेटलमेंट हे ‘विधायक सहकार्य’ असते. राजकारणाला या बाबी नव्या नाहीत. आरोपांना पुराव्यांची जोड नसल्याने ते अगदीच फुटकळ ठरले. लाच दिल्याशिवाय तिकीट मिळत नाही, हे सांगणारे जाधव लाचखोरीचा आरोप दुधारी असल्याचे विसरले. त्यांनी ‘मागितले’ तर तुम्ही कोणत्या मजबुरीपोटी ‘दिले’, हा प्रश्न त्यांनी फुकटच ओढवून घेतला. आरोपांची राळ उठवल्यानंतर तरी जाधव यांनी चुप्पी साधायला हवी होती; परंतु पुढची निवडणूक ‘अपक्ष’ लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. इतर पक्षात प्रवेश करणार नसल्याचा निर्णय लोकांना कळवला. तिकडे मुंबईत आमदारकीचा राजीनामा घेऊन विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचलेले जाधव तसेच माघारी का फिरले, याची वेगळीच चर्चा रंगली. ज्या ‘राष्ट्रवादी’शी मनसेने सेटलमेंट केल्याचा आरोप केला, त्याच ‘राष्ट्रवादी’शी त्यांनी जुळवून घेतले. बारामतीच्या ‘दादां’चा हात पाठीवर पडला आणि जाधवांचा राजीनामा खिशातच राहिला. दुष्काळी स्थितीत राजीनामा देणे योग्य नसल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. आता 2014 पर्यंत बारामतीकरांची जादू कायम राहिली तर विरोधकांना कोलीत मिळेल. राज ठाकरे यांच्या धोरणांवर संयमी टीका करत पक्ष सोडला असता तर ते अधिक प्रशस्त ठरले असते. दुष्काळी जनतेची होरपळ, प्रादेशिक असमतोलामुळे मराठवाड्यावर झालेला अन्याय, ऐरणीवर आलेला महिला अत्याचाराचा प्रश्न यातल्या कोणत्याच विषयावर राज ठाकरे जनतेला सामोरे गेलेले नाहीत.

बाळासाहेब ठाकरे यांचे आजारपण व मृत्यू आदी कारणांमुळे राज यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पाळलेली सार्वजनिक अलिप्तता पक्षप्रमुखाला न शोभणारी आहे. यासंबंधी भाष्य करण्याऐवजी जाधव ढगात गोळीबार करीत बसले. यामुळे जाधवांवर बरसण्याची किंवा त्यांना अनुल्लेखाने मारण्याची संधी मनसेला आयती मिळाली. कारण, ‘मौका सभी को मिलता है!’ न दिलेल्या राजीनामाप्रकरणी केलेली वक्तव्ये आणि मनसेतून बाहेर पडण्याचे ‘टायमिंग’ जाधव यांच्या अंगलट येणार का हे पुढच्या वर्षी कळेल.

‘वांजळे’ होणार का?
आमदारांची संख्या शंभरावर नेण्याचे लक्ष्य ठेवलेले अजित पवार मिळेल तेथून ताकद गोळा करीत आहेत. ‘राष्ट्रवादी’ची आमदारसंख्या वाढवण्याचे ‘कॅलिबर’ जाधव यांच्यात दिसले तर त्यांना लागेल ती रसद ते पुरवतील. निवडणूक जिंकण्याचा हा हमखास ‘फॉर्म्युला’ मात्र नाही. मनसेचे प. महाराष्ट्रातील पहिले आमदार रमेश वांजळे यांचे 2011 मध्ये निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला अभूतपूर्व गर्दी झाली. वांजळेंची प्रचंड लोकप्रियता पाहून त्यांच्या पत्नी हर्षदा सहानुभूतीच्या लाटेवर पोटनिवडणूक सहजी जिंकतील, असेच वातावरण होते. त्यामुळेच पवारांनी साम-दाम-दंड-भेद या सर्व अस्त्रांचा वापर करून हर्षदा यांना ‘राष्ट्रवादी’त आणले. घडले उलटेच. अजित पवारांचा पराभव करण्याच्या इर्षेतून मतदारांनी हर्षदा यांना घरी पाठवले. पुण्याच्या राजकीय जीवनातून सध्या ‘वांजळे’ नाव गायब आहे. कन्नडच्या मतदारांपुढे कोणत्या चेह-या ने जायचे, याचा निर्णय जाधव यांना करावा लागेल.