आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Shinde Artical On Ramdas Athwale's Politics

रामदास आठवलेंच्या राज्यसभेचे गुपित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संसदेत बसण्याचे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे स्वप्न अखेर भाजपच्या पाठिंब्यामुळे सत्यात उतरले. जो बंगला काँग्रेसने त्यांच्याकडून काढून घेतला होता आता पुन्हा त्या बंगल्यात जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु यासाठी रामदास आठवलेंना राजकारणाचे काही खेळ खेळावे लागले.
राजकारणात एखादी व्यक्ती सुडाने पेटली आणि स्वत्व गहाण ठेवून बसली की ती काय करू शकते, हे रामदास आठवले यांनी अखेर राज्यसभेवर जाऊन दाखवून दिले. राज्यसभेवर जायचे या एकाच ध्येयाने पछाडलेले रामदास आठवले यांनी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व आयुधांचा वापर केला. प्रसंगी मानहानीही पत्करली. परंतु राज्यसभेवर जाण्याचे आपले स्वप्न साकार झाल्याशिवाय गप्प बसायचे नाही. या एकाच उद्देशाने त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यात यशही मिळवले.
शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावी या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रामदास आठवले यांनी शिवसेनेशी घरोबा केला. बाळासाहेबांनी रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठवू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे रामदास आठवले त्याच आशेवर धनुष्य बाण हाती घेऊन बसले होते. महानगरपालिका निवडणुकीत पडेल जागांची मानहानी वाट्याला आली असतानाही त्यांनी केवळ राज्यसभेचे गाजर समोर दिसत असल्याने ती मानहानी सहन केली. प्रत्येक भेटीत ते केवळ राज्यसभेबाबतच विचारत असत आणि वर सांगतही असत की मी राज्यसभेसाठी येथे आलेलो नाही. तर दुसरीकडे आपल्या समर्थकांच्या मदतीने ते उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यसभेवर पाठवण्यासाठी दबाव आणत असत.
रामदास आठवले यांचा राज्यसभेचा धोशा पाहून शिवसेना नेते त्रस्त झाले होते. राज्यसभेवर नेहमी परप्रांतीयांना ते कोणत्या कारणासाठी पाठवत आले आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे रामदास आठवले यांचा राज्यसभेचा हट्ट कसा पुरवायचा हे त्यांना समजत नव्हते. रामदास आठवले सोबत होते म्हणून महायुती महानगरपालिकेवर आपली सत्ता कायम ठेवू शकली होती. त्याची कुठे आणि कशी भरपाई करावी हे त्यांना कळत नव्हते. उद्धव ठाकरे यांनी गेम खेळत रामदास आठवले यांना भाजपच्या गळ्यात बांधले. त्या वेळी बोलताना विनोद तावडे यांनी सांगितले होते की, रिपाइं हा प्रथम शिवसेनेचा मित्र आहे त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची जबाबदारी ही शिवसेनेची आहे. रामदास आठवले शिवसेना आणि भाजपमधील फुटबॉलचा चेंडू झाले होते आणि एकमेकांकडे ढकलले जात होते.
मागील वेळेस शिवसेनेने रामदास आठवले यांना सांगूनही त्यांच्याऐवजी अनिल देसाई यांना राज्यसभेवर पाठवले होते. राज्यसभा निवडणुकीआधी रामदास आठवलेंना याची आठवण झाली आणि आता राज्यसभा मिळाली नाही तर पुन्हा संधी मिळणार नसल्याने त्यांनी आरपारची लढाई लढण्याचे ठरवले. एकीकडे शिवसेना-भाजपबरोबर राज्यसभेची चर्चा सुरू करतानाच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडेही प्रयत्न सुरू केले होते. शिवसेना-भाजपला त्यांनी अल्टिमेटमच दिले होते. सध्या काँग्रेसविरोधी वातावरण असल्याने रामदास आठवलेसारखा नेता महायुतीबाहेर गेला तर सत्ता तर येणारच नाही, दलित मतांनाही विसरावे लागेल याची जाणीव महायुतीच्या नेत्यांना झाली. मात्र, उद्धव ठाकरे यांनीही राजकुमार धूत यांनाच राज्यसभेवर पाठवण्याचे ठरवले होते त्यामुळे भाजपनेच रामदास आठवले यांना कसेही करून राज्यसभेवर पाठवावे, असा सूर काढला.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे एक मुरलेले राजकारणी असल्याने त्यांना रामदास आठवलेंच्या रूपाने एक चांगली संधी दिसली. रामदास आठवले गेले तर रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून त्यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांना रामदास आठवले यांनाच राज्यसभेवर पाठवावे अशी गळ घातली. खरे तर विनोद तावडे रामदास आठवले यांची ब्याद गळ्यात बांधून घ्यायला तयार नव्हते, परंतु गोपीनाथ मुंडे यांनी राजकारण पाहिले आणि यांनी एक तीर में दोन नव्हे तर तीन निशाण गाठले. एक तर आठवले यांना भाजपने योग्य स्थान दिले असा संदेश भीमशक्तीपुढे दिला, दुसरे शिवसेनेवर कुरघोडी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही काँग्रेसने अन्याय केला होता आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी डॉ. आंबेडकरांना बंगालमधून राज्यसभेवर पाठवले असे सांगत इतिहासाची पुनरावृत्ती केली
आणि भाजप दलितांना आपले मानत असून त्यांच्या नेत्याला योग्य स्थान दिले हे दाखवून दिले. एवढेच नव्हे तर शिवसेनाप्रमुखांचे रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठवण्याचे स्वप्न आपणच पूर्ण केले हेसुद्धा शिवसैनिकांसमोर योग्यरीत्या मांडले. तसेच नितीन गडकरी यांच्या जवळचे असलेल्या प्रकाश जावडेकर यांचाही पत्ता कट केला. एकूणच राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांनी नितीन गडकरी यांच्या गटाला पुरते नामोहरम करून टाकले. एकेकाळी प्रमोद महाजन जसे शिवसेनाप्रमुखांच्या अत्यंत जवळचे होते अगदी तसेच आता गोपीनाथ मुंडे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे झाले आहेत.
खासदारकी मिळाल्यावरही रामदास आठवले यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केलीच. भाजपने आपल्या कोट्यातून राज्यसभा दिली नसती तर माझेही काही खरे नव्हते आणि तुमचेही खरे नव्हते असे सांगत आपली सुप्त इच्छा जाहीर केली. तेव्हाच त्यांच्या मनातील खासदारकी प्राप्त करण्याचा हेतू स्पष्ट झाला.
संसदेत बसण्याचे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे स्वप्न अखेर भाजपच्या पाठिंब्यामुळे सत्यात उतरले. जो बंगला काँग्रेसने त्यांच्याकडून काढून घेतला होता आता पुन्हा त्या बंगल्यात जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु यासाठी रामदास आठवलेंना राजकारणाचे काही खेळ खेळावे लागले. खासदारकी प्राप्त करण्यासाठी रामदास आठवले जो खेळ खेळले त्याचा फायदा त्यांना झाला खरा परंतु आता समाजाच्या भल्यासाठी ते त्याचा वापर कसा करणार हा खरा प्रश्न आहे.