आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शल्यकौशल्याचा ज्ञानठेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंड ही नावाजलेली संस्था आहे. या संस्थेच्या वतीने दिली जाणारी फेलोशिप ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (एफआरसीएस)  शल्यविशारदांकरिता प्रतिष्ठेची मानली जाते. मध्य लंडनमध्ये संस्थेची भव्य व्हिक्टोरियन इमारत आहे. त्यात दुसऱ्या मजल्यावर ‘हंटेरियन म्युझियम’ नावाचे एक संग्रहालय आहे. त्यात शल्यक्रियाशास्त्राच्या इतिहासाविषयी व रॉयल कॉलेजच्या इतिहासाविषयी अनेक प्रदर्शनीय स्वरूपाची माहिती दिलेली आहे.
 
शल्यक्रियाशास्त्र (सर्जरी) हे सध्याच्या घडीला अतिशय प्रतिष्ठेचे प्रगत शास्त्र मानले जाते. कात्री, सुरी, धारदार पाते ही शल्यक्रियाशास्त्रज्ञांची मूलभूत अवजारे. नाभिकांंचीही मूलभूत अवजारे हीच. खरे तर पूर्वी शल्यक्रिया नाभिक समाजातील लोकच करीत. १० व्या शतकात चर्चमधील धर्मगुरूंना विशिष्ट पद्धतीने केस कापावे लागत. त्यामुळे चर्चमधील धर्मगुरू वस्तऱ्याने एकमेकांचे केस कापत.
 
 हा वस्तरा वापरायचे कौशल्य शिकल्याने धर्मगुरू गावातील चर्चमध्ये येणाऱ्या लोकांच्या शरीरावरील गाठी कापून काढणे आणि गळू कापून पू काढणे आदी कामेही करू लागले. मात्र, १२१५मध्ये पोप ओनोरियस (तिसरा) याने फतवा काढला, की धर्मगुरूंनी लोकांच्या शारीरिक व्याधी निवारणाकडे अजिबात लक्ष देऊ नये, त्याचप्रमाणे त्यांनी शल्यक्रियासुद्धा करू नये. त्यामुळे धर्मगुरूंचे आणि इतर जनतेचे केस कापण्याचे कौशल्याचे काम करणारी ‘नाभिक’ ही जमात १३ व्या शतकात युरोपात उदयास आली. 
 
कात्री, सुरी ही अवजारे हाताळताना त्यांनी केस, नखे कापण्यासोबत हळूहळू गावातील लोकांचे दुखणारे दात काढणे, पू झालेला असेल तर तो चिरून त्याचा निचरा करणे, छोट्यामोठ्या गाठी काढणे आदी कामे सुरू केली. १३-१४ व्या शतकात विविध आजारांसाठी उपाय म्हणून ‘रक्त मोक्षण’ ही पद्धत प्रचलित होती. नाभिकांनी यातही प्रावीण्य मिळवले.
 
हे नाभिक-शल्यचिकित्सक युद्धभूमीवर सैन्यासोबत जाऊन जखमी सैनिकांवर उपचार व प्रसंगी अॅम्प्युटेशन (हात किंवा पाय कापून काढणे) अशा अवघड शस्त्रक्रियाही करीत. 
१५४० मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्रीने लंडनमध्ये ‘कंपनी ऑफ बार्बर सर्जन्स’ ही नाभिक-शल्यचिकित्सकांची संघटना स्थापन करून तिला राजमान्यता दिली.
 
ही संघटना नाभिक शल्यचिकित्सकांना परवाने देण्याचे काम करत असे. त्या काळात इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड व केंब्रिज ही दोनच विद्यापीठे होती. तेथे वैद्यकशास्त्राचा अभ्यास होत असे, पण वैद्यकीय व्यावसायिक शस्त्रक्रिया हे हलक्या दर्जाचे काम समजत, त्यामुळे ते शस्त्रक्रियेस तयार नसत. 
‘कंपनी ऑफ बार्बर सर्जन्स’ ही नाभिक शल्यचिकित्सकांची संघटना. 
 
या संघटनेचे सदस्य विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसत, पण ते विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करीत. हळूहळू त्यांनी मुतखडे व पित्ताशयातील खडे काढण्याच्या शस्त्रक्रिया करणेही सुरू केले, तसेच मोडलेली हाडे बसवणे, त्यांना लेप लावणे, हेही काम सुरू केले.
 
राजे-महाराजांच्या करमणुकीसाठी, गाणी-बजावणी करण्यासाठी त्या काळात पुरुषांना तृतीयपंथी बनवण्याची प्रथा होती, हे कामही सर्जन करू लागले. आता या सर्व कामांसाठी नाभिक शल्य चिकित्सकांना शरीररचनाशास्त्र शिकणे आवश्यक होऊ लागले. त्या कामी ऑक्सफर्डमध्ये शिकलेल्या एका वैद्यकीय व्यावसायिकांची ‘रीडर ऑॅफ अॅनाटॉमी फॉर कंपनी ऑफ बार्बर सर्जन्स’ अशी नियुक्ती केली गेली. 
 
हा शरीररचनाशास्त्र शल्यचिकित्सक सर्जन्सना शरीररचनाशास्त्राचे धडे देत असे. त्या काळात शरीररचनाशास्त्राच्या अभ्यासासाठी मानवी देहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सहजासहजी उपलब्ध होत नसे. त्यामुळे एक तर राजाने, कायद्याने फाशी/मृत्युदंडाची शिक्षा दिलेल्या गुन्हेगारांच्या देहांवर यांना काम भागवावे लागे. तेव्हा नुकत्याच मेलेल्या, पुरलेल्या माणसांच्या कबरी रात्री गुपचूप खणून तेथून मृतदेह ‘कंपनी ऑफ बार्बर सर्जन्स’च्या तळघरात आणले जात. तेथे त्यांचे गुप्ततेत शवविच्छेदन केले जाई. 
 
मानवी शरीरचनाशास्त्राचा अभ्यास अशा रीतीने शल्यचिकित्सकांनी केला, व त्याआधारे विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त चित्रे काढली, पुस्तके लिहिली. १६२८ मध्ये विल्यम हार्वे याने मानवी शरीरातील रक्ताभिसरण (हृदयाकडून रक्त शरीराच्या सर्व भागात जाते व तेथून ते हृदयाकडे परत येते) सिद्धांताची पुष्टी ही असेच प्रत्यक्ष शवविच्छेदन करून केली.
 
 याकरिता त्याने त्याच्या स्वतःच्या वडिलांचे आणि बहिणीचे (अर्थातच त्यांच्या मृत्यूपश्चात) शवविच्छेदन केले. यावरून, त्या काळातील वैद्यकीय अभ्यासकांच्या अडचणी आणि त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून येते. हे नाभिक शल्यचिकित्सक लंडन आणि युरोपात हळूहळू भरभराटीस आले, ते व्यवसायाची खूण म्हणून,  जाहिरात म्हणून, खिडकीत नारळाची करवंटी (ज्यात ते रक्तमोक्षण केल्यावर वाहणारे रक्त जमा करीत), रुग्णांच्या काढलेल्या दातांच्या माळा, आदी वस्तू लावू लागले. 
 
विद्यापीठीय शिक्षण नसल्यामुळे दुसऱ्या नाभिक शल्यचिकित्सकाकाडे उमेदवारी करून नंतर ‘कंपनी ऑफ बार्बर सर्जन्स’कडून परवाना घेऊन व्यवसाय सुरू करीत. त्यांच्यापैकी काही विद्यापीठातही शिकायला जात, पण त्या काळात शल्यक्रिया करणे हे हीन दर्जाचे समजले जाई, त्यामुळे विद्यापीठात त्यांना ‘तोकडे कपडे’ घालून जावे लागे, जेणेकरून वैद्यकीय शिक्षण घेणारे इतर विद्यार्थी जे ‘लांब कपडे’ घालत, त्यांच्यापासून यांना वेगळे ओळखले जाई. 

‘अॅम्बॉईस पेरे’ ज्यास आधुनिक सर्जरीचा जनक असे संबोधले जाते, हाही मूळचा नाभिकच होता. फ्रेंच ब्रिटिश युद्धातील जखमींना त्याच्या कौशल्याने पुनर्जन्म मिळाला. हे सर्व करत असताना हे सर्व शल्यचिकित्सक त्यांचे मूळचे केशकर्तनाचेही काम करत होते. १८ व्या शतकाच्या मध्यात मात्र या दाेघा शल्यचिकित्सकांत वेगळेपणाची भावना सुरू झाली. परिणामतः १७४५ मध्ये (म्हणजे जवळजवळ २०० वर्षांनी) ‘कंपनी ऑफ बार्बर सर्जन्स’ची विभागणी “कंपनी ऑफ बार्बर्स’ आणि “कंपनी ऑफ सर्जन्स’ अशी झाली. 
 
इ.स.१८०० मध्ये “कंपनी ऑफ सर्जन्स’ला “रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ असे नाव देण्यात आले. ‘जॉन हंटर’ हा १७४८ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी लंडनमध्ये आला. त्याचा भाऊ ‘विल्यम हंटर’ हा त्या काळी लंडनमध्ये नावाजलेला शरीररचना शास्त्रज्ञ होता. जॉन हंटरने त्याच्या भावासोबत शरीररचना शास्त्रात काम करायला सुरुवात केली. त्याने मानवी मृतदेहांचे जतन करण्याच्या नव्या पद्धती अवलंबल्या, त्याचप्रमाणे विच्छेदित केलेले अवयवही त्याने व्यवस्थित जपून ठेवले. 
 
जॉन हंटरचे शवविच्छेदन टेबल अजूनही रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या हंटेरियन म्युझियममध्ये जपून ठेवलेले आहे. त्याचा मृत्यू १७९३ मध्ये झाला, त्या वेळी त्याने जपून ठेवलेले जवळजवळ १७,००० नमुने (शवविच्छेदित भाग) त्याच्या लंडनमधील लेस्टर स्क्वेअरच्या घरात होते. 
 
हे सर्व पुढे ब्रिटिश शासनाने विकत घेतले व रॉयल कॉलेजला दान केले. त्यांचे उत्कृष्ट संग्रहालय ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’च्या दुसऱ्या मजल्यावर पाहायला मिळते. दुसऱ्या महायुद्धात यातील काही भाग बॉम्बवर्षावात खराब झाले, पण बरेचसे भाग लंडनवासीयांनी भुयारांत सुरक्षित नेऊन ठेवले होते.
 
 या हंटेरियन संग्रहालयाला भेट दिल्यावर मध्ययुगात शरीरचनाशास्त्राच्या अभ्यासात संशोधकांना किती अडचणीतून मार्ग काढावा लागला, याची जाणीव होते. मानवाची ‘अज्ञाताचा शोध’ घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीही यातून प्रतीत होते. शल्यक्रियाशास्त्राच्या प्रगतीसाठी नाभिक व शरीररचना शास्त्रज्ञांनी दिलेले योगदानही यातून लक्षात येते.
 
shekhar1971@gmail.com
बातम्या आणखी आहेत...