आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrkat Shinde Article About Bjp, Divya Marathi

भाजपचा पश्चिम महाराष्ट्रात नमो मंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आघाडी सरकारविरुद्ध जनतेत असलेला आक्रोश, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, घोटाळे असे अनेक मुद्दे समोर असतानाही भाजपा फक्त नमो मंत्र जपत आहे. या नमो मंत्राच्या उच्चारवाने संपूर्ण देशात यश प्राप्त करण्याचे स्वप्न पाहात आहे. पश्चिम महाराष्ट्रातही अन्य मुद्द्यांपेक्षा भाजप नमो मंत्रावरच जास्त भर देत असल्याचे दिसून आले.

दृश्य एक - माढातील महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांची माढा चौकातील भर दुपारची सभा. मंचाच्या पाठीमागे लावलेला एक भव्य पोस्टर. पोस्टरच्या एका बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो. दुसर्‍या बाजूला भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो. मधल्या मोकळ्या जागेत शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या नेत्यांचे फोटो. उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्ह कोठेही दिसत नव्हते. रणरणत्या उन्हात समोर बसलेल्या माढावासियांपैकी काहींच्या डोक्यावर भगव्या टोप्या ज्यावर नरेंद्र मोदींचा फोटो आणि गळ्यात उमेदवाराचे चिन्ह असलेली शिटी.

उमेदवार सदाभाऊ खोत आपल्या भाषणात शरद पवार, आर.आर. पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर टीका करतात. देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान हवा असा उल्लेख केला जाताच उपस्थित चारशे-पाचशे जणांच्या तोंडातून आरोळ्या आणि शिट्या बाहेर पडतात. सदाभाऊ खोत यांच्या तोंडून जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदींचा उल्लेख झाला तेव्हा तेव्हा उपस्थितांनी चित्कार केला. नरेंद्र मोदींचा असा हा प्रभाव पाहून आश्चर्यच वाटले. भाजपाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख करीत मते मागितली तर त्यात आश्चर्य नाही, परंतु महायुतीतील एका पक्षाच्या उमेदवाराने सतत नरेंद्र मोदींचा धोशा लावणे चकित करणारेच होते.

दृश्य दोन - आटपाडीमधील बाजार पटांगण. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांची प्रचार सभा. सदाभाऊ खोत यांच्या सभेत नरेंद्र मोदी यांच्याबाबत जो उत्साह दिसला अगदी तसाच उत्साह या सभेतही दिसला. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी आपल्या भाषणात मोदींवर जास्त भर दिला. मोदींचे नाव घेताच होणारा चित्कार, उडवले जाणारे फेटे आणि मोदी मोदी अशा घोषणा यावरून भाजपाकडे नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा कोणताही मुद्दा नाही की काय असा प्रश्न मनात उद्भवत होता. विनोद तावडे, नरेंद्र मोदींसारखा कणखर पंतप्रधान हवा असे सांगत पाकिस्तान, बांग्लादेश, अतिरेक्यांचा हल्ला असा उल्लेख करीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या चेल्याला पंतप्रधानपदी बसवा, असे आवाहन मतदारांना करीत होते.

माढा चौकातील पानपट्टी चालवणार्‍या 18 वर्षांच्या दीपक नावाच्या तरुणाला नरेंद्र मोदी यांचे नाव ठाऊक आहे का विचारता तो म्हणाला, हो. ते पंतप्रधान होणार आहेत असे त्याने उत्तर दिले. सदाभाऊ खोत आणि पद्मसिंह पाटील यांच्यापैकी कोण जिंकेल असे विचारता त्याने सांगितले सदाभाऊ खोत. नरेंद्र मोदी यांच्यामुळे त्यांना मते मिळतील. पश्चिम महाराष्ट्रात मावळ, पुणे, बारामती, शिरूर, सांगली, सातारा, माढा, सोलापूर, कोहापूर, शिर्डी आणि हातकणंगले अशा 11 लोकसभेच्या जागा आहेत. या संपूर्ण मतदारसंघांमध्ये महायुतीतर्फे प्रचाराची राळ उडवली आहे. विशेष म्हणजे अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून रिपाइंचे रामदास आठवले यांच्यापर्यंत सगळेच आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.

विनोद तावडे यांच्याशी मोदी मंत्राबाबत बोलणे केले असता त्यांनी सांगितले, नरेंद्र मोदींच्या रूपाने भारतीय जनतेला एक चांगला पंतप्रधान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदींच्या नावावर मते मागण्यात काहीही चूक नाही. शेवटी येथील खासदार हे केंद्राकडूनच मदत घेऊन येतात. आपला पंतप्रधान असेल तर ही मदत आणणे सोपे जाते म्हणूनच आमचे नेते आणि उमेदवारही नरेंद्र मोदींच्या नावाने मते मागत आहेत. एकूणच महायुतीला पश्चिम महाराष्ट्र काबीज करण्यासाठी मोदी मंत्राचा वापर करावा लागत आहे. या मंत्राचा कितपत फायदा होतो ते लवकरच कळेल.