आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१९५८ मध्ये पहिल्या टॉय सुपरमार्केटची सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन मध्ये जन्मलेल्या चार्ल्स लेझारस यांच्या वडिलांचे सायकल स्टोअर होते. लहानपणापासूनच लेझारस हे वडिलांच्या कामात हातभार लावत असत व एके दिवशी आपले स्टोअर थाटण्याचे स्वप्न पाहत असत. त्यानंतर लहान मुलांसाठी काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. हा दुसर्‍या महायुद्धानंतरचा काळ होता. अमेरिकेत चाइल्ड-ओरिएंटेड बिझनेससाठी अनुकूल वातावरण होते. १९४८ मध्ये लेझारस यांनी वॉशिंग्टनमध्ये बेबी फर्निचर स्टोअर सुरू केले. ग्राहक येऊ लागले, मात्र लोक लहान मुलांसाठी खेळण्यांची मागणी करू लागले. लेझारस यांनी शिशू आणि नंतर प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी खेळण्या विकायला सुरुवात केली.

१९५७ वर्षांत पदार्पण करताना स्टोअरमध्ये फर्निचरपेक्षाही जास्त खेळण्याच विकल्या जाऊ लागल्या. ख्रिसमसच्या काळातच खेळण्यांना जास्त मागणी होती. मात्र लेझारस यांना १२ महिने ग्राहकांशी नाते जोडायचे होते. १९५८ च्या सुमारास त्यांनी पहिल्या टॉय सुपरमार्केटची सुरुवात केली. त्याचे नाव ‘टॉयज् आर. एस.’ असे ठेवले.

लेझारस यांच्या सुपरमार्केटमध्ये रिटेल बिझनेसच्या सर्व ट्रिक वापरल्या जाऊ लागल्या. ज्यादा विक्री होणार्‍या उत्पादनांची संख्या जास्त ठेवू लागले आणि ग्राहकांना सवलत देण्यासही सुरुवात त्यांनीच केली. ग्राहक संतुष्टीसोबत ते कर्मचार्‍यांनाही समभाग देऊन समाधानी ठेवत. त्यामुळे काही वेळातच लेझारस यांचा व्यवसाय एवढा विस्तारला की त्यांना एकट्याला त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाऊ लागले. १९६७ मध्ये त्यांनी कंपनी विकली, परंतु व्यवस्थापनात स्वत:चे स्थान कायम ठेवले.

लेझारस यांनी कंपनी विस्ताराच्या उद्देशाने विकली, मात्र विपरीत परिणाम झाले. कंपनीच्या नव्या मालकाचे दिवाळे निघाले आणि लेझारस यांनी पुन्हा एकदा कंपनीची जबाबदारी घेतली. १९७८ मध्ये नव्या रुपात टॉयज आर. एस. ने पुनर्पदार्पण केले.

१९८३ पर्यंत टॉयज आर.एस. ची वार्षिक उलाढाल १ अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली. अमेरिकेतील २२ राज्यांमध्ये १४४ स्टोअर्स सुरू झाले. कंपनीने क्लोदिंग आणि कॉम्प्युटर व्यवसायातही पदार्पण केले. १९८४ मध्ये देशाबाहेर प्रथमच सिंगापूर आणि कॅनडामध्ये स्टोअर्स सुरू झाले. १८८९ पर्यंत कंपनीची वार्षिक उलाढाल ४.३ अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त झाली होती. १९९४ मध्ये लेझारस यांच्या माघारी कंपनीची परिस्थिती पुन्हा ढासळू लागली. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची लोकप्रियता वाढू लागली. मात्र कंपनीला यापासून दूर राहायचे होते. १९९८ मध्ये इंटरनेट क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर ही स्थिती सुधारली. कंपनीची वेबसाइट टॉय व बेबी प्रॉडक्ट्सच्या शॉपिंगसाठी लोकप्रिय ठरु लागली. सध्या कंपनीचे केवळ अमेरिकेत ८७२ स्टोअर्स व जगभरातील ३५ पेक्षा अधिक देशांमध्ये कंपनीचे स्टोअर्स परवान्यासह सुरू आहेत.