आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्धवचा मीडिया स्टंट - Divya Marathi
उद्धवचा मीडिया स्टंट

उद्धवचा मीडिया स्टंट
निवडणुका जवळ आल्या की सामान्य माणसाबद्दल बोलण्याचे दिवस आता इतिहासजमा झालेत की काय, अशी शंका येण्याइतपत परिस्थिती बदलताना दिसते आहे. कुणा स्वबळावर लढण्याचे संकेत देत आहेत, तर कुणी आघाडीचे महत्त्व पटवून देत आहे. तिकडे मॅरेथॉन मुलाखतीद्वारे उद्धव यांनी भरतभेटीचा देखावा तयार केला आहे. थोडक्यात व्यायामशाळेत पहिलवान दहा जोरबैठका मारल्यावर आरशासमोर येऊन बेडक्या फुगवून बघतो त्याप्रमाणे हे सर्व चालले आहे. याचा दुसरा अर्थ असा की, उगाच एखादे विधान पेरायचे व त्यावरची मीडिया, जनता, कार्यकर्ते व समोरील पार्टीची प्रतिक्रिया चाळून पाहायची हे चाललेय. हा खेळ आता लोकांनाही कळतो. मात्र प्रेसला खमंग बातम्या हव्याच असतात. मीडियात या विधानाला किती प्रसिद्धी वा फुटेज मिळते यावर नेते उगाचच फुगतात. वास्तविक जनमानसात यांना स्थान नसतेच. म्हणूनच एका दगडात दोन नव्हे, तीन-तीन पक्षी मारण्याचा हा प्रकार असतो. म्हणजे बघा 1. वर म्हटल्याप्रमाणे सर्वांची प्रतिक्रिया ताडणे 2.प्रसिद्धी मिळवणे 3. इतरांना चुचकारणे होय. कारण स्पष्टच आहे. स्वबळावर एवढ्या सीट येणार नाहीत याबद्दल दोघेही ठाम आहेतच (मनातून) म्हणूनच ही चर्चा सुरू करायची. उद्या जे करावे लागणार ते आजच आडून आडून का करू नये असे ते आहे. ताकाला जाऊन भांडे लपवता येत नाही, तसे यांचे झाले आहे. वाक्य फेकून प्रतिक्रिया पाहणे व करणे आपल्या मनातील व विरुद्धच्या या खेळात पूर्वी व आताही शरद पवार साहेबच फक्त निष्णात आहेत असे वाटायचे. आता मात्र ही ज्येष्ठ पोरेही (उद्धव-राज) पवार साहेबांची ही कला शिकलेत, एव्हढंच म्हणायचं. यातही पुन्हा एकमेकांना जोखणे हे आहेच. एका दगडात दोन पक्षी मारणे हे देखील दिसतेच आहे. थोडक्यात काय तर दोन भावांमध्ये लोकमात्र उगाच भाऊक होतायत.

अजुनी आशा आहे
काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांच्या निधनाला आता पाच महिने होत आले आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, अशा पहिल्या दिवसापासून बातम्या होत्या. मात्र पाच महिन्यांनंतरही त्या केवळ बातम्याच राहिल्या आहेत. दिल्लीत लॉबिंग करूनही अमित देशमुख यांच्या पदरात अद्याप तरी काहीच पडलेलं नाही. त्यामुळे ते सध्या हवालदिल आहेत. दर महिना-पंधरा दिवसांनी मंत्रिमडळ विस्ताराची टूम काढली जाते. त्या वेळी अमित देशमुख यांचे नाव त्यात आवर्जून असतेच. मात्र काहीतरी निमित्त होतं आणि विस्ताराचा मुहूर्त लांबणीवर पडतो. अजित पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्या वेळी अमित देशमुखांना शपथविधीसाठी तयार राहायला सांगण्यात आले होते. मात्र ऐनवेळी कुठे माशी शिंकली कोण जाणे. आता लोकसभा निवडणुका जसजशा तोंडावर येऊ लागतील, तसतसे मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळत जाईल. त्यामुळे अमित देशमुखांना कदाचित लाल दिव्यासाठी पुढच्या टर्मपर्यंत वाट पाहावी लागते की काय, अशी स्थिती आहे. मात्र अमित देशमुखांनी अजूनही आशा सोडलेली नाही.

हम हैं राही लोकपाल के
पूर्वीचे चित्रपट व आताचे चित्रपट यात जो काही फरक आहे तोच अन् तेवढाच फरक पूर्वीचे आंदोलन व आताचे आंदोलन यात आहे. आताची आंदोलने वर्तमानातील चित्रपटाप्रमाणे आठ-दहा दिवसांचे आयुष्य घेऊन जन्माला येतात. आता अण्णांचे आंदोलनच बघा ना. आठ-दहा दिवसांवर गर्दी खेचत नाही. मात्र आठ-दहा दिवस सुपरहिट, रेकॉर्डब्रेक कसे असते. सहा-आठ महिन्यांचा गॅप दिला की पुन्हा नव्या दमाने नाव बदलून दुसरा रिलीज करायचा. ‘दबंग 2’ सारखे. बरे प्रत्येक वेळी जागाही बदलणे काळाची गरज होऊन बसली की काय, असे जाणवण्याइतपत स्थिती आहे. कधी मुंबई, कधी दिल्ली तर कधी पाटणा. बरोबरच आहे म्हणा, एकाच शहरातील लोकांना कामे सोडून येणे किती दिवस जमणार? नेमके हेच हेरून अण्णांनी आता आंदोलनाची सुरुवात केली ती पाटण्याहून. रिलीज झाल्यावर दोन-तीन दिवस चित्रपटाला मिळतो तसा उदंड प्रतिसाद मिळाला. हम हैं राही प्यार के..., या आमिर-जुहीच्या चित्रपटात एक गाणे होते : बंबई से गई पूना, पूना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना, फिर भी ना मिला सजना. तसेच अण्णांच्या आंदोलनाचेही होत आहे. बंबई से आया पूना. पूना से आया दिल्ली, दिल्ली से गया पटना फिर भी ना बना लोकपाल, असे गुणगुणण्याची वेळ लोकपाल रसिकांवर आली आहे.

प्रादेशिक वादाचा विसंवाद
मदत व पुनर्वसन कार्यमंत्री पतंगराव कदम हे दुष्काळाचा मदत निधी देताना मराठवाडा-विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असा भेदभाव करत असल्याचा आरोप मंत्रिमंडळाच्या बैठकीतच झाला होता. यावर त्यांनी सांगलीत पत्रकार बैठक घेऊन ‘मी असा कोणताही भेदभाव करत नाही’ असे स्पष्ट केले खरे; मात्र ‘मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी आमच्याकडे निधीची मागणीच केली नाही,’ असे सांगून आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना अंगावर घेतले. उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी कोणत्या कामासाठी किती निधी मागितला, याची यादी पेश करून पतंगरावांच्या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. पतंगरावांच्या म्हणण्यात तथ्य असेलही; मात्र त्यामुळे मूळ दुष्काळी निधीचा प्रश्न सुटण्याऐवजी प्रादेशिक वादाचा विसंवाद वाढत गेला, हेच खरे.