आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले दत्तक घेण्याची आशा मावळतेय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेब्रिएले शिमकस कार चालवत घरी जात असतानाच त्यांचे पती फ्रेंक यांनी त्यांना आनंदाची बातमी कळवली. ते म्हणाले की, त्यांनी आपल्याला मुलगा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सप्टेंबर 2008 चे ते दिवस होते. मुलांना दत्तक देणा-या एजन्सीने ई-मेलवर अडीच वर्षांच्या एका मुलाचा फोटो पाठवला होता. किर्गिस्तानातील एका अनाथाश्रमात तो होता. त्याचा एक ओठ कापलेला होता. गेब्रिएले सांगतात, सुरुवातीला तो भीतिदायक वाटला होता. खूप छोटा आणि कमकुवत; परंतु चार महिन्यांपासून मुलगा दत्तक घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिमकस दांपत्याला त्याचा लगेच लळा लागला. गेब्रिएले त्या अनुभवांच्या आठवणीत रमून जातात. त्या म्हणतात, तो माझा मुलगा आहे.

एदान असे मुलाचे नामकरण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. घरात त्याच्यासाठी एक खोली सजवण्यात आली. दत्तक घेण्याच्या प्रक्रियेअंतर्गत या दांपत्याला किर्गिस्तानात एदानसोबत दहा दिवसांचा मुक्काम करायचा होता. 30 दिवसांनंतर न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्यांना न्यायालयात हजर व्हायचे होते. 32 वर्षीय गेब्रिएले आणि 61 वर्षीय फ्रेंकने बिश्केकच्या बालगृहात मुलाची भेट घेतली. तो नवजात बालकांप्रमाणे वाटत होता. चेह-यावरील विकृतीमुळे त्याला खाण्यास त्रास होत होता. त्यामुळे तो अशक्त होता. मुलासाठी प्रोटिनयुक्त जेवणाची सोय केली गेली. दुसरीकडे, फेब्रुवारी 2009 मध्ये किर्गिस्तानने भ्रष्टाचारांच्या आरोपांनंतर आंतरराष्ट्रीय दत्तक देण्यावर बंदी घातली. मुलांना दत्तक घेण्यासाठी आतुर झालेल्या शिमकस दांपत्यासह इतर 64 कुटुंबांचे स्वप्न यामुळे भंगले. अमेरिकी कुटुंबांत दरवर्षी हजारो परदेशी मुले दत्तक घेतली जातात; परंतु आता गरीब देशांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा, उदयास येणा-या राष्ट्रवादासह इतर कारणांमुळे दत्तक देण्याविरोधात वातावरण निर्माण झाले आहे.

फसवणूक आणि भ्रष्टाचार
अनेक देशांनी अव्यवस्था, फसवणूक आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या किचकट प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी दत्तक प्रक्रियेवर निर्बंध घातले आहेत. विदेशी पालक मुलगा दत्तक घेण्यासाठी 20 हजार ते 50 हजार डॉलरपर्यंत खर्च करू शकतात. प्रक्रियेदरम्यान अनेक सरकारी विभागांचा सामना करावा लागत असल्याने यात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असते. मुले चोरण किंवा अपहरणासारखे प्रकारही घडतात. ग्वाटेमालामध्ये सरकार आणि लक्ष ठेवणा-या गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे तयार करणे, नवजात बालकांना विकत घेणे आणि रुग्णालयातून मुले चोरण्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. येथे 2008 मध्ये विदेशी दत्तकावर बंदी घालण्यात आली. यापूर्वी ग्वाटेमालातून जवळपास पाच हजार मुले अमेरिकेत दत्तक घेतली जात. एक आंतरराष्ट्रीय करार ‘हेग अ‍ॅडॉप्शन कन्व्हेंशन-1993’ नुसार मुले दत्तक घेण्यासाठी समान नियम करण्यात आले आहेत. या करारावर 89 देशांच्या स्वाक्ष-या आहेत; परंतु अनेक देशांत या कडक नियमांचे पालन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. अनैतिक सौदेबाजी रोखण्याचा मार्ग मात्र खुला झाला आहे.

समृद्धीमुळे झाले परिवर्तन
आर्थिक परिस्थिती सुधारल्याने अनेक देशांचा दत्तक देण्याविषयीच्या दृष्टिकोन बदलला आहे. पूर्वी चिनी मुले मोठ्या प्रमाणावर विदेशात दत्तक घेतली जात. 1999 ते 2007 दरम्यान अमेरिकी कुटुंबांनी 5,37,30 चिनी मुलांना दत्तक घेतले होते. मागील दशकात अर्थव्यवस्थेने भरारी घेतल्याने यात घसरण झाली. चीनने 2007 मध्ये विदेशी दत्तक देण्याचे नियम आणखी कडक केले. यानुसार, संबंधित पालक लग्न झालेले आणि 55 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत, ते स्थूल असू नयेत, चेह-यावर गंभीर विकृती नसावी. यानंतर अमेरिकी कुटुंबीयांतर्फे दत्तक घेतलेल्या चिनी मुलांची संख्या 2011 मध्ये घसरून 2587 वर आली. 2005 मध्ये ही संख्या 7903 होती.

प्रतिष्ठेचा मुद्दा
विदेशी नागरिकांना मुले उपलब्ध करून देणारे अनेक देशांचे नागरिक ‘आंतरराष्ट्रीय दत्तक’ हे आपले अपयश मानतात. दत्तक देणारी संस्था ग्लेडनी सेंटरचे प्रमुख फ्रेंकट गॅरट सांगतात, जे देश विकसित जगाचा भाग बनू इच्छितात, त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांचे योग्य पालन-पोषण हे यशस्वितेचे एक परिमाण आहे. कोरियन युद्धानंतर 40 वर्षांनीही दक्षिण कोरियातून सर्वाधिक मुले अमेरिकेत दत्तक घेतली जात; परंतु वाढती श्रीमंती आणि 1988 च्या सेऊल ऑलिम्पिकच्या यशस्वितेनंतर उदयास आलेल्या राष्ट्रवादाच्या भावनेमुळे ‘आंतरराष्ट्रीय अ‍ॅडॉप्शन’ विरोधात वातावरण तयार झाले आहे. परिणामी 2011 मध्ये अमेरिकी लोकांनी केवळ 736 दक्षिण कोरियन मुले दत्तक घेतली.

किर्गिस्तानचे सामाजिक विकास उपमंत्री एदिल बॅसोलोव्ह सांगतात की, राष्ट्रवादाच्या भावनेशी खेळणा-या राजकीय नेत्यांना मुलांच्या चांगल्या पालन-पोषणाची काळजी कुठे आहे? रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अमेरिकी नागरिकांच्या रशियन मुलांना दत्तक घेण्यावर बंदी घालत म्हटले होते, जगात आमच्यापेक्षाही इतर ठिकाणी राहणीमान चांगले असले तर आम्ही काय आमच्या मुलांना तिथे पाठवायचे? का आम्ही तिथे जायचे? संयुक्त राष्ट्र संघटना युनिसेफही ‘आंतरराष्ट्रीय अ‍ॅडॉप्शन’ कमी करण्याच्या मताची आहे. संस्थेच्या बाल संरक्षणप्रमुख सुसान बिसेल सांगतात, राहणीमानात सुधारणा आणि कौटुंबिक मूल्यांना प्रोत्साहन देत दत्तक देणे थांबवण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. दुसरीकडे, शिमकस दांपत्याने चार वर्षांनंतरही आशा सोडलेली नाही. त्यांच्याकडे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन प्रक्रियेच्या माध्यमातून दोन मुलांचा जन्म झालाय. तीन वर्षांची इमर्सन आणि दोन वर्षांची ग्रेसनही किर्गिस्तानातून आपला भाऊ येण्याची वाट पाहत आहेत.

अमेरिका आघाडीवर - आंतरराष्ट्रीय दत्तक घेण्याची लाट दुस-या महायुद्धानंतर आली. 1948 ते 1953 दरम्यान पश्चिम युरोपातील 5800 आणि आशियातील 2400 मुले अमेरिकेत दत्तक घेण्यात आली.ही मुले अनाथ आणि बेघर झाली होती. कोरियन युद्धानंतरही अशीच लाट आली होती. राष्ट्रीय दत्तक परिषदेचे सीईओ चक जॉन्सन सांगतात, एक काळ असाही होता की, जेव्हा सर्व देशांतर्फे दत्तक घेतलेल्या मुलांपेक्षा जास्त मुलांना अमेरिकेत नवे घर मिळाले. 2010 मध्ये अमेरिकींनी 11000 विदेशी मुलांना दत्तक घेतले. यानंतर इटलीत 4130 आणि फ्रान्समध्ये 3504 मुले दत्तक घेतली गेली.

कडक नियम-कायदे - किर्गिस्तानसह अनेक देशांनी नुकतीच मुले दत्तक घेण्यावर बंदी घालणे किंवा ही प्रक्रियाच कठीण करण्यासाठी उपाय केले आहेत. या यादीत रशिया हे नवीन नाव आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अमेरिकी नागरिकांना रशियन मुले दत्तक घेण्यावर बंदी घातली आहे. या सा-याचा परिणाम होत आहे. अमेरिकी कुटुंबांतर्फे दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांच्या संख्येत 2004 च्या तुलनेत 60 टक्के घसरण झाली आहे. परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार त्यावर्षी 22,991 विदेशी मुले दत्तक घेतली गेली. दत्तक यादीच्या प्रतीक्षेनंतरही 2011 मध्ये 9319 विदेशी मुले दत्तक घेतली गेली.