आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिट फंड घोटाळ्यांची मालिका का संपत नाही ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात चिट फंड नवा नाही. मुलाचे, मुलीचे लग्न असो किंवा आई-वडिलांचे अचानक उद्भवलेले आजारपण, अशा परिस्थितीत चिट फंड नेहमीच मदतीला धावून येतो. ही व्यवस्था सोपी आणि फायद्याचीसुद्धा आहे; पण चिंट फंड समूह विश्वसनीय असावा ही पहिली अट आहे. यात लालसा जागी झाली की पैसे बुडण्याची शक्यता वाढते.


चिट फंड म्हणजे कायद्यानुसार ‘चिट’- चिट, चिट फंड, चिठ्ठी किंवा दुस-या कुणाच्या नावाने होणा-या देवाणघेवाणीचा करार. यात एक व्यक्ती इतर व्यक्तींसोबत किंवा एखाद्या समूहाशी करार करते, त्याअंतर्गत ठरावीक रक्कम, ठरावीक कालावधीत देण्याचे आश्वासन देतो. करारात उल्लेख केल्याप्रमाणे ठरावीक वेळेला म्हणजे क्रमानुसार किंवा बोली लावून रक्कम मिळवली जाते. कंपनी व्यवहार मंत्रालयानुसार देशात 4,256 चिट फंड कंपन्या आहेत. त्यांची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर आहे.


नफ्याची लालसा- बहुतांश चिट फंड कंपन्या ठरावीक काळानंतर मल्टिलेव्हल मार्केटिंगमध्ये उतरतात. सदस्यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून नवे सदस्य जोडण्यास सांगतात. वर्ष, महिने किंवा काही दिवसांत पैसे दुप्पट किंवा तिप्पट करून मिळतील, असे सांगितले जाते. शारदा ग्रुपने केवळ चार वर्षांत पश्चिम बंगाल तसेच झारखंड, ओडिशा आणि पूर्वोत्तरमध्ये 300 कार्यालये उघडली. दोन लाख एजंटही बनवले; पण ग्रुपचा पैसाच दुप्पट, तिप्पट झाला नाही तर तो सदस्यांना काय देणार? समूह बुडणार हे निश्चित होते. ही कहाणी फक्त शारदा ग्रुपची नाही, तर याधीही पश्चिम बंगालमध्येच 1980 च्या दशकात 120 कोटी रुपयांना गंडा घालून संचयिता इन्व्हेस्टमेंट बंद झाली होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव म्हणतात की, जेव्हा कोट्यवधी रुपये गिळंकृत करून चिट फंड कंपन्या बंद होतात, तेव्हाच त्यांच्या दाव्यांची पोलखोल होते.


बँक सुविधा वाढवाव्या लागतील- चिट फंड फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँक हाच एकमेव पर्याय आहे; पण देशातील 70 कोटी लोकांकडे बँक सुविधा नाहीत. गरज पडल्यास कर्ज घेणेही सोपे नाही. एखादा व्यवसाय सुरू करणा-या महिलांना बँकेकडून ‘तुमचे क्रेडिट नाही’ असे ऐकावे लागते. अशा वेळी चिट फंडच मदतीला येतो. चिट फंडच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँक व्यवस्था आणखी बळकट आणि सहज बनवायला हवे.