आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद झालेली कवाडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिपब्लिकन पक्षाचे नेमके किती तुकडे झाले हे रिपब्लिकन नेतेही सांगू शकणार नाहीत. इस दिल के टुकडे हजार हुए, कही यहा गिरे कही वहा गिरे, अशी या पक्षाची अवस्था आहे. अर्थात हृदयाचे तुकडे हजारच झाले, पण रिपब्लिकन पक्षाचे तुकडे मोजता न येण्याइतके झाले. त्यामुळे जनतेचे हृदय विदीर्ण झाले हे कुणीच लक्षात घ्यायला तयार नाही. आंबेडकरी जनतेला रिपब्लिकन ऐक्य व्हावे, असे आजही वाटते, पण प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले हे आंबेडकरी नेते रिपब्लिकन ऐक्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसून येते.


जोगेंद्र कवाडे यांनी पी. रिपा नावाचा पक्ष काढला. प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ आहे, तर रामदास आठवलेंचा स्वतंत्र गट आहे. अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांचा बहुजन रिपब्लिकन एकता मंच आहे. खोरिपा अस्तित्त्वात असल्याचे पुरावे वर्तमानपत्राच्या कचेरीत येणा-या प्रेसनोटवरून कळते. अर्थात खोरिपाचेही वेगवेगळे गट आहेत. मागे खोरिपा एकीकरणाची बैठक झाली होती म्हणे. आता बोला. निवडणुकीच्या मोसमात पावसाळी छत्र्यांसारखे रिपाइंचे अनेक गट उगवतात. रिपाइंचे नेमके किती गट आहेत हे मोजण्यासाठी निवडणुकीचा काळ अगदी उत्तम आहे. गट स्थानिक असला तरी त्याचा अध्यक्ष मात्र राष्‍ट्रीयच असतो. रिपाइंऐक्य मात्र यातील कुणालाच नको असते. प्रकाश आंबेडकरांनी आता नवी मोट बांधली आहे. त्यावर कवाडेंनी ‘खायले नाही वांगे अन् मले पत सांगे’, अशी टीका केली होती. प्रकाश आंबेडकरांनी कवाडे स्वत:बद्दल बोलले असतील म्हणून त्यांची विकेट घेतली. नेते एकमेकांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांची तोंडेही कायम विरुद्ध दिशेने. ऐक्याची कवाडे नेत्यांनीच बंद केली आहेत, तरीही रिपब्लिकन जनतेची ऐक्याची आशा काही केल्या सुटत नाही, त्याला आपण काय करू शकतो.