आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियो होईलही, पण जपानी शिस्त कधी शिकणार ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद शहर नेमके कसे आहे याचा अभ्यास करण्यासाठी डीएमआयसीच्या अंतर्गत जपान येथील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व तेथील अनेक सरकारी अधिकारी गेल्या चार वर्षांपासून शहरात सतत येत होते. काकेगावा आणि गो ईरिटानी या दोन अभियंत्यांनी शहराचा खूप बारकाईने अभ्यास केला अन् तो जपान सरकारला दिला.

गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील औरंगाबादसह नाशिक, अमरावती, जळगाव या शहरात स्मार्ट सिटी होणार, अशी चर्चा गल्ली ते दिल्ली सुरू आहे. प्रत्यक्षात भारतात दोन प्रकारच्या स्मार्ट सिटी होत आहेत. पहिली स्मार्ट सिटी डीएमआयसी अर्थात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर आहे. ही स्मार्ट सिटी भारत व जपान सरकारच्या सहकार्याने होत आहे. ही स्मार्ट सिटी दिल्ली ते मुंबई रस्त्यावरील शहरातून जात आहे. काही पट्टाच यासाठी निवडला आहे. पण दुसरी स्मार्ट सिटी ही भारतातील १०० शहरात होत आहे. यात विदेशी कंपन्यांसह काही भारतीय विकासक ती शहरे स्मार्ट करून देणार आहेत.

दिल्लीत मोदी सरकार येताच देशातील शंभर शहरे स्मार्ट होण्याच्या कामाला अधिक गती मिळाली. महाराष्ट्रात औरंगाबाद, नाशिक, जळगाव, अमरावती शहरांची नाव यात निवडली गेल्याने येथील मनपा प्रशासन आिण उद्योगजकताला नवी उर्जा मिळाली. पण ही स्मार्ट सिटी होताना अनेक मोठ्या अग्निपरीक्षा अन् आव्हानांतून शहरवासीय, मनपा प्रशासन, राजकीय पुढारी यांना जावे लागणार आहे. खूप आटापिटा करून शहराचे बाह्य अंतरंग स्मार्ट होईलही; पण स्मार्ट झालेल्या शहराचा स्मार्टपणा टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्व नागरिकांवर आहे. ते मोठे आव्हान पेलण्यासाठी सामान्य नागरिकांसह मनपा प्रशासनाला स्वत:च्या कार्यशैलीत अामूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे.

औरंगाबादसह नाशिक, जळगाव व अमरावती या शहरातील अनेक भागांचा अमुलाग्र बदल केल्याशिवाय ही शहरे स्मार्ट होणार नाहीत. जपानी तज्ञांनी दिलेला गुप्त अहवाल अतिशय गंभीर आहे. त्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार काही निरिक्षणे भारतीय माणूस आिण त्यांच्या शिस्तीबद्दल मांडली आहेत. भारतीय माणूस हा जपानच्या नागरिकाच्या तुलनेत बेशिस्त असून आपल्या शहराबद्दल त्याला फारशी आत्मियता नाही. रस्त्यावरचा कचरा हटवतांना भारतीय नागरिक आम्ही कधी पाहिला नाही असेही निरिक्षणात म्हटले आहे. औरंगाबादच्या स्थापनेला चारशे वर्षे पूर्ण झाली. या शहरात जगप्रसिद्ध अजिंठा - वेरूळ लेणी, दौलताबादचा किल्ला अन् पाणचक्की बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. स्मार्ट सिटीबाबत त्यांनाही उत्सुकता आहे. पण शहरवासीयांच्या पाठिंब्याशिवाय अन् सहभागाशिवाय स्मार्ट सिटी पूर्णच होऊ शकत नाही यावर खूप मोठे मंथन महाराष्ट्रातील उद्योग संघटना वर्षभरापासून करीत आहेत; पण या चर्चासत्रांपासून नेमका सामान्य माणूसच खूप दूर राहिला आहे.

महाराष्ट्रातील शहरे नेमकी कशी आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी डीएमआयसीच्या अंतर्गत जपान येथील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व तेथील अनेक सरकारी अधिकारी गेल्या चार वर्षांपासून आपल्या राज्यात सतत येत होते. काकेगावा आणि गो ईरिटानी या दोन अभियंत्यांनी महाराष्ट्रातील काही शहरांचा बारकाईने अभ्यास केला अन् तो जपान सरकारला दिला. या दोघांनी शहरातील सर्वच सरकारी कार्यालयांत भेटी देऊन त्यांचे कामाचे स्वरूप समजून घेतले. महापालिका, आरटीओ, प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यांनी भेटी देऊन स्मार्ट सिटीचा आराखडा समजावून सांगितला. अधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या दोन अधिकाऱ्यांनी काढलेले निष्कर्ष खूप बोलके आहेत. महाराष्ट्रातील शहरे बाह्य रूपाने स्मार्ट होवून टोकियो सारखी होतील. पण ती शहर स्मार्ट राहतील की नाही, अशी शंका जपानहून आलेल्या दोन अभियंत्यांच्या चिंतनातून दिसत होती. त्यांच्या म्हणण्यानुसार जपान देश हा भूकंपप्रवण आहे. सतत मृत्यूची टांगती तलवार असूनही जपानी माणूस सतत आशावादी आणि प्रयत्नवादी आहे. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख होऊनही फीनिक्स भरारी घेत आज जगात तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर आहे. त्या अभियंत्याच्या मते भारत हा देश खूप सुरक्षित अन् सुजलाम् सुफलाम् आहे. तरीही येथील माणूस निराशावादी जास्त आहे. असाच निष्कर्ष या जपानी अभियंत्यांनी आपल्या अहवालात काढला. यात भारतातल्या नागरिकांच्या सवयी, येथील प्रशासनाचा कारभार, सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, प्रदूषण अन् कचऱ्याचे नियोजन या बाबी जपानच्या अधिकाऱ्यांनी अतिशय बारकाईने तपासल्या आहेत.

जपान व भारत सरकार करत असलेली डीएमआयसी ही औरंगाबाद येथील शेंद्रा ते बिडकीन या दहा हजार हेक्टर पट्ट्यातून जाणार आहे, तो भाग जपानच्या टोकियो शहराप्रमाणे येत्या काही वर्षांत होईल. तेथे ६० टक्के कारखाने आणि ४० टक्के निवासी जागा राहील. शहाराबाहेरून आलेले लोक या शहरातील लोकांच्या मानसितेबद्दल भरभरून बोलतात, त्याचा रागही लोकांना येतो; पण निंदकाचे घर असावे शेजारी, असे समजून हे कटू बोल पचवून आपल्याला स्मार्ट व्हावे लागेल.

स्मार्ट सिटी म्हणजे नेमके काय, असा प्रश्न पत्रकारांनी स्मार्ट सिटीचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारला तेव्हा उत्तर खूप सोपे होते .ते म्हणाले, जेथे वीज, पाणी यांच्यासह कोणत्याही गोष्टींची टंचाई असणार नाही, मोठे अन् गुळगुळीत रस्ते, मुबलक पाणी, टुमदार घरे, झीरो गार्बेज सिटी अर्थात कचरामुक्त शहर, कुठेही ट्राफिक जाम नाही, कुठेही रांगा नाहीत, लोकांची स्वयंशिस्त असलेले शहर म्हणजे स्मार्ट सिटी. यात आपण शहरवासीय नेमके कोठे बसतो हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. राष्ट्रनिष्ठा अन् स्वयंशिस्तीने भारलेला देश म्हणजे जपान आहे, असा निष्कर्ष जपान देशात जाऊन आलेल्या औरंगाबादच्याच काही उद्योजकांनी सांगितला. त्यांच्या मते औरंगाबाद शहरातील नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करून वीज, पाणी, जपून वापरायला हवे, कचऱ्याची विल्हेवाट घरांतून व्हायला हवी. अशा छोट्या छोट्या अपेक्षा नागरिकांकडून आहेत, तर मनपा प्रशासनाकडून लोकाभिमुख योजनांत सामान्य नागरिकांना सहभागी करून घ्यावे, ५० टक्क्यांपेक्षा जास्त असणारी पाणी गळती थांबवणे, शंभर टक्के कर वसुली, चांगले रस्ते तयार करून ते मेंटेन करणे या माफक अपेक्षा आहेत. सामान्य नागरिक, प्रशासन अन् राजकारणी यांचे विचार एकाच दिशेने जाणारे हवेत, तरच आपले शहर अन् आपण स्मार्ट होऊ.
लेखक दिव्य मराठीचे विशेष प्रतिनिधी