आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिदांचा विसर न पडावा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात बसून दूरचित्रवाणीवरच्या पडद्यावरून पाहायला मिळणाऱ्या किंवा वृत्तपत्रांतून वाचायला मिळणाऱ्या युद्धकथा कमालीच्या रोमांचक, थरारक असतात. जवानांना मात्र जिवाची बाजी लावावी लागते. एक क्षण आयुष्य संपवायला पुरेसा असतो. चोवीस तास ‘मारा किंवा मरा’ हे आव्हान डोळ्यात तेल घालून पेलावे लागते. असे आव्हान झेलण्याची पहाडी छाती असणारे कर्नल संतोष महाडिक यांना काश्मीरच्या कुपवाड्याजवळ वीरमरण प्राप्त झाले. सातारा जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातून १९९८ मध्ये सैन्यात भरती झालेल्या या तरुणाने अल्पावधीतच ‘सेना मेडल’ मिळवण्याचा पराक्रम गाजवला. कित्येक चकमकींचे यशस्वी नेतृत्व करत शत्रूला मात दिली. त्यामुळेच संतोष यांनी कर्नल पदापर्यंत झेप घेतली. रणांगणातल्या सोहळ्याचे आकर्षण त्यांना आधीपासूनच असावे. साताऱ्याच्या सैनिकी स्कूलमध्ये असल्यापासूनच त्यांच्या बेडर स्वभावाची झलक त्यांच्या मित्रांना पाहायला मिळाली. तालमीत जोर मारणारा, दमदार बॉक्सर असलेला, फुटबॉल टीमचा गोलकीपर झालेला तरुण संतोष शारीरिकदृष्ट्या कणखर होताच; परंतु मनानेही तो ठाम होता. सैनिकी स्कूलमध्ये त्याच्या तोंडी सतत ‘सुप्रीम सॅक्रिफाइस’ची भाषा होती. सीमेवरच्या लढाईची आणि रण मारण्याची तहान तेव्हापासूनचीच. म्हणूनच कर्नल झाल्यानंतरही थेट युद्धभूमीवर उतरून ते नेतृत्व करत राहिले. वास्तविक सुरक्षित ठिकाणी बसून चकमकीचे व्यवस्थापन करणे त्यांना शक्य होते. त्यांनी ते केले नाही. घनदाट जंगलात शस्त्रसज्ज अतिरेक्यांचा पाठलाग करताना संतोष यांना वीरमरण आले. ३८ वर्षांचा उमदा कर्नल भारताला गमवावा लागला. वयाची चाळिशीही न गाठलेल्या संतोष यांचा मृत्यू चटका लावणारा आहे. संतोष यांच्यासारख्या अनेक जवानांना पाकिस्तानपुरस्कृत अतिरेकी कारवायांमध्ये शहीद व्हावे लागते आहे. पाकिस्तानच्या छुप्या युद्धाचा अंत होत नाही तोवर निधड्या संतोषसारख्या अनेक जवानांना तळहातावर प्राण घेऊन लढावे लागणार आहे. या शहिदांचा विसर पडू देण्याचा कृतघ्नपणा देशवासीयांमध्ये कदापि न येवो, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.