आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नथु‘रामायण’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताची फाळणीनंतर उसळलेली हिंदू-मुस्लिम दंगल, हिंदू निर्वासितांचा झालेला छळ आणि नवजात पाकिस्तानला भारताने दिलेले ५५ कोटी रुपये या सर्व घटनांना केवळ मोहनदास करमचंद गांधीच जबाबदार आहेत, असा नथुराम गोडसेचा ठाम गैरसमज होता. गोडसेच्या दृष्टीने गांधी देशाचे शत्रू होते. त्याची शिक्षा देण्यासाठी त्याने गांधींना संपवले. हा कुविचार करणारा गोडसे तेव्हाही एकटा नव्हता. आजही त्याचा विचार जिवंत ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही. खेदाची गोष्ट म्हणजे खुनी नथुरामला ‘संत’ ठरवण्याचेच पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत.
गोडसे कुटुंबीयांनी नथुरामाची आठवण ठेवणे समजून घेता येईल. नथुरामला फाशी दिल्यापासून दरवर्षी त्याचे कुटुंबीय त्याचा स्मृतिदिन पुण्यात पाळतातसुद्धा. मात्र मर्यादित असलेल्या या कार्यक्रमाला सार्वजनिक रूप देण्याचा प्रयत्न देशात सुरू झाला आहे. यंदाच्या स्मृतिदिनी ‘नथुराम-अ-मर्टियर सेंट’ या शीर्षकाचे इंग्रजी पुस्तकच पुण्यात प्रसिद्ध करण्यात आले.
नथुरामावर कीर्तन सादर झाले. गांधी यांचे विचार, कार्यपद्धतीबद्दल अनेकांचे मतभेद होते. गांधींच्या हयातीत आंबेडकरांनी अनेकदा त्यांच्यावर टोकाची टीका केली. गांधींच्या लाडक्या ‘जवाहर’ पासून ते जिना, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत अनेकांना गांधींचे सर्वकाही, सदा पटले नाही; परंतु गांधींच्या हेतूंबद्दल कोणाला शंका नव्हती. म्हणूनच क्षुद्र बुद्धीच्या गोडसे या मारेकऱ्याचे होणारे उदात्तीकरण समाजासाठी धोकादायक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे बरे नव्हे. नथुरामीवृत्तीचे समर्थन म्हणजे येथील लोकशाही व्यवस्थेला, राज्यघटनेला विरोध. “आपल्याला जे पटत नाही, रुचत नाही ते संपवून टाकायचे. नष्ट करायचे,” ही तालिबानी प्रवृत्ती व नथुराम यांच्यात फरक करता येत नाही. म्हणूनच नथुरामाचे गोडवे गाणाऱ्यांचा निषेध व्हायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही नथुरामच्या विरोधात जाहीर आक्षेप नोंदवला हे चांगले झाले. नथुरामीवृत्तीचा संसर्ग रोखणे हीच भारताची गरज आहे.