आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाश कॉमिक्स पत्रकारितेचे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज नसणे आणि असाक्षर असणे किंवा नावापुरतेच साक्षर असणे यामुळे मायाजालातून मिळालेली संधी, उदाहरणार्थ -ब्लॉग, यूट्यूब इत्यादींचाही उपयोग होत नाही. या परिस्थितीत पर्याय म्हणून कॉमिक्स पत्रकारिता ही एक चळवळ सुरू झाली आहे.


ए4 मापाचा पांढरा कागद आणि पेन्सिल इतकीच सामग्री यासाठी लागते. बाकी पायाभूत घटक असतो आपण आणि आपली बुद्धी, जाणीव, कल्पकता, इच्छा इत्यादी. या सगळ्यांची सुरुवात शरद शर्मा या पत्रकाराने केली.

वास्तवाची मांडणी आणि समीक्षा होत राहणे हे समाजाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. कारण या प्रक्रियांतूनच प्रश्न समोर येतात आणि उत्तरे सुचतात. पत्रकारिता करत असताना पत्रकाराच्या हातातील एक महत्त्वाचे उपकरण म्हणजे शब्द. शब्दांच्या वापरातून वास्तवाचे चित्र वाचकांसमोर उभे करणे ही पत्रकारिता करत असताना वापरली जाणारी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. शब्दचित्र तयार करण्यासाठी शब्दांवर प्रभुत्व असावे लागते. साक्षर समाज जसजसा वाढत जाईल तसतशी शब्दचित्र वापरण्याची आणि त्यातून वास्तवाची मांडणी आणि समीक्षा करण्याची जाणीव समाजात अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल. अशा प्रकारे मांडणी आणि समीक्षा करून त्यातून बोध घेण्याची प्रक्रिया आता विविध माध्यमांमुळे सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आवाक्यात येते आहे.

मात्र, असाही मोठा समाज आहे, जो असाक्षर आहे अथवा केवळ नावापुरता साक्षर आहे. त्यामुळे सरकार दरबारी ‘साक्षर’ ही संज्ञा मिरवण्यापलीकडे हा मोठा वर्ग आपल्या साक्षरतेचा उपयोग आपले वास्तवाचे भान अधिक व्यापक व्हावे, त्याची मांडणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी करू शकत नाही. साक्षरतेचा उपयोग हा समाज केवळ उदरनिर्वाहासाठी करतो. आर्थिक बळामुळे काही प्रमाणात या समाजाला प्रतिष्ठाही लाभते. मात्र, त्याची समाजातील वास्तवाचे भान अधिक व्यापक होण्यास काहीच मदत होत नाही. उलट आपल्या प्रतिष्ठेच्या आणि पैशाच्या जोरावर हा समाज आपलाच आवाज कसा मोठा आहे हे दाखवण्यात गुंतलेला राहतो.
असे वाटले होते की, दूरचित्रवाणीमुळे समाजाला शब्द नाही तरी ‘आवाज’ लाभेल. दृकश्राव्य माध्यमातून वास्तवचित्र उभे केले जाईल. मात्र, दूरचित्रवाणीचे आर्थिक गणित अजून जुळलेले नाही. प्राइम टाइम नावाच्या एका खांबावर दूरचित्रवाणी वाहिन्यांचे आर्थिक तंबू उभे आहेत. बातम्या प्रसारित करणा-या वाहिन्यांची परिस्थिती यामुळे फारच बिकट आहे. ‘टॉक शो’ हा अतिशय कमी खर्चात तयार होत असलेला एक लोकप्रिय कार्यक्रम प्रकार प्राइम टाइमवर सर्वच वाहिन्या दाखवतात. हा कार्यक्रम खूप प्रेक्षक खेचत असला तरी त्याचा जाहिरातदारांना काहीच उपयोग होत नाही. याचे कारण एखाद्या मुद्द्यावर तावातावाने चर्चा होत असताना मध्येच कोणी ‘हे माझे उत्पादन आहे, ते विकत घ्या’ असे सांगायला आला तर प्रेक्षक त्यास फार अनुकूल नसतात. म्हणजेच बातम्या प्रसारित करणा-या वाहिन्यांच्या ज्या प्राइम टाइमला गर्दी होते तिचा पैसा कमावण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. प्राइम टाइमपासून दूर होत गेले तर गर्दी कमी होत जाते. त्यामुळे जाहिरातदार येत नाहीत.

मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित करणा-या वाहिन्यांच्या समोर वेगळेच आव्हान आहे. त्यांच्याकडे प्राइम टाइम हा दिवसभरात पसरलेला आहे. मात्र, या प्राइम टाइमकडे आकर्षित झालेला प्रेक्षक हतबुद्ध आहे. रेलून नुसते पाहणे यापलीकडे हा प्रेक्षक जात नाही. त्यामुळे जे समोर दाखवले जात आहे ते पाहणे इतकेच होते आहे, त्याची समीक्षा होताना दिसत नाही.
एकीकडे वाहिन्या कार्यक्रम उत्पादन आणि त्यातून जाहिरातींद्वारे पैसा कसा मिळवता येईल यात गुंतलेल्या असतानाच आर्थिक मंदी लांबली आहे. दुसरीकडे, प्रेक्षकांकडे वीज नाही हे एक मोठेच संकट आहे. ते संकट तूर्तास तरी बराच काळ राहणार आहे. विजेशिवाय दूरचित्रवाणी संच उपयोगाचे नाहीत. त्यामुळे दूरचित्रवाणी हे साधन समाजातील वास्तवाच्या मांडणी आणि समीक्षेसाठी अपुरे आहे. वीज नसणे आणि असाक्षर असणे किंवा नावापुरतेच साक्षर असणे यामुळे मायाजालातून मिळालेल्या संधी, उदाहरणार्थ -ब्लॉग, यूट्यूूब इत्यादींचाही उपयोग होत नाही.

या परिस्थितीत पर्याय म्हणून कॉमिक्स पत्रकारिता ही एक चळवळ सुरू झाली आहे. ए4 मापाचा पांढरा कागद आणि पेन्सिल इतकीच सामग्री यासाठी लागते. बाकी पायाभूत घटक असतो आपण आणि आपली बुद्धी, जाणीव, कल्पकता, इच्छा इत्यादी. या सगळ्याची सुरुवात शरद शर्मा या पत्रकाराने केली. नव्वदच्या दशकात राजकीय विषयांवरचे कार्टून करत असताना त्याने राजस्थानमध्ये एका साक्षरता उपक्रमासाठी काही भित्तिपत्रके तयार केली. त्या भित्तिपत्रकांना मिळालेल्या प्रतिक्रियांतून ही संकल्पना जन्माला आली. त्याने अशी अनेक भित्तिपत्रके तयार केली आणि राजस्थानातील गावांमध्ये जाऊन ती कशी तयार करता येतील ते शिकवायला सुरुवात केली. मुळातच भारतीय समाजामध्ये कथा सांगणे ही एक संस्कृती आहे. शरदने त्या कथांना चित्राची जोड दिली आणि ‘चित्रकथा’ कशा तयार कराव्यात ते शिकवले. सर्वप्रथम काही गोळे आणि त्यांत इंग्रजी ‘टी’ हे अक्षर काढायचे. यातून चेहरा निर्माण करायचा. ‘टी’च्या आडव्या रेषेला मधून थोडे पुसले की भुवया तयार होतात आणि उभी रेष नाक होते. गोळ्याचा आकार आणि त्यात अशा प्रकारे ‘टी’ एवढ्या सामग्रीवर अनेक भाव दाखवता येतात. गोळ्याखाली पाच रेषांतून संपूर्ण व्यक्ती तयार करता येते. उभ्या रेषेतून देह आणि किंचित कोनात काढलेल्या चार रेषांतून हातपाय. या रेषांतून त्या व्यक्तीला चालवता, धाववता, बसवता येते. एकमेकांचे चेहरे, हातपाय, हावभाव कागदावर याच रेषांतून काढता काढता आपण सहज चित्र काढू लागतो. मुख्य म्हणजे आपल्या कुवतीप्रमाणे चित्रातील बारकावे मांडता येतात. याचे कारण चित्र महत्त्वाचे नसते तर कथा महत्त्वाची असते. ए4 मापाच्या कागदांवर चार एकाच मापाचे चौकोन आखून घेऊन त्यातून आपली कथा मांडायची असते. कथा सांगण्यासाठी चित्र आणि शब्द यांचा उपयोग करायचा असतो. हे शब्द आपले स्वत:चे असतात. त्यात शुद्धता, शास्त्रीयता इत्यादींचे बंधन नसते. कारण प्रत्येक चित्रकथा ही त्या त्या व्यक्तीचे वास्तव असते, वास्तवाचा दृष्टिकोन असतो. अनेकदा लोक बोलींचा वापर करतात. एखादा वाक्प्रचार, जो केवळ त्या त्या समाजातील लोकांनाच कळू शकेल, तो वापरतात. हे ते जाणूनबुजून करत नाहीत तर त्यांच्या वास्तवामध्ये हे स्वाभाविक असते म्हणून होते.

सामान्य माणसांबरोबर अशा प्रकारे चित्रकथा तयार करत करत कॉमिक्स पत्रकारिता आता जगभर पसरली आहे. केवळ तीन दिवसांत कॉमिक्स पत्रकार तयार होतो. आपली चित्रकथा कुठल्याही भिंतीवर चिकटवता येते. याप्रकारे पत्रकारिता करण्यात अनेक सामाजिक फायदे आहेत. ही पत्रकारिता पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठतेतून येणारे उसने आव, दबाव इत्यादींचा प्रश्चच नाही. आपले वास्तव आपल्यालाच कळते, समजते आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणच सक्षम असतो, हे भान समाजात रुजते आणि ख-या अर्थाने घटनाकारांनी ज्या कारणाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच सारख्या प्रमाणात दिले त्याचे सार्थक होते. या प्रकारच्या पत्रकारितेला वय, शिक्षण, सामाजिक स्तर इत्यादींचे बंधन नाही. कागद आणि पेन्सिल इतकीच काय ती साधनसामग्री, त्यामुळे खर्चही नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये मालकीची इच्छा असते तीही यात पूर्ण होते. कारण प्रत्येक चित्रकथा ही आपण स्वत:च तयार करतो आणि लोकांसमोर ठेवतो. विषय निवड आणि विषय मांडणी याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्यामुळे यात व्यक्तीला स्वत:ला हवे तसे व्यक्त होता येते.

आज जगभरात पत्रकारिता हे वास्तवाचे भान अधिक प्रगल्भ करण्यासाठी, लोकांसोबत नाळ जुळण्यासाठी, समाजासाठी, इतरांसाठी काहीतरी करण्यासाठीचे एक उत्तम साधन झाले आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठीच्या कामाव्यतिरिक्त करण्यासाठीचा हा एक उत्तम उपक्रम झाला आहे. मुख्य म्हणजे व्यावसायिक पत्रकारांना जी आर्थिक, राजकीय, व्यावसायिक, व्यापारी बंधने असतात ती अशा प्रकारे सार्वजनिक पत्रकारिता करणा-या ंना नसतात. अशा प्रकारची सार्वजनिक पत्रकारिता मायाजालावर सुरू आहेच. मात्र, त्याला तांत्रिक आणि आर्थिक मर्यादा पडताहेत. कॉमिक्स पत्रकारितेमुळे जगभरातील बहुसंख्य लोकांना आता सार्वजनिक पत्रकारिता करता येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे कॉमिक्स पत्रकारितेच्या तीन ते चार दिवसांच्या कार्यशाळांतून कॉमिक्स पत्रकार कसे व्हावे ते शिकवले जाते.