आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसअंतर्गत मतभेदांचे ‘गोकुळ’निमित्ताने प्रदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसायातील दादा असलेला दूध संघ म्हणून कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाकडे पाहिले जाते. सुमारे 1000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या या संघावर संचालक म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी अनेकजण इच्छुक असतात. विधानसभेचे तिकीट नको, पण गोकुळवर संचालक म्हणून घ्या असा हट्ट नेत्यांचे खास असलेले कार्यकर्ते धरत असतात यावरूनच या संघाच्या संचालकपदाचे महत्त्व दडलेले आहे.
गोकुळच्या निवडणुका कधीही जाहीर होतील, अशी परिस्थिती आहे. गेली 20 वर्षे मनपा या त्रिकुटाची गोकुळवर सत्ता आहे. म म्हणजे महादेवराव महाडिक, न म्हणजे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके आणि पा म्हणजे राष्‍ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील. यातील नरके हे महाडिक यांच्या पोटातील नेते आहेत. गेल्या विधानसभेवेळी नरके यांनी आपला पुतण्या चंद्रदीप याला शिवसेनेतून उभे करून पी. एन. पाटील यांचा पराभव घडवून आणला. अर्थात हे महाडिकांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नव्हते. असे असले तरी गोकुळचे अधिकृत नेते म्हणून पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांनाच मानले जाते.

गेल्या निवडणुकीत आमदार असलेले सतेज पाटील हे या दोघांबरोबर दिसू लागले. गोकुळच्या संचालक निवडीच्या तत्कालीन बैठकांना त्यांची हजेरी लागत होती. त्यामुळे गोकुळला आता तिसरा नेता लाभणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, नंतरच्या कालावधीत महानगरपालिका, विधानपरिषद या निवडणुकांच्या निमित्ताने महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील दरी वाढत गेली आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत तर महाडिक यांचे पुतणे भीमा साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांना सतेज पाटील यांच्याविरोधात लढवून ही दरी महादेवराव महाडिक यांनी आणखी रुंदावली.

गेल्या वर्षीपासून गोकुळच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. अशातच सतेज पाटील हे राज्यमंत्री बनलेले, परंतु त्यांना गोकुळच्या राजकारणात फार संधी न देण्याचा निर्णय पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांनी घेतलेला दिसतो. त्यामुळे मंत्री झाल्यावरदेखील गोकुळचे सत्काराचे मानचिन्ह त्यांना देण्यात आले नाही. महाडिक आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यातील या वादाने आता टोक गाठले आहे. हाणामारी, खूनखराबा यानंतर आता जाहीर आव्हान देण्याची भाषा सुरू झाली आहे.

महाडिक आणि पी. एन. यांनी निवडणूक कधीही झाली तरी त्यांची व्यूव्हरचना आखली असताना सतेज पाटील ही शड्डू ठोकण्याच्या पावित्र्यात आहेत. त्यांना खासदार सदाशिवराव मंडलिक यांचीही जोड मिळू शकते. विधानसभेसाठी पाटील यांना महाडिकांनी खूपच त्रास दिल्याने चार, पाच कोटी खर्च करायचे परंतु गोकुळ लढवायचा निर्धार मंत्र्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. त्यामुळे काँगे्रसअंतर्गत असणारी दुफळी आता जाहीर सभासमारंभातून दिसत आहे. राष्टÑवादी ही गंमत सध्या लांबून पाहत आहे, परंतु वेळ पडल्यास या निवडणुकीत सक्रिय सहभागाचीही त्यांनी तयारी ठेवली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार, जिल्हाध्यक्ष एकीकडे आणि खासदार, गृहराज्यमंत्री दुसरीकडे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच लक्ष घालावे लागणार हे नक्की.