आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Issue In Maharashtra By Sukrut Karandikar

प्रतिमेच्या प्रेमातले काँग्रेसजन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात राहुल गांधी नागपूर आणि पुण्यात येऊन गेले. संपूर्ण राज्यातले काँग्रेस पदाधिकारी, त्यांना दिलेल्या वेळी, ठरलेल्या दिवशी आणि सांगितलेल्या ठिकाणी गांधी यांना भेटून गेले. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, मंत्री, खासदार-आमदार यांना पूर्णपणे बाजूला ठेवत गांधी यांनी संघटनेतल्या कार्यकर्त्यांना ऐकून घेतले. त्यांच्या टीमने कार्यकर्त्यांनी मांडलेले मुद्दे लॅपटॉपवर टिपूनही घेतले. राहुल गांधी हे स्वत:च थेट संवाद साधत असल्याने नेत्यांकडे फक्त दौर्‍याचे आयोजन आणि गांधी जातील तेथे उपस्थित राहणे एवढेच काम उरले होते.
० व्यक्तिमत्त्वाचा करिश्मा : गांधींना भेटून बाहेर येणारी कार्यकर्ते मंडळी भलतीच खुश होती. त्यांच्या सर्वाधिक आनंदाची बाब होती ती राहुल गांधी यांना प्रत्यक्ष पाहिल्याची. माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला, माझ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले, माझ्याकडे पाहून ते हसले याचाही आनंद अनेकांना झाला होता. एवढेच काय, अमुक मंत्र्याला त्यांनी कसे झापले, तमुक पदाधिकार्‍याला गप्प केले यामुळेही अनेक जण सुखावले. गांधी यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव अनेकांवर पडल्याचे प्रामुख्याने दिसून आले. राहुलजींचे दिसणे, खळीदार हसणे, नम्रतापूर्वक वागणे आणि ठाम बोलणे या सगळ्या बाह्य गोष्टींमुळे त्यांना भेटलेला सर्वसामान्य कार्यकर्ता भारावलेला होता. एनएसजी कमांडोंच्या कडेकोट तटबंदीतून पास असल्याशिवाय कोणालाच राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचता येत नव्हते. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटण्याचा गांधींचा प्रयत्न त्या अर्थाने मर्यादितच राहिला. गांधींसमोर गेल्यानंतर बोट वर करायचे, संधी मिळेल त्याने मनोगत मांडायचे, दोन्ही बाजूंनी प्रश्नोत्तरे असा तो प्रकार होता. स्वपक्षीयांबद्दलच्या चिक्कार तक्रारी गांधींपर्यंत पोचवण्यात आल्या. मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलही तीव्रतेने बोलले गेले. तुम्ही भरपूर काम करा. काँग्रेसच्या जास्तीत जास्त सीट निवडून आणा. मित्रपक्षांच्या कुबड्या घेण्याची वेळच काँग्रेसवर येणार नाही, असे ठोस प्रत्युत्तर गांधींकडून मिळाल्यानंतर राष्ट्रवादीबद्दल आक्रमक बोलणारे गुपचिळी साधत होते.
गांधींना भेटून बाहेर आल्यानंतर जो-तो मोठ्या उत्साहाने 2014 मध्ये पुन्हा काँग्रेसच येणार, असे सांगत होता. नेमकेपणाने कसे, हे विचारल्यावर मात्र अनेक जण कोड्यात पडत होते. कारण राहुल गांधींनी जे-जे सांगितले ते-ते आपल्यालाच प्रत्यक्षात आणायचे आहे, हे त्यांच्या लक्षात येत होते. काय सांगितले गांधींनी ? आपसात तुतू-मैंमैं करू नका, पक्षाला घातक ठरणार्‍या कार्यकर्त्याला अद्दल घडवली जाईल, पदासाठी काम करू नका. रिझल्ट द्या. पदे आपोआप चालत येतील. राहुल गांधी यांनी अनेकांना एक उदाहरण दिले. ते म्हणाले, पूर्वी पक्षाचे अध्यक्ष आले की सर्वजण उठून उभे राहत. आता अध्यक्ष आले की त्यांना मान मिळत नाही. परंतु मंत्री, आमदार-खासदार आले की सगळे जण उठून उभे राहतात. हे पक्षशिस्तीला धरून नाही. तुम्ही मंत्री, आमदार-खासदार मोठे करता. त्यामुळे संघटनेत कार्यकर्ता मोठा. गांधींचे हे बोल वास्तवात आणणे कठीण असल्याचे अनेक पदाधिकारी कबूल करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्याची अपरिहार्यता लक्षात आणून दिल्यानंतर काही जणांना गळाल्यासारखे वाटले.
० उत्स्फूर्त राहुल गांधी : गांधींच्या दौर्‍याबद्दल काँग्रेसच्या सर्वच नेतेमंडळींचे एक निरीक्षण समान होते. ते म्हणजे राहुलजी पूर्र्वीपेक्षा खूपच प्रगल्भ झाले आहेत. त्यांच्यात ठामपणा आहे. उत्स्फूर्तता आहे. हातात कागद न घेता, कोणी डिक्टेट न करता ते हजरजबाबीपणे बोलतात. काँग्रेसने नेमके काय केले पाहिजे याबाबत त्यांची मते निश्चित आहेत. पुण्यातल्या पत्रकारांबरोबरही गांधी यांची अर्ध्या तासाची बैठक ठरली होती. प्रत्यक्षात ती दीड तास चालली. या बैठकीनंतर पत्रकारांमध्येही एका गोष्टीबाबत एकवाक्यता होती, ती म्हणजे धिस इज न्यू कॉन्फिडंट अँड मॅच्युअर्ड राहुल गांधी. ते मुद्देसूद बोलतात. त्यांच्या वक्तृत्वात निर्धार जाणवतो. 2004 मध्ये राजीव गांधींच्या अमेठी मतदारसंघातून राहुल खासदार म्हणून निवडून आले. हा त्यांचा राष्ट्रीय राजकारणातील औपचारिक आणि लोकशाही मार्गाने झालेला प्रवेश होता. नऊ-दहा वर्षांनंतर ते आता काँग्रेसचे उपाध्यक्ष झाले आहेत. भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. काँग्रेसनही राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावे, अशी मागणी आहे. यावर राहुल गांधींची मते स्पष्ट आहेत. निवडून आलेले खासदारच त्यांच्या नेत्याची निवड करतील. आधीच पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवणे चुकीचे आहे, असे ते सांगतात.

प्रामाणिक आणि नियोजनबद्ध : नरेंद्र मोदीप्रणीत भाजप-संघ परिवाराकडून गांधी घराणे व काँग्रेसवर यथेच्छ तोंडसुख घेतले जात आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वढेरा यांच्याबद्दलची आक्षेपार्ह विधाने, खासगी आयुष्यावरच्या कॉमेंट्स, व्यंग्यचित्रे, विविध आकडेवारी या सोशल मीडियातून फिरत आहेत. मोदी यांची एक स्पेशल टीम फक्त फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप आदी माध्यमांमधून काँग्रेसविरोधी वातावरण तयार करण्याच्या कामाला जुंपली आहे. जाहीर सभा, पत्रकार परिषदांमधून दररोज आरोप, टीका सुरू आहे. एवढे असूनही मोदींचे नाव आपल्या तोंडातून निघणार नाही, याची काळजी राहुल गांधी घेतात. विरोधक हा एकच उल्लेख करून ते बोलत राहतात. पत्रकारांच्या बैठकीत त्यांनी स्पष्टच विचारले, तुमच्यापैकी कोणी मुस्लिम आहे का? होकारार्थी उत्तर येताच ते म्हणाले की, तुम्ही मला मदत केली पाहिजे. मला सांगा की, या देशातल्या सगळ्या मुस्लिमांनी पाकिस्तानात जावे असे जर कोणी सांगत असेल तर ते कधी शक्य आहे का? धार्मिक, जातीय ध्रुवीकरण करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. परंतु काँग्रेस असे मानते की सर्वधर्मसमभाव ही भारताची प्रवृत्ती आहे. आक्रमक प्रचाराला तितक्याच पद्धतशीरपणे उत्तरे देण्याची तयारी माझी दिल्लीतली वॉर रूम करत आहे. योग्य वेळी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असे गांधी सांगतात. यूपीए-दोनच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही. त्यामुळे आरोपांना उत्तरे देण्यापेक्षा आम्ही काय केले, हे लोकांपुढे घेऊन जाण्याचे, आमच्या योजनांच्या लाभार्थींची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे ते सांगतात.

सन 2014 मध्ये काँग्रेसचे पूर्वीपेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असा विश्वास गांधींनी व्यक्त केला. पण त्यांनी हेदेखील आवर्जून सांगितले की 2014 मधली टीम पूर्णपणे माझी नसेल. सन 2019 मध्ये येणारी टीम मात्र माझी असेल. त्यांचा रोख स्पष्ट होता. महिलांना अधिक प्राधान्य देणारी काँग्रेस त्यांना अभिप्रेत आहे. जात, घराणेशाही, पैसा, मनगटी ताकद या बळावर निवडून येणार्‍या प्रस्थापितांपेक्षा सर्वसामान्य तरुणांची काँग्रेस त्यांना हवी आहे. याच उद्दिष्टासाठी पक्षसंघटना मजबूत करण्याचा धोशा त्यांनी दोन दिवस लावला होता. तळागाळापर्यंत जा, सामान्यांची कामे करा, असे ते कार्यकर्त्यांना सांगत राहिले. गांधींच्या बाह्यरूपाने चार्ज झालेले कार्यकर्ते पक्षाला किती चार्ज करतात याचे उत्तर येत्या लोकसभा निवडणुकीत मिळणार आहे. राहुल गांधी यांची सौम्य प्रतिमा मोदींच्या आक्रमकतेपुढे उंचावण्याचे आव्हान काँग्रेसला पेलायचे आहे. स्वत: गांधी यांच्यावर बोले तैसा चाले हे खरे करवून दाखवण्याची जबाबदारी असल्याने त्यांचे काम अधिक अवघड आहे. अन्यथा त्यांचे दोनदिवसीय राज्यव्यापी मार्गदर्शन पोपटपंची ठरेल. राजीव गांधी यांच्याही मोहक व्यक्तिमत्त्वाची जादू एकेकाळी देशाला जिंकून गेली. त्याची पुनरावृत्ती झाली नाही, हेही खरे.

काँग्रेसचा पंचप्राण : दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, झोपडपट्टीवासीय हा काँग्रेसचा पाया आहे. पूर्र्वीची गरिबी हटाओ किंवा आताची काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ या घोषणा हा पाया डोळ्यासमोर ठेवून झाल्या. अन्न सुरक्षा विधेयक याच प्रयत्नांचा भाग आहे. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या प्रतिमांनी गावागावांत पंजा रुजवला. बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान ही चार बिमारू आणि प्रगतिशील महाराष्ट्र अशा पाच राज्यांनी काँग्रेसला नेहमी भरभक्कम साथ दिली. लोकसभेत 272 हा बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी ही पाच राज्ये बळ देत आली. या पाच राज्यांमधून 222 खासदार निवडून जातात हे विसरता येणार नाही.

अलीकडच्या दोन दशकांत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश पाहता पाहता काँग्रेसच्या हातातून निसटली. राजस्थानातला पाया डळमळला. महाराष्ट्रात शिवसेना, मनसे या प्रादेशिक पक्षांची ताकद वाढली तर राष्ट्रवादीचा खोडा काँग्रेसच्या पायात अडकला. भरभक्कम साथ देणार्‍या पाच राज्यांमधली संघटना क्षीण झाल्याचा हा परिणाम होता. या राज्यांमधून नवे दमदार नेतृत्व उभे करण्यात काँग्रेस अपयशी ठरली. काँग्रेसचा पंचप्राण असलेल्या या राज्यांमधल्या पीछेहाटीमुळे केंद्रात काँग्रेसचा पाया खचला. याला अपवाद ठरला तो महाराष्ट्राचा. महाराष्ट्राने नेहमीच काँग्रेसला ताकद दिली. राष्ट्रीय नेतेही दिले. शरद पवार या लोकनेत्याने वेगळी चूल मांडल्यानंतरही महाराष्ट्रावरची काँग्रेसची पकड अजून ढिली झालेली नाही. महाराष्ट्रातली काँग्रेस बळकट करण्याची गरज गांधींना जाणवते ती यामुळेच. गांधी यांना महाराष्ट्राकडून अपेक्षा आहेत.