आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Vs NCP In Amarawati Loksabha Election Seat

अमरावती लोकसभा मतदासंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सध्या जोरात रस्सीखेच सूरू आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा परंपरागत मित्रपक्ष असलेल्या गवई गटाच्या रिपब्लिकन पक्षात मात्र अस्वस्थता पसरली आहे. राज्यात आघाडीच्या राजकारणात सोबती असलेले हे दोन सहकारी पक्षच आपापसांत भांडत असल्याने रिपाइंचे डॉ राजेंद्र गवई यांना आता नेमकी काय भूमिका घ्यावी, हे सुचेनासे झालेय. दुसरीकडे या दोघांच्याही अंतर्गत भांडणाचा फायदा घेत युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांनी त्यांची पत्नी नवनीत कौर राणा यांच्याकरिता मिळेल त्या पक्षाच्या अधिकृत तिकिटावर लढण्यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी मात्र त्यांच्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असून खासदार आनंदराव अडसूळ हेच उमेदवार असतील, असे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले. त्यामुळे शिवसेना-भाजपचा नवा मित्रपक्ष असलेल्या रिपाइं आठवले गटाला अमरावती मतदारसंघ सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावती मतदारसंघ हा अनुसूचित जातीकरिता राखीव आहे. काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीमध्ये हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.

शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. अमरावती मतदारसंघातून 1991 ला प्रतिभाताई पाटील काँग्रेसच्या खासदार झाल्या. त्यानंतर 1998 मध्ये काँग्रेसने पंजा चिन्हावर या मतदारसंघातून भाऊसाहेब भेले यांना उमेदवारी दिली होती, पण ते पराभूत झाले होते. 1998 नंतर मात्र काँग्रेसने प्रत्येक निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या गवई गटाच्या रिपाइंकरिता हा मतदारसंघ सोडला आहे. 2009 च्या निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला तेव्हा त्यांनीही रिपाइंचे डॉ राजेंद्र्र गवई यांच्याकरिताच मतदारसंघ सोडला. मात्र, तेही पराभूत झाले. त्यामुळे नव्या समीकरणात या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. सुरवाडी येथे झालेल्या राहुल गांधी यांच्या बैठकीत अमरावती मतदारसंघ काँग्रेसकरिता कसा अनुकूल आहे हे सप्रमाण सांगण्यात आले. मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला असला तरी राष्ट्रवादीकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात शुकशुकाट आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय खोडके हे अमरावती मतदारसंघातून त्यांच्या एखाद्या विरोधकाला, तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाणार नाही ना या भीतीमुळे चिंतित झाले आहेत. काँग्रेसकडे या प्रवर्गातील उमेदवार असल्याचा त्यांचा दावा आहे. पण उमेदवाराच्या नावाबाबत काँग्रेसमध्ये गुप्तता पाळण्यात येत आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या वारंवार होणार्‍या बैठकीत अमरावती मतदारसंघाकरिता काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ पातळीवरील नेतेही अमरावतीच्या बदल्यात काँग्रेसकडे असलेला यवतमाळ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्याची खेळी करतायेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री मनोहरराव नाईक
यांच्याकरिता राष्ट्रवादी उत्सुक आहे.

राज्याच्या राजकारणात अमरावती मतदारसंघाच्या मागणीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच रस्सीखेच सुरू असल्याने रिपाइं गवई गटाने राज्यात 13 मतदारसंघांत निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. भविष्यात मात्र अमरावती मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावेल ही बाब निश्चित समजली जाते.