आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या साठेबाजीमुळे कापसाचे दर काेसळतील!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक क्षेत्रात म्हणजेच विदर्भ, मराठवाडा खान्देश या पट्ट्यात सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये हंगाम सुरू होताना कापसाचे उत्पादन, त्याचा हमीभाव या विषयांवर तावातावाने चर्चा केली जाते. सरकारला सल्ले दिले जातात. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला शासनाला जबाबदार धरले जाते. राज्यकर्त्यांकडून खूप अपेक्षा बाळगल्या जातात. एकंदरीत भरपूर राजकारण व शून्य अर्थकारण असा नेहमीचा अनुभव असताे. यावर्षीदेखील शासनाने ४१६० रुपये असा हमीभाव जाहीर केला. त्यापेक्षा कमी भावाने खरेदी केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? सोशल मीडियावर महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञाची पोस्ट व्हायरल झाली; त्यामध्ये यावर्षी कापसाला प्रति क्विंटल ७ ते ८ हजार रुपये भाव मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

दुसरीकडे मुख्यमंत्री हमीभावाबाबतदेखील साशंक आहेत. नेमकी वस्तुस्थिती जाणण्याचा प्रयत्न केल्यास विदारक परिस्थिती समोर येते. देशपातळीवरील कापूस हंगाम २०१४-१५ मध्ये १४.६७ दशलक्ष आरंभीचा साठा होता. त्यावर्षी ३७.७६ दशलक्ष गाठींचे उत्पन्न झाले. १.७५ दशलक्ष गाठी आयात करण्यात आल्या. अशा ५४.०० दशलक्ष गाठींचा साठा उपलब्ध होता. पैकी ३१.३६ दशलक्ष गाठींचा देशांतर्गत खप झाला, तर ५.३८ दशलक्ष गाठींची निर्यात झाली. अशा रीतीने ३६.७४ दशलक्ष गाठींचा खर्च विचारात घेता पुढील हंगामासाठी १७.२७ दशलक्ष गाठींचा साठा उपलब्ध होता. म्हणजे उपलब्धता आणि खप यांचे प्रमाण ३९.९३ टक्के होते. पुढील २०१५-१६ मध्ये १७.२७ दशलक्ष गाठी आरंभीची शिल्लक होती. त्यावर्षी ३३.७९ दशलक्ष गाठींचे उत्पादन झाले. १.३७ दशलक्ष गाठी आयात करण्यात आल्या. अशा प्रकारे ५२.४३ दशलक्ष गाठींपैकी ३१.०४ लाख गाठींचा वापर, तर ७.३७ दशलक्ष गाठींची निर्यात झाली. अशा प्रकारे ३८.४१ दशलक्ष गाठींचा वापर झाला. या वर्षात १४.०० दशलक्ष गाठींची शिल्लक आहे. मागील वर्षीची उपलब्धता आणि वापर याचे गुणाेत्तर ४४.९५ टक्के असे आढळून येते.

या आकडेवारीनंतर चालू हंगामाचा अंदाज लक्षात घेता १४.०० दशलक्ष गाठी आरंभीची शिल्लक ३३.९२ टक्के उत्पादन व १.२८ दशलक्ष गाठींची आयात अशा एकूण ४९.२० दशलक्ष गाठी शिल्लक राहतील. पैकी ३०.७२ दशलक्ष गाठींचा वापर होईल. ४.९९ दशलक्ष गाठींची निर्यात होईल. एकूण ३५.७१ दशलक्ष गाठी शिल्लक राहतील. ३९.२१ टक्के शिल्लक गाठींचे गुणोत्तर येईल. आॅक्टाेबर २०१६ पर्यंत १४.०० दशलक्ष गाठी शिल्लक असतील. ३३.९२ दशलक्ष गाठींचे उत्पादन होईल, तर १.९२ दशलक्ष गाठींची आयात होऊन ४९.८४ दशलक्ष गाठी शिल्लक राहतील. पैकी ३०.७२ दशलक्ष गाठींचा वापर होईल. ४.९९ दशलक्ष गाठींची निर्यात होईल.

अशा प्रकारे ३५.७१ दशलक्ष गाठींचा वापर होऊन १४.१३ दशलक्ष गाठी शिल्लक राहतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मागील काही वर्षांची आकडेवारी चाळल्यास देशांतर्गत मागणी आणि उत्पादन यामध्ये प्रचंड तफावत आढळून येत नाही. कापूस नाशवंत नाही. त्याची मागणी केवळ हंगामी नाही. तरीही त्याचा भाव नियंत्रणात राहत नाही, असाच आतापर्यंतचा अनुभव आहे.

देशातील उत्पादन आणि वापर यात फार चढउतार नसले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कापसाच्या भावावर परिणाम करते हे प्रथम सत्य आहे. कापूस या पिकाबाबत चर्चा करताना पाकिस्तान, चीन आणि अमेरिका या देशांचे कापूस धोरण लक्षात घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानात मागणीत सातत्य असले तरी उत्पादनात माेठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांची आयात अनैसर्गिकरीत्या वाढते. हा घटक जागतिक बाजारपेठेवर परिणाम करतो. अमेरिकेत साधारणत: २० दशलक्ष गाठींचे उत्पादन होते. ४-५ दशलक्ष गाठींचा वापर होतो आणि उर्वरित गाठींची निर्यात होते. चीनमध्ये मागील वर्षी उत्पन्नात घट होऊनही त्यांनी ८५.६६ दशलक्ष गाठींचा साठा केला आहे.

या कापूस वर्षात चीनने मोठ्या प्रमाणात कापूस गाठींचा साठा कमी करावयाचा ठरवल्यास जगात कापसाचे भाव कोसळू शकतात किंबहुना स्थिर राहू शकतात. या सर्व घटकांचा विचार केल्यास आपल्या देशातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक, प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्या हाती कापसाच्या भावावर नियंत्रण राखण्याचे सामर्थ्य नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. नगदी पीक म्हणून कापसाचा बोलबाला आहे. परंतु वाढता उत्पादन खर्च, घटणारी उत्पादकता, भावातील चढउतार यामुळे शेतकरी कमालीचा नाराज आहे. तो आत्महत्येस प्रवृत्त होतो, ही वस्तुस्थिती आहे.
डॉ. नीळकंठ पाटील, जामनेर
बातम्या आणखी आहेत...