आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकलूजकरांच्या अस्वस्थतेतून ‘माढ्या’त निर्माण होतोय पेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा तसा आजवर राष्‍ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, पण या बालेकिल्ल्यातील ‘माढा’ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी वादग्रस्त बनला होता. त्यापूर्वी लोकसभा मतदारसंघातही तीच स्थिती होती. पण शरद पवार लोकसभेचे उमेदवार म्हणून पुढे आल्याने तेथे राष्‍ट्रवादीत एकोपा दिसला. त्या वेळी मोहिते पाटील घराण्यात दोन आमदार व एक खासदार अशी स्थिती होती. पुढे मोहिते पाटील घराण्यातील कोणीही लोकप्रतिनिधी नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.या वर्षात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदारकी देऊन काहीसे त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला, पण मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

सत्तेपासून बरेच दिवस दूर राहिल्याने मोहिते पाटील बंधूंमध्ये काहीशी नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे, पण विजयसिंहांनी कधी ती जाहीरपणे अथवा कृतीतूनही दाखवून दिली नाही. संयम ठेवूनच वागतो आहे, असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. साखर संघाच्या अध्यक्षपदावर ते सक्रिय कामही करीत आहेत. पण अलीकडच्या काळात अकलूजमध्ये ज्या राजकीय घडामोडी होताहेत त्यावरून मोहिते पाटील घरातूनच शरद पवारांना विरोध होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतापसिंह मोहिते पाटील हे विजयसिंहांचे बंधू आहेत. ते काँग्रेसमध्ये असल्याने तशा राजकीय अर्थाने विजयसिंह आणि प्रतापसिंह यांचा थेट संबंध नाही.त्यामुळे शरद पवारांवर आता प्रतापसिंह मोहिते पाटील जी टीका करीत आहेत त्यात विजयसिंह मोहिते पाटील कुठे आहेत याची चर्चा जोरात रंगली आहे.

गेल्या महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे अकलूज दौ-यांवर येऊन गेले. त्यात मोहिते पाटील यांनी मांडलेल्या मागण्यांवर फारसा विचार झाला नाही, अशी चर्चा आहे. तेव्हापासून अकलूजमधील कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळी मते नोंदवली जात आहेत. त्याची पहिली ठिणगी पडली ती प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जाहीरपणे केलेल्या टीकेमुळे. त्यावर अजित पवार समर्थकांनी उत्तरे दिली. हा कलगीतुरा जिल्ह्यातील अगदी दुस-या , तिस-या फळीतील कार्यकर्त्यांच्या पातळीवर होता. त्यानंतर भाजप-सेनेच्या युतीच्या सत्तेत राज्यमंत्री राहिलेल्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांनीही जाहीरपणे दोन्ही पवारांवर टीका केली.

आता माढ्यातून निवडणूक लढवून दाखवाच, असे आव्हानच त्यांनी दिले आहे. त्यामुळे ही राजकीय लढाई आता पहिल्या, दुस-या फळीतील नेत्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. प्रतापसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसमध्ये असले तरी त्यांचा सक्रिय सहभाग नाही. त्यामुळे काँग्रेसही त्यांच्या पाठीशी नाही. दुसरी बाब म्हणजे प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी 11 फेब्रुवारीच्या अकलूज येथील ज्या सभेत पवारांवर टीका केली त्या सभेला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे, बार्शीतील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर उपस्थित होते, हे विशेष. या वेळी बोलताना त्यांनी आपला काँग्रेसशी काहीच संबंध राहिला नाही, असे जाहीर करून टाकले आहे. त्याचा अर्थ ते आता भाजप-सेनेच्या जवळ जात आहेत, असा घेतला जात आहे.

राज्यात भाजप-सेना सत्तेत आल्यानंतर महाराष्‍ट्रातील काही नेते युतीकडे गेले, त्यात प्रतापसिंह होते. त्यांना राज्यमंत्रिपद दिले गेले, पण 2003-4 च्या निवडणुकी वेळी ते परत काँग्रेसमध्ये आले. त्यांना काँग्रेसने विधान परिषदेवर संधी दिली. नंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांसाठी त्यांनी प्रचार केला आणि आता एकदम शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतली. त्याला अनेक कारणे असल्याचे बोलले जाते. सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक आदी महत्त्वाच्या संस्थांपासून त्यांना दूर ठेवले गेले आहे. अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. तो मोहिते-पाटील यांनी थेट शह देवू लागला आहे. शिवाय जिल्ह्यात म्हणावी तशी कामेही झालेली नाहीत. माढा मतदारसंघातील विकासाबाबत ज्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या त्या होत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. या एकूणच परिस्थितीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते. अजित पवारांनी अद्याप उघडपणे कोणती प्रतिक्रिया नोंदली नाही. मोहिते-पाटील यांची ही राजकीय खेळी राष्ट्रवादीवर दबावतंत्र आणण्याचा भाग तर ना? अशीही चर्चा आहे.