आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासादर प्रणाम- आज ९९ वर्षे झाली तुम्हाला जन्म घेऊन. 100 व्या वर्षात तुमचा प्रवेश आहे. त्यामुळे तुमचा 100 वा वाढदिवस हा स्मृती म्हणून साजरा केला जाईल. मी तुम्हाला भेटलो, त्याला झाली 2८ वर्षे. तुमच्या सहवासाने आमची आयुष्ये बदलून गेली.आमच्यासाठी तुम्ही मोलाचे हे आज पदोपदी लक्षात येते.
मला आठवते 1९८5चे वर्ष. 1९ डिसेंबर रोजी मी कन्याकुमारीला पोहोचलो. 24 डिसेंबरला साने गुरुजींच्या जयंतीच्या दिवसापासून तुम्ही ‘भारत जोडो’ अभियान सुरू करुन 11६ तरुण-तरुणींना सायकलवर घेऊन तुम्ही भारत जोडोचा संदेश भारतभर देणार होता. त्यासाठी माझी निवड झाली होती. तुम्ही 20 तारखेला आलात. कन्याकुमारीतील विवेकानंद केंद्रात आम्ही सगळे देशभरातील तरुण-तरुणी जमा झालो होतो. काश्मीरपासून आसामपर्यंत व तामिळनाडूपासून बंगालपर्यंत सगळे जमा झाले होते. डिसेंबर महिना होता. तुम्ही अर्ध्या चड्डीवर व बनियनवर हातात काठी घेऊन आलात. पाहण्याची, अनुभवण्याची मनीषा कन्याकुमारीत पूर्ण झाली. करडा आणि मोठा आवाज, भेदक नजर आणि शरीरयष्टी धिप्पाड. तुम्ही येताच सगळे तुमच्या पदस्पर्शासाठी वाकले, तसा मीही वाकलो आणि धन्य झालो. ९0 च्या दशकात देशात अराजक माजले होते. वेगळ्या खलिस्तानसाठी पंजाब, राखीव जागांच्या विरोधात गुजरात, गुरखालँडसाठी पश्चिम बंगाल, बोडोलँड व परदेशी नागरिकांच्या विरोधात आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, मनुष्यहानी होत होती. त्यात कावेरीच्या पाण्यासाठी कर्नाटक-तामिळनाडू, भाषेच्या नावाखाली महाराष्ट्र व कर्नाटक आणि काश्मीरमध्ये अस्वस्थता होती. अशा वातावरणात देश तुटतो की काय, अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत तुम्ही ‘जोडो भारत’चा नारा दिला. विनोबांनी ‘जय जगत’चा नारा दिला आणि जगाला एक होण्याचा संदेश दिला. अभियान निघाले. 1६ राज्यांतून मुले-मुली आले होते. 14 राज्यांतून हे अभियान जाणार होते. वेगवेगळ्या भाषा असलेले आम्ही कधी एक झालो, तेही कळले नाही. रोज सकाळी पहाटे पाच वाजता उठणे, प्रार्थना व त्यानंतर तुम्ही बोलत असत. यदुनाथ थत्ते यांनी हे अभियान का व कशासाठी निघणार ते सांगून तुमच्याबद्दल खूप सांगितले. देशाप्रती संवेदनशील राहण्याचा संस्कार या अभियानातून आम्हाला मिळाला.
तुमची मुलं विकास-प्रकाश यांना आनंदवनातीलच शाळेत इतरांसारखे सामान्यपणे शिकवले. ते मोठे झाले. डॉक्टर झाले. त्यांनी तुमच्यासोबत काम करण्याचे ठरवले. विकास यांनी आनंदवन सांभाळले आणि डॉ. प्रकाश याला महाराष्ट्राच्या अतिदुर्गम भागात भामरागडसारख्या भागात काम करण्याची प्रेरणा दिली. डॉ. दिगंतने आदिवासी माडिया-गोंड समाजासाठी आपले जीवन व सेवा देण्याचा निर्णय केला. तिथे वीज, शुद्ध पाणी, दळणवळण, रस्ते नव्हते, 5-६ महिने पावसाळ्यात जगाशी संपर्क होत नसे, अशा भागात डॉ. दिगंतने काम करण्याचा निर्णय घेतला. हा वारसा अर्णव, निर्झर व आहन हे तिघेही समर्थपणे पुढे नेत आहेत, याचा अभिमान तुम्हाला आज झाला असता. काम करण्या-यांना तुम्ही सोबत इथेच आहात असा भास होतो. इकडे आनंदवनात विकासभाऊ यांचा संघर्ष चालू आहे. 5-६ हजार कुष्ठरोगी, बाकी सगळे अंध, अपंग, रोगी, निरोगी, अनाथ इतर लोकांना सांभाळण्यात ते मश्गूल झाले. 12९ उद्योगांचा पसारा वाढवला. स्वरानंदवन हा वाद्यवृंदातून वेगळे स्वप्न साकारले आहे. ही प्रेरणा घेऊन कुणी छोटे-मोठे काम करताहेत. कोणी लोकविज्ञानचे, कोणी आरोग्याचे प्रकल्प राबवताहेत, कोणी पर्यावरण तर कोणी शेती प्रकल्पात कामे करताहेत. तुम्ही आमच्यासमोर युवाग्राम, हिंमतग्राम, यूथ इमर्जन्सी सव्हिर्सेस (एस) अशा कल्पना मांडल्या. मध्य प्रदेशमध्ये झाबुवात युवाग्राम प्रकल्प सुरू झाला. या प्रवासात आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, अशोकवन हे प्रकल्प आमटे कुटुंबीयांसह तिथे राहणारी तिसरी पिढी तुम्ही उभा केलेला समाजसेवेचा डोंगर उत्तम पद्धतीने चालवत आहे. आज तुमच्या समाधीजवळ तुम्हाला आवडणा-या फुलांच्या बागांनी,झाडांनी गर्दी केलीय. हजारो लोक आजही आनंदवन पाहण्यास येतात तुम्ही व साधनाताई आमच्या प्रेरणा आहात. तुमच्या जन्माला या वर्षी 100 वर्षे होतील. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम!
तुमचा
दगडू लोमटे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.