आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटच्या विश्वात ‘डीडॉस’ची दहशत; इंटरनेट सेवा पुरवठादार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीडॉस (डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस) म्हणजे एकाच वेळी असंख्य संगणक, राऊटर्स, आयपी कॅमेरा हॅक करून एखाद्या वेबसाइटवर भरपूर विनंत्या पाठवायच्या; जेणेकरून सामान्य व्यक्तीला त्या वेबसाइटवर जाता येऊ नये. असंख्य विनंत्यांमुळे इंटरनेटची गती कमी होऊन संबंधित वेबसाइटचा सर्व्हर डाऊन होतो आणि कामात अडथळा निर्माण केला जातो.
औरंगाबाद- इंटरनेटच्या विश्वात खळबळ माजवणाऱ्या ‘डीडॉस’ हल्ल्यामुळे इंटरनेट सेवा देणाऱ्या पुरवठादार कंपन्यांना चांगलीच धडकी भरली आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यातील काही कंपन्यांची सेवा ठप्प झाली. हल्ले रोखण्यासाठी कंपनी संचालकांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. परंतु असा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नसून मागील १५ वर्षांत हॅकर्सनी बीबीसी, याहू, सीएनएन, स्पॅमहाऊससह जगातील अनेक नामांकित कंपन्यांची यंत्रणा ठप्प करण्याचे काम केले. बँकिंग तसेच ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांसाठी हा हल्ला खूप धोकादायक ठरत आहे.

रोबोटप्रमाणे अंमलबजावणी
हॅक केलेल्या हजारो संगणकांचा समूह म्हणजे बॉटनेट. रोबोट या शब्दातून बॉट हा शब्द वेगळा करून त्याला नेट जोडण्यात आले. एकच व्यक्ती एका ठिकाणी बसून हॅक केलेल्या हजारो संगणकांना आदेश देतो आणि रोबॉट ज्याप्रमाणे आदेशाची अंमलबजावणी करतो तसेच आदेश हॅक केलेल्या असंख्य संगणकांद्वारे पाळले जातात. ‘मालवेअर’ या सॉफ्टवेअरच्या आधारे इतरांचे सर्व्हर स्वत:च्या सर्व्हरला जोडून गैरकृत्य केले जाते. हॅकर्सनी किती संगणक हॅक केले आहेत त्यावर हल्ल्याची तीव्रता निश्चित होते. उदा. एखाद्या हॅकरकडे २० हजार संगणकाचा बॉटनेट आहे, तेव्हा तो त्या सर्व संगणकांना रेल्वेचे आरक्षण केल्या जाणाऱ्या आयआरसीटीसी या वेबसाइटवर विनंत्या पाठवण्याचे आदेश देतो, एकाच वेळी असंख्य विनंत्या आल्याने वेबसाइटची गती कमी होते आणि आपोआप सर्व्हर डाऊन होते आणि प्रवाशांना आरक्षण मिळणे अशक्य होते.

बड्या कंपन्यांना फटका
पहिला डीडॉस हल्ला केव्हा झाला हे सांगणे अवघड असले तरी १९९९ मध्ये याची सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठाचा सर्व्हर डीडॉस हल्ल्यामुळे डाऊन झाला होता. त्यानंतर २००० मध्ये याहू, बे, सीएनएन या कंपन्यांना याचा फटका बसला. जानेवारी २०१६ मध्ये बीबीसीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा डीडॉस हल्ला झाला. बीबीसीचे टीव्ही आणि रेडिओ नेटवर्क यामुळे तब्बल तीन तास बंद होते. न्यू वर्ल्ड हॅकर्स ग्रुपने टि्वटरवर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून सेकंदामागे ६०० जीबी वेगाने हल्ला केल्याचा दावा केला होता. पुण्यात नुकताच गॅझॉन कम्युनिकेशन ऑफ इंडिया या कंपनीवर डीडॉस हल्ला झाला.
हल्ल्याचे प्रकार वाढले
डीडॉस हल्ल्याचे प्रकार फार पूर्वीपासून सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांत हल्ल्याचे प्रकार वाढले. ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या कंपन्यांना हॅकर्स ई-मेल पाठवून बिटक्वाइनची (डिजिटल संपत्ती) मागणी होत आहे. जर बिटक्वाइन देण्यास नकार दिला तर कंपन्यांवर डीडॉस हल्ल्याची धमकी दिली जाते.
-स्वप्निल वडवळकर, सिक्युरिटी रिसर्चर.

पकडणे अवघड
हजारो आयपी अॅड्रेस हॅक केले जात असल्याने हल्ले करणाऱ्यांना पकडणे अवघड आहे. केवळ अँटिव्हायरस इन्स्टॉल करून काहीही होणार नाही. प्राथमिक सायबर सुरक्षेवर लक्ष द्यावे लागेल. ऑपरेटिंग सिस्टिम अपग्रेड करणे, कमी दर्जाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे आदी गोष्टी कराव्यात.
-ब्रिजेश सिंग, पोलिस महानिरीक्षक, सायबर.
बातम्या आणखी आहेत...