आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepak Patave Article About Marathwada Leadership

भाजपचे संभाव्य नवे रावसाहेब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'आं धळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन डोळे' अशी रावसाहेब दानवे पाटलांची सध्याची अवस्था आहे. गोपीनाथ मुंडे यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर मराठवाड्याला नेताच उरला नाही, असे सूर निघायला लागले तसे हे दानवे पाटील अस्वस्थ व्हायला लागले होते. केंद्रीय राज्यमंत्रिपद, दोन वेळा आमदारपद, चौथ्यांदा लोकसभेतला विजय, पक्षाचं प्रदेश उपाध्यक्षपद मिरवलेलं असा भरगच्च बायोडाटा असताना मराठवाड्याचे नेतृत्व आपण करू शकतो, हे कोणी का म्हणत नाही, याची खंत त्यांना वाटत होती. अर्थात, त्यांच्या या भावना त्यांचे निकटवर्तीयच सांगत होते. आता अचानक पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आलं आहे. मराठवाड्याचेच नाही, महाराष्ट्राचे नेते बनण्याची ही संधी आहे.
रावसाहेब दानवेंकडे संघटनकौशल्य चांगलं आहे. कोणत्या माणसाशी कोणत्या भाषेत बोलायचं, हे त्यांना चांगलं कळतं आणि तितकंच चांगलं जमतंही. त्यामुळेच कदाचित एकदा विधानसभा निवडणुकीतला पराभव वगळला तर सहा वेळा ते विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक जिंकले आहेत. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या जामखेड या गावचे सरपंचपद, नंतर पंचायत समिती सदस्य, सभापती, आमदार, खासदार, केंद्रात मंत्री असा त्यांचा राजकारणाचा आलेख चढत गेला आहे. खरं तर विलासराव देशमुख यांचाही राजकीय आलेख असाच होता; पण ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. तेवढं भाग्य दानवेंच्या नशिबात आहे की नाही, हे सांगता येत नाही. देवेंद्र फडणवीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा कोणाला वाटलं होतं ते एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री होतील असं? जोपर्यंत नरेंद्र मोदींचा प्रभाव भारतीय राजकारणावर आहे तोपर्यंत ह्यआले मोदींच्या मनाङ्घह्ण अशी अवस्था राहील आणि त्या अवस्थेत कोणाला काय संधी मिळेल हे सांगता येत नाही.
रावसाहेब दानवे केंद्रात राज्यमंत्री असले तरी त्यांच्याच जिल्ह्याचे बबनराव लोणीकर राज्यात कॅबिनेट मंत्री बनले आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीही झाले. त्यामुळे जिल्ह्यातलं प्रभावकेंद्र बदललं. 'मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री बनता की जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद घेता? असा प्रश्न कोणी मला विचारला तर मी चटकन जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारीन', असं एक खासदार अनौपचारिक गप्पांमध्ये बोलून गेले होते. त्यांना दोन्ही पदांबाबत कोणी विचारलं नाही ही गोष्ट वेगळी; पण त्यांच्या बोलण्यातून रावसाहेब दानवेंची सध्याची अवस्था लक्षात यावी. त्यात बबनरावांना सत्ताधीश केल्याने तर त्यांची आणखीनच गोची झाली आहे. दोघांमधले संबंध बाहेर कोणाला माहिती नसतील; पण वाखाणण्याइतके काही ते चांगले नाहीत. बबनराव लोणीकर हे नाना उपाख्य हरिभाऊ बागडे यांचे राजकारणातले मानसपुत्र म्हणून ओळखले जातात यातच सारे काही आले. अर्थात, राजकारणात लोकं कशाचा काय अर्थ काढतील, हेही सांगता येत नाही. परतूरला बबनराव लोणीकरांच्या विरोधात औरंगाबादचे गायक राजेश सरकटे यांनी उमेदवारी केली. याच सरकटेंनी म्हणे रावसाहेब दानवेंचा ते राज्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीत सत्कार केला होता आणि त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला दानवेंचा आशीर्वाद होता, अशाही वावड्या उठवल्या गेल्या. ज्या माणसावर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची जबाबदारी असेल तो माणूस आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात असं काही करण्याची सुतराम शक्यता नाही. तरीही परतूर मतदारसंघातले काही लोक अशा कंड्या पिकवत होते. असो. मुद्दा असा की, बबनराव लोणीकरांपेक्षा मोठं, प्रभावी पद मिळणं ही राजकीयदृष्ट्या रावसाहेब दानवेंची गरज बनली होती आणि आता त्या गरजेची पूर्ती होताना दिसते आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असणे आणि तेही भारतीय जनता पक्षासारख्या केडरबेस पक्षाचे ते पद असणे ही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन्ही नेते प्रदेशाध्यक्षाला किती महत्त्व देतात हे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्राने अनुभवलेले आहे. त्यामुळेच दानवेंना पुढची काही वर्षे राज्याच्या राजकारणात बऱ्यापैकी महत्त्व मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.
या सगळ्या स्थित्यंतरात मराठवाड्याच्या नेतेपदाचे काय, हा प्रश्न शिल्लक राहतोच. रावसाहेब दानवे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राज्य पातळीवरचे नेते बनतील हे खरे; पण त्यामुळे मराठवाड्याचे नेतेपद आपोआपच त्यांना मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर ठामपणे हो असे देता येत नाही. कारण या दोन्ही पदांमध्ये फरक आहे. प्रदेशाध्यक्षपद हे राजकीय पक्षाचे पद आहे आणि कोणी एक-दोघांनी ठरवून त्यांना ते दिले आहे. मराठवाड्याच्या नेतेपदाबाबत तसे नाही. ते पद जनतेने द्यायचे आहे. गोपीनाथ मुंडे यांना लोकांनी आपले नेते मानले म्हणून ते लोकनेते झाले होते. विलासराव देशमुख लोकप्रतिनिधींचे नेते बनले होते. स्वपक्षातीलच काही अपवाद वगळले तर इतर पक्षातील आमदारही विलासरावांना आपला नेता मानत. प्रमोद महाजनांनी कॉर्पोरेट पद्धतीने सर्व काही नियोजनबद्धपणे घडवून आणले होते. रावसाहेब दानवे यातला कोणता मार्ग पत्करणार आहेत? की स्वत:चा वेगळा मार्ग आखणार आहेत आणि तो मार्ग कसा असेल यावर मराठवाड्याचे नेतेपद त्यांना मिळते की नाही हे अवलंबून राहणार आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या गैरसोयीच्या असलेल्या माणसाला त्याच्या नकळत चकवा देण्यासाठी ओळखले जाणाऱ्या दानवेंना मराठवाड्याचे नेतेपदही चकवा तर देणार नाही ना, हे काळच ठरवेल.