आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या मनात आनंदाचे लाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम आदमी पार्टीचे कोणत्या पक्षावर काय परिणाम झाले आहेत हा सध्या राजकीय अभ्यासकांचा कुतूहलाचा विषय बनला आहे. प्रत्येकच पक्षाने ‘आम’ संस्कृतीचे कुठे ना कुठे, काही ना काही अनुकरण चालवले असले तरी ते छुप्या पद्धतीने आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र अनुकरणात आडपडदा मुळीच ठेवलेला नाही हे राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून स्पष्ट झालंच आहे. असं असताना महाराष्‍ट्रातला भाजप मागे कसा राहील? महाराष्‍ट्रात या पक्षाने उमेदवार निवडण्यासाठी अनुभवी आणि विश्वासार्ह एजन्सीकडून सर्वेक्षण करवून घेण्याचा निर्णय घेतला आणि तसे सर्वेक्षण करवूनही घेतले आहे. त्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पक्षासाठी आनंददायक असल्याचे संकेत मिळाले असून भाजप नेत्यांचा आत्मविश्वास त्यामुळे प्रचंड वाढला आहे.
‘चाणक्य’ नावाच्या राजकीय सर्वेक्षण करणा-या कंपनीला भारतीय जनता पक्षाने महाराष्‍ट्रातील सर्वेक्षणाचे काम दिले होते. चाणक्यलाच का? तर याच एजन्सीने दिल्लीतही विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण केले होते आणि त्यांचे अंदाज इतर कोणत्याही सर्वेक्षणाच्या तुलनेत निकालांशी जवळीक साधणारे होते. त्यामुळे महाराष्‍ट्र भाजपने त्याच चाणक्यची निवड केली. त्यांच्याकडून कोणत्या मतदारसंघात विजय मिळू शकतो आणि कुठे कोण उमेदवार असणे लाभदायक ठरू शकते, हेही जाणून घेतले. विश्वसनीयरीत्या मिळालेली माहिती सांगते की, मुंबईत यंदा भाजपला सहापैकी किमान 5 जागांवर विजय मिळेल, असे चाणक्यने ठणकावून सांगितले आहे.
उत्तर महाराष्‍ट्राचा विचार करायचा तर 8 जागांपैकी किमान 7 जागा भाजपच्या पारड्यात पडतील, अशीही शक्यता या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. अर्थात, एक कोणती जागा जाऊ शकते, हे मात्र सांगायला पक्षातील नेते तयार नाहीत. त्यामुळे परंपरागतरीत्या काँग्रेसचा बोलकिल्ला असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पराभवाचे संकेत चाणक्यने दिले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तो साफ खोटा ठरला आहे. भाजपच्या नेत्यांनाही धक्का देणारा अहवाल या एजन्सीने दिला असून या वेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे येईल, अशी खात्रीच सर्वेक्षणाच्या अहवालातून देण्यात आली आहे.
फार पूर्वीपासून भाजपच्या नेत्यांसाठी नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय राहत आला आहे. ज्या दिवशी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येईल त्या दिवशी दिल्लीत अर्थात केंद्रात केवळ भारतीय जनता पक्षाला (एनडीएला नव्हे) बहुमत मिळालेले असेल, असे भाजपचे नेते सांगत आले आहेत. यंदा चाणक्यसारख्या एजन्सीने नंदुरबार लोकसभा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडणार असल्याची खात्री दिलेली असल्याने केंद्रात भाजपला किती जागांवर विजय मिळेल याचेच गणित मांडण्यात भाजपचे प्रदेश पातळीवरील नेते सध्या मश्गूल नसतील तरच नवल. ही सर्वेक्षण एजन्सी भाजपला खुश करण्यासाठी असे अहवाल देत असेल की खरंच असा काही चमत्कार घडणार आहे, असा प्रश्न ज्यांना या अहवालातले तपशील समजले आहेत त्यातल्या काही नेत्यांना पडला आहे. मात्र, ज्यांना नंदुरबारची परिस्थिती माहिती आहे त्यांना फारसे आश्चर्य वाटणार नाही.
नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा असून या आदिवासी मतदारांवर गांधी घराण्याची भुरळ पडली आहे, असं पारंपरिकरीत्या समजलं जातं. आतापर्यंत कधीही या लोकसभा मतदारसंघाने काँग्रेसची साथ सोडलेली नाही आणि त्याच इतिहासाची पुष्टी त्या समजुतीला घट्ट करीत आली आहे. यंदा अशी काय परिस्थिती बदलली? तर गुजरात आणि महाराष्‍ट्राच्या सीमेवर असलेला हा जिल्हा यंदा मोदींच्या प्रभावाखाली आहे. सीमेलगत असलेल्या भागात गुजराथी बोलणा-या आणि वाचणा-यांची संख्या फार मोठी आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी सीमेलगत मोंदींच्या जाहीर सभा व्हायच्या. त्या वेळी मोठ्या संख्येने नंदुरबार जिल्ह्यातले लोक त्या ऐकायला जात असत. थेट नंदुरबारपासून नवापूरपर्यंत बहुतांश ठिकाणी आजही गुजरातमधून येणारी वृत्तपत्रे मोठ्या संख्येने वाचली जातात. गेल्या काही वर्षांत आदिवासी तरुणांमध्ये वाढलेले शिक्षणाचे प्रमाण आणि तरुण आदिवासी मतदारांची वाढलेली संख्या हा नवा बदल घडवून आणू शकते हे मानायला बराच वाव आहे.
नाशिक आणि धुळे जिल्ह्यात विखुरलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा विद्यमान खासदार प्रताप सोनवणे यांना उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय भाजपने घेतला आहे. सोनवणे निवडून आल्यानंतर बहुतांश काळ आजारीच होते. त्यामुळे त्यांचा संपर्क राहिला नाही. परिणामी त्यांच्याविषयी मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे सोनवणे यांनी उमेदवारी मागितली असली तरी त्यांना पक्ष ती देणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. त्यांना नाही तर मग कोणाला, या प्रश्नाचे उत्तरही ‘चाणक्य’कडेच मागण्यात आले. लोकसंग्राम पक्षातर्फे आमदार झालेले धुळ्यातील अनिल गोटे, मागच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मागणारे डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील यांचे शालक असलेले सुभाष देवरे आणि मालेगाव तालुक्यातील अद्वय हिरे यांनी भाजपकडे धुळे मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. त्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची, या प्रश्नाच्या उत्तरात सुभाष देवरे आणि सुभाष भामरे ही नावे समोर आली आहेत. या दोघांपैकी पक्ष कोणाला निवडतो हे आता पाहायचे.