आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापाैरपदाच्या सत्ता विभाजनाचा अाैरंगाबादकरांना फायदा हाेईल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद महापालिकेत सामंजस्याने सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत. म्हणजे सध्या शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौर आहेत आणि येत्या आठवड्यात ते राजीनामा देणार आहेत. कारण महापालिका निवडणुकीत मित्रपक्षाला त्यांनी तसे वचनच दिले आहे. शिवसेनेच्या दीड वर्षाच्या महापौरांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल आणि वर्षभरानंतर त्यांची मुदत आपोआपच संपेल. नंतरची अडीच वर्षे पुन्हा शिवसेनेकडे महापौरपद असेल. देशात आणि मुंबईत काहीही होवो, औरंगाबादेतला हा सत्तेचा सारीपाट प्रामाणिकपणे खेळला जाईल आणि त्याचे श्रेय घेणारेही मिरवून घेतील. पण याचा सर्वसामान्य औरंगाबादकरांना काही फायदा होईल का, या प्रश्नाचे उत्तर मात्र येणारा काळच देईल.
या सत्ताबदलात सर्वसामान्य औरंगाबादकरांना किती रस असेल? फारसा नाहीच. औरंगाबादकरांनाच काय, कोणत्याही शहरात सर्वसामान्यांना अशा सत्तेच्या वाटणीत फारसा रस नसतोच. याचे कारण अशा सत्तावाटणीने त्यांच्या आयुष्यात फारसा काही फरक पडत नाही. त्यांचे वैयक्तिक आयुष्य राहू द्या, शहराच्या आयुष्यात तरी फारसा फरक पडावा, अशी अपेक्षाही आताशा कोणी करत नाही. कारण तसेही काही होताना दिसत नाही, असाच आजपर्यंतचा अनुभव आहे. अर्थात, मावळत्या महापौरांचा कार्यकाळ आधीच्या महापौरांच्या कार्यकाळापेक्षा बरा होता की नाही, याची मात्र तुलना केली जाते. या महापौरांच्या बाबतीतही तसे केले जाईल आणि लोक दोन-चार दिवस त्याची चर्चा करतील, एवढेच.

औरंगाबादमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महापालिकेतही मित्रपक्ष असले तरी त्यांच्यात फारसे सख्य आहे असे वरवर तरी दिसत नाही. काही धाेरणांच्या आणि योजनांच्या बाबतीत आैरंगाबादकरांनीही ते अनुभवले आहे. पण आतून मात्र तेच काय, सारेच पक्ष एकाच भूमिकेचे आणि प्रवृत्तीचे आहेत, असाही अनुभव नेहमीच घेतला गेला आहे. शहराच्या विकास आराखड्यात करण्यात आलेले बदल आणि त्यानिमित्ताने या पक्षांनी दाखवलेले सख्य हे त्याचे एक ताजे उदाहरण आहे. आजही शहराचा विकास आराखडा न्यायालयात अडकून पडला आहे आणि त्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत. त्याचे सोयरसुतक ना भाजपला आहे ना शिवसेनेला. दोघेही एकमताने त्यावर मूग गिळून बसले आहेत.
या पार्श्वभूमीवर येत्या दोन आठवड्यांत भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक महापौर होणार आहे. मात्र, हे महापौरपद संस्मरणीय ठरवायचे आहे, असे त्या पक्षाचे नेते सांगू लागले अाहेत. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी भारतीय जनता पक्षाचे देवंेद्र फडणवीस आहेत. त्यांच्याकडून या एक वर्षाच्या महापौरपदाच्या कार्यकाळात शहराला मोठा फायदा करून दिला जाणार आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. फायदा म्हणजे काय, तर शहरासाठी समांतर योजनेला मोठा निधी मिळवून आहे ती खासगीकरणाची योजना गुंडाळली जाईल, शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी सढळ हस्ते दिला जाईल, आणखी काही मोठ्या योजना आणल्या जातील, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या महापौरपदाच्या सत्ता विभाजनाचा औरंगाबादकरांना फायदा होईल, अशी आशा निर्माण केली गेली आहे.

भाजपचे नेते सांगताहेत तसे झाले तर औरंगाबादकर धन्यवादच देतील; पण सरकारकडून निधी खेचून आणला म्हणजे सारे काही झाले, असे होत नाही. सर्वात मोठा प्रश्न असतो तर प्रशासनाकडून कामे करवून घेण्याचा. आज महापालिकेत महापौर आणि आयुक्त यांचे अजिबात पटत नाही, असे चित्र आहे. केवळ शिवसेनेकडून भाजपकडे महापौरपद गेले म्हणजे ते चित्र बदलेलच, असे कसे म्हणता येईल? त्यासाठी प्रशासनाची नाडी माहिती असलेला आणि तरीही कौशल्याने कामे करवून घेणारा नेता हवा असतो. येत्या दोन-तीन वर्षांत महापालिकेच्या प्रशासनाची अवस्था नवख्या नवरीसारखी होणार आहे. कारण बहुतांश पदांवरचे अनुभवी अधिकारी या काळात निवृत्त होणार आहेत. जे अधिकारी त्यांच्या नंतर धुरा सांभाळण्यासाठी पुढे येतील, त्यातील फार कमी अधिकारी योग्य शैक्षणिक पात्रतेचे आहेत. विद्यमान आयुक्त ओमप्रकाश बकोरिया कठोर प्रशासकीय शिस्तीचे आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून परिचित आहेत. ते काही सदासर्वकाळ याच महापालिकेत राहतील असे नाही. नव्याने येणारे अधिकारी कसे असतील, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या सर्व बाबींचा विचार भाजपच्या नेतृत्वाने केला असेल, अशी अपेक्षा करूया. आधी महापौरपदाच्या खुर्चीवर कोणाला बसवायचे इथपासून अंतर्गत राजकारणाला प्रारंभ होणार आहे.

पक्षांतर्गत असलेली दोन सत्ताकेंद्रे त्यासाठी कंबर कसून बसली आहेत. त्यांनी आपल्या मर्जीतला माणूस महापौर करण्यात धन्यता मानण्यापेक्षा योग्य क्षमतांच्या नगरसेवकाला ती संधी देण्याचे मोठेपण दाखवायला हवे, एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
दीपक पटवे,
निवासी संपादक
बातम्या आणखी आहेत...