आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे पास, मुख्यमंत्री नापास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळी अधिवेशन ही खरं तर सत्ताधार्‍यांची परीक्षा असते. विशेषत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी तारेवरची कसरत ठरलेली अनेक हिवाळी अधिवेशने बहुतांश राजकारण्यांच्या आणि पत्रकारांच्या आजही स्मरणात आहेत. यंदा मात्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचीच परीक्षा या अधिवेशनात त्यांच्याच स्वकीयांकडून घेतली जाणार होती. तशी ती घेतली गेली आणि त्यात ते उत्तम गुणांनी यशस्वीही झाले. उलट, विरोधकांकडूनही प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र मिळवत आलेले मुख्यमंत्री मात्र अनपेक्षितपणे नापास झाले आहेत.


विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले एकनाथ खडसे गेल्या अनेक महिन्यांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. अलीकडे तर त्यांना डायलिसिस करावे लागत होते. हा आजार आणि वैद्यकीय प्रक्रिया किती तापदायक आणि आत्मविश्वासाचे खच्चीकरण करणारी आहे हे वेगळे सांगायला नको. त्यातच ऐन अधिवेशनाच्या आधी खडसेंना त्यांच्या सौभाग्यवतींनीच आपली किडनी दान केली आणि लंडनमध्ये जाऊन खडसे यांनी तिचे प्रत्यारोपण करवून घेतले. या शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्णासाठी काही महिने अत्यंत काळजी आणि विश्रांती घेण्याचे असतात. किंचितही संसर्ग चालत नाही. त्यामुळे किमान तीन महिने जवळपास एकांतात राहावं लागतं. खडसेंचे वय लक्षात घेता त्यांना अधिक काळजी घ्यावी लागेल, असा अनेकांचा होरा होता. वर्षभरापूर्वीच आपल्या एकुलत्या एक तरुण मुलाला खडसेंनी गमावले आहे. असा आघात सहन करणे भल्याभल्यांना जमत नाही. त्या आघातानंतर किडनीचा गंभीर आजार उद्भवला. गुडघ्यांचा त्रास तर आधीपासून होताच. अशा सगळ्या परिस्थितीमुळे ते आत्मविश्वास गमावतील, तो शाबूत राहिला तरी आता त्यांचे शरीर त्यांना फारशी साथ देणार नाही, असे त्यांच्याच पक्षातल्या धुरीणांना वाटत होते. खरं सांगायचं तर तसं व्हावं, हीच त्यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांचे विरोधी पक्षनेतेपद हिवाळी अधिवेशनापूर्वी काढून घेतले जाणार असल्याच्या बातम्या थेट मुंबईहून जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या होत्या; पण आपण पूर्णपणे ठणठणीत आहोत आणि विरोधी पक्षनेते म्हणूनच येणारे हिवाळी अधिवेशन गाजवणार आहोत असे जाहीर करून खडसेंनी त्या पसरवलेल्या बातम्यांमधली आणि त्या पसरवणार्‍ यांचीही हवा काढून घेतली होती.


आपण ठणठणीत आहोत असे सांगणे आणि तसे प्रत्यक्षात असणे यात फरक असू शकतो. इतके आघात सोसलेले खडसे अधिवेशनात काय दिवे लावतात पाहू, अशाच पावित्र्यात त्यांचे स्वपक्षातील विरोधक होते. असे कोणी विरोधकच नाहीत, असे खडसे सांगतीलही; पण मुंडेंच्या बंडापासून खडसेंवर मुंडे गटाचा पक्का शिक्का बसला आहे, हे त्यांना नाकारता येणार नाही. त्याच गटबाजीतून खडसेंना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवून सध्या मुनगंटीवार यांना आणि नंतर विनोद तावडेंची विधान परिषदेची मुदत संपल्यावर त्यांना सुरक्षित मतदारसंघातून निवडून आणून त्या पदावर बसवले जाणार असल्याचे ‘नियोजन’ देखील सांगितले जात होते. त्यामुळेच खडसे कितीही सिंहगर्जना करीत असले तरी त्यांची परीक्षा या हिवाळी अधिवेशात होईलच, असे या मंडळींनी ठरवून टाकले होते. स्वाभाविकच, त्यांच्या ‘परफॉर्मन्स’कडे सत्ताधार्‍यांऐवजी त्यांच्या स्वकीयांचेच अधिक लक्ष होते. खडसेंनी मात्र आधीपेक्षाही उत्तम आणि आक्रमकपणे आपली कामगिरी पार पाडली.
याच्या अगदी उलट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबतीत घडले. भ्रष्टाचार, गैरव्यवहार यांचा एकही आरोप करायची संधी ते विरोधकांना देत नाहीत, असे प्रमाणपत्र त्यांना विरोधी पक्षातील नेतेच देत आले आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन असले तरी विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर आगपाखड करायला काही संधी मिळेल, असे त्यांनाही वाटत नव्हते. आदर्श गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशी आयोगाच्या अहवालाने मात्र पारडे पार फिरवून टाकले.


हा अहवाल स्वीकारायचा नाही, असा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने घेतला आणि मुख्यमंत्री चव्हाण विरोधकांचे टार्गेट बनले. इतके दिवस असलेली त्यांची प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमा मलिन व्हायला वेळ लागला नाही. स्वत: कसेही असोत, मुख्यमंत्री चव्हाण भ्रष्टाचार्‍ यांना पाठीशी घालण्यात मात्र मागे नाहीत, असे विरोधकांनाही शंखरवाने म्हणावे लागते आहे.


एकूणच, खडसेंची सद्दी संपणार असे मानणार्‍या स्थानिक खडसे विरोधकांसह राज्य पातळीवरील त्यांच्या विरोधक स्वकीयांनाही हिवाळी अधिवेशनातून खडसेंनीच जोरदार उत्तर दिले आहे. येणार्‍ या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेमुळे आपण तारून जाऊ, असा विचार करणार्‍यांना मात्र याच अधिवेशनाने धक्का दिला आहे. त्याचा परिणाम येणार्‍या वर्षभरातील राजकीय घडामोडींवर नक्कीच होणार आहे.
deepak.patwe@dainikbhaskargroup.com