आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली वार्तापत्र: दिल्लीत मोदींना दिसला यशाचा ‘किरण’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये भाजपचा एकमेव चेहरा नरेंद्र मोदीच होता. मोदी लाटेने भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनाही पडद्याआड केले. निवडणूक राज्याची असली तरी ‘चलो चले मोदी के साथ’ हा भाजपचा एकमेव मंत्र राहिला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांना प्रचारात जराही सन्मान मिळत नसल्याचे चित्र होते. भाजपमध्ये यासंदर्भात अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्यात परंतु निकाल आल्यानंतर या नेत्यांना तोंडावर बोट ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. केंद्राप्रमाणचे विविध राज्यांत भाजप सरकार आणण्यासाठी मोदींशिवाय सध्यातरी भाजपकडे दुसरे अस्त्र नसल्याबाबत सगळ्यांचेच ठाम मत आहे.
पंतप्रधान मोदींनाही स्वत:च्याच नेतृत्वात देश काबीज करायचा असला तरी त्यांना मर्यादा आहेत. अशाही स्थितीत त्यांनी टाकलेले प्रत्येक पाऊल हे अभ्यासपूर्ण असते. दिल्लीत किरण बेदींना लॉंच करण्यामागील त्यांचा उद्देश हा अडथळ्याविना लक्ष्य गाठणे हाच आहे. अन्य राज्याप्रमाणे दिल्लीतील राजकारण नाही. येथील मतदारांचा ठाव घेणे भाजपला अवघड झाले आहे.

चार महिन्यांपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे सर्व्हे करण्यात आलेत त्यात भाजप ५० जागांवर विजय मिळवणार असल्याचे संकेत देण्यात आलेत. त्या वेळी आम आदमी पार्टीही पिछाडलेली दिसून येत होती. परंतु गेल्या तीन महिन्यांच्या काळात भाजप प्रचंड मागे पडला आहे. दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी ३६ सदस्यांची गरज आहे. भाजपच्या वाट्याला केवळ ३२ ते ३४ जागा येऊ शकतात असे भाकीत करण्यात आले. आम आदमी पार्टी २०१३ प्रमाणेच २८ जागा जिंकतील, असे अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या संस्थांनी काय सर्व्हे केलेत त्यावर भाजपचा पूर्ण विश्वास नसतो. याचाच एक भाग म्हणून अत्यंत सूक्ष्म सर्वेक्षण करण्याची यंत्रणा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभारली आहे. भाजपच्या सर्व्हेमध्ये दिल्लीत या पक्षाला केवळ ३८ जागा मिळू शकतात. अर्थात भाजपला ही खूप मोठी रिस्क वाटत आहे. पुन्हा २०१३ चे चित्र राहण्याची भीती भाजपला वाटत आहे.
गेल्या निवडणुकीत डॉ. हर्षवर्धन यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी होता. स्वच्छ प्रतिमा आणि भारतातील पल्स पोलिओ मोहिमेचे जनक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यामुळे दिल्लीकरांपुढे डॉ. हर्षवर्धन आिण अरविंद केजरीवाल असे दोन पर्याय होते. तरीही त्या वेळी भाजपला ३२ जागांवर समाधान मानावे लागले. २०१३ च्या सर्व्हेमध्ये भाजपचेच सरकार येईल अशी खात्रीलायक भविष्यवाणी होत होती. अन‌् आम आदमी पार्टी जेमतेम खाते उघडेल हे भाकीत खोटे ठरले होते.

या वेळी स्थि‍ती वेगळी आहे. मोदीचा झंझावात देशात असला तरी मुख्यमंत्री म्हणून हर्षवर्धनसारखा प्रभावी व्यक्ती भाजपकडे नाही. मुख्यमंत्री म्हणून दिल्लीकरांनी केजरीवालांना सर्व्हेमध्ये दिलेला कल पाहता मोदींची चिंता वाढली अन‌् नाइलाजास्तव त्यांना किरण बेदींना भाजपचा चेहरा करावे लागले. किरण बेदी यांचा इतिहास दिल्लीकरांना माहीत आहे. अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या खांद्याला खांदा लावून लोकपालसाठीचे दिल्लीतील आंदोलन यशस्वी करण्यात त्यांचेही योगदान होते. केजरीवाल इतक्याच त्या अण्णांना जवळच्या होत्या. परंतु जसजसे यश मिळत जाते तसतसे सहका-यांबाबतच्या भावना कलुषित होतात तसे या आंदोलनाचे झाले. केजरीवालांनी राजकीय पक्ष काढून निवडणुकीच्या रिंगणात उतरणे किरण बेदींना आवडले नाही. त्यावेळी बेदींनी केजरीवालांवर किरकोळ टीका टिप्पणी केली होती. तत्पूर्वी भाजप आणी कॉंग्रेस भ्रष्टाचारी पक्ष असल्याची टीका त्यांच्याकडून झाली.
लोकपालचा मसुदा तयार झाल्यावर तो लोकपाल नसून ‘जोकपाल’ असल्याचा शब्द प्रसृत करणा-या किरण बेदीच होत्या. मोदींची जागा कारागृहात असावी इथपर्यंत त्या मजल मारून गेल्यात. परंतु गेल्या वर्षातील केजरीवालांचा चढता आलेख पाहता मनुष्य स्वभावाप्रमाणे बेदींना केजरीवालांचा द्वेष वाटायला लागला. नरेंद्र मोदींच्या स्वच्छता मोहिमेचा स्वत:ला एक भाग बनवून घेत त्यांनी मोदींचे गुणगान करायला सुरुवात केली. त्यानंतर किरण बेदी या भाजपत जातील असे संकेत मिळत गेले. त्याही नेतृत्व मिळावे याची संधी शोधत होत्या. नरेंद्र मोदी आणी अमित शहा यांच्यासाेबत चर्चा झाल्यानंतर त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. किरण बेदी यांच्या प्रवेशामुळे आम आदमी पार्टीवर खूप काही परिणाम होईल, असे नाही. गेले दोन दिवसांत किरण बेदी भावी मुख्यमंत्री असल्याच्या भूमिकेत वावरताना दिसल्यात. यामुळे संपूर्ण आयुष्य भाजपत घालणा-या नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे.
सतीश उपाध्याय, जगदीश मुखी, विजय गोयल यासारख्या दिग्गज नेत्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बेदींच्या आगमनामुळे धुळीस मिळाले आहे. मोदींच्या नेतृत्वात भाजपची निवडणूक लढण्याचा जो उत्साह होता तो गेल्या दोन दिवसांत मावळला गेला. भाजपच्या या नेत्यांमध्ये आतापासूनच नाराजीचे सूर उमटत आहेत. त्याचा परिणाम पक्षावर होईल. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल आणी किरण बेदी यांची तुलना करताना केजरीवाल सरस म्हणूनच दिल्लीकरांची मानसिकता आहे.