संयुक्त पुराेगामी आघाडी सरकारमध्ये झालेले घाेटाळे आणि हे घाेटाळे कसे करण्यात आलेत, देशाची कशी वाताहत झाली, महागाईने कसा कळस गाठला, जमिनी काेणी काेणी लाटल्यात, शेतक-यांनी आत्महत्या कशा केल्यात, बेकारी काेणामुळे वाढली या प्रत्येक प्रश्नाची लाेकसभा निवडणुकीच्या प्रचारात चिकित्सा करण्यात नरेंद्र माेदींना कमालीचे यश मिळाले हाेते. या दहा वर्षांच्या काळात भाजप विराेधी बाकावर हाेता. परंतु प्रत्येक भ्रष्टाचाराला त्यावेळी विराेधी पक्ष या नात्याने त्यांना सरकारला काेंडित पकडता आले नाही. या दहा वर्षांचा लेखाजाेखा माेदींनी
आपल्या शब्द चमत्कृतीने देशापुढे असा काही मांडला, देशापुढे एकच चित्र उभे हाेते ते म्हणजे चायवाला माेदींचे! सगळीकडे माेदी…माेदी….माेदी…अशा गगनभेदी घाेषणा व्हायला लागल्या हाेत्या. ज्यांना राजकारणाचे अबकड माहिती नव्हते अशा गल्लीबाेळातील पाेरासाेरांच्याही ताेंडातून माेदींचा जप हाेताना या देशाने पाहिले. या देशातील प्रत्येक सुजाण नागरिक काॅग्रेसला शिव्यांची लाखाेली वाहत आिण राहुल गांधी अद्यापही ‘बच्चा है जी’ म्हणत माेदींच्या वारीत एकसाथ निघाले. या प्रत्येकांच्या मनात एकच शब्द बिंबवला गेला हाेता ताे म्हणजे ‘अच्छे दिन आनेवाले है’! ज्यांना हिंदी कधी बाेलता आली नाही त्यांना मात्र अच्छे दिन आनेवाले है, हे वाक्य सहजतेने म्हणता आले.
पंतप्रधान हाेण्यापूर्वीच माेदींनी या देशातील लाेकांच्या अपेक्षा खूपच उंचावून ठेवलेल्या हाेत्या. स्वातंत्र्यानंतर काॅंग्रेसचे इतके वर्षे फटके, चटके खाल्यानंतर ज्या विश्वासाने, ज्या खुबीने माेदींकडून शब्दांचे जाळे फेकण्यात येत हाेते. शंका-कुशंका मनात न येऊ देता देशातील जनता त्यात अडकली. देश-विदेशातील विश्लेषकांनी माेदींच्या येण्यामुळे भारत झपाट्याने आर्थिक महासत्तेकडे जाऊ शकताे, अशी भािकतेही केली. जी अमेिरका भारताकडे नजर राेखून बघायची हे चित्र उलट हाेणार असल्याची कुजबूज करणारे महाभाग या वर्षामध्ये पाहयला मिळाले. या काळात पंतप्रधान माेदींनी जगभरात आपली स्तुती करवून घेतली. गुजरातच्या लाेकांकडून विदेशात माेठ्या सभांचे यशस्वीपणे आयाेजन करून घेतले. परंतु वाघाचे कातडे पांघरून डरकाळ्या फाेडण्याचा प्रकार खूप दिवस चालत नाही. माेदींचेही तसेच झाले. भारतात पाच वर्षांचे सरकार आहे, नवे सरकार आले की त्याला रुळायला दाेन-चार महिन्यांचा काळ खूप असताे. त्यानंतर लाेकांची टीका सुरू हाेते आणि सहनशीलतेचा अंत हाेताे. वर्षभरापूर्वी लाेकांच्या ताेंडात ज्या आदराने ‘अच्छे दिन’ हा शब्द येत हाेता ताे सहा महिन्यानंतर मात्र विडंबनाचा विषय व्हायला लागला. आज संसदेत फिरताना भाजपच्या खासदारांना अन्य सदस्य किंवा पत्रकारही सहजतेचे अच्छे दिन असे म्हणून त्यांची टर उडवताना दिसतात आिण माेदींचे हे सैिनक स्माईल देत मुकाट्याने निघून जातात. अच्छे दिन हा शब्द कानावर येणे म्हणजे भाजपवाल्यांना आता शिवी वाटायला लागली. बघा एखाद्या शब्दाचे अवमूल्यन कसे हाेते त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. देशातील लाेकही आता दु:खी झालेले आहेत. त्यांना आधी हाेता तसाच महागाईशी सामना करावा लागताे आहे, कुठेही पैसे दिल्याशिवाय काम हाेत नाही; भ्रष्टाचारात तसूभरही फरक पडला नाही. शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.
नाेव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात पिकांचे नुकसान झाले त्याची मदत केंद्र सरकारकडून सहा महिन्यानंतर म्हणजे एप्रिलमध्ये दिल्या गेली. तेही काहींच्या खात्यात रक्कम जमा हाेते तर काहींना काॅंग्रेस सरकार सारखाच जुना अनुभव येताे. त्यांचे काेणी एेकायला तयार
नाहीत आणि त्यांचा काेणी पाठीराखाही नाही. जनधन याेजनेच्या नावाने प्रत्येकाचे खात उघडून स्टेशनरीचा भूर्दंड बँकांवर बसविण्याचे काम माेदींनी जरूर केले. ज्यांचे खाते उघडले ते शून्य रकमेवर. ते अजूनही तसेच रिकामे आहे. परंतु लाेकांना अद्यापही अपेक्षा आहे या खात्यांमध्ये प्रत्येकी १५ लाख रुपये जमा हाेतील. १०० दिवसांत हा पैसा येणार हाेता आता साडेतीनशे दिवस झालेत अद्याप नाव नाही. याेजना आयाेगाचे नाव बदलून नीती आयाेग करण्यात आले आहे. काही याेजनातील गांधी परिवारातील नावे काढून माेदींना भाजप परिवारातील लाेकांची किंवा अन्य नावे द्यावीशी वाटली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्राेल, डिझेलचे दर ठरतात माेदींचे सरकार आल्यानंतर ते कमी झाले, मात्र हे माझ्याचमुळे झाले अशी दवंडी फिटविण्यात माेदी कुठेही मागे नव्हते. आता झपाट्याने दर वाढले तेव्हा त्याला जबाबदार मी नाही असे सांगणारे माेदीच आहेत. माेदी कॅमेरापुढे येताना अद्यापही स्वप्न दाखवितात, पुन्हा थाेडा धीर धरा म्हणून सांगतात आणि गेले तीन महिने ते भूमी अधिग्रहण विधेयकावरून जराही मागे पाऊल घेणार नाही असा पवित्रा घेतात. मंगलयान प्रेिषत करताना आम्ही किती स्वस्तात ही माेहीम पार पाडली म्हणून माेदी विदेशात मिरवायला लागतात परंतु मंगलयान तयार काेणी केले त्याचा उल्लेखही ते करण्याचे टाळतात. प्रत्येक नवीन सरकारच्या नशिबात काही चांगल्या गाेष्टी असतात त्या म्हणजे आधीच्या सरकारने केलेल्या याेजना-कामाचे उद्घाटन करण्याचे भाग्य नव्या सरकारला मिळते. माेदी नशीबवान असल्याने त्यांना अनेक कामांचे श्रेय लाटण्याचा याेग आला परंतु हेच माेदी काॅंग्रेस किती भ्रष्टाचारी म्हणून विदेशात बाेलायला मागेपुढे पाहत नाहीत आणि स्वत:च्याच देशाची प्रतिष्ठा कमी करीत ‘मी नाही त्यातला’ म्हणून महात्मा बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. माेदींच्या सरकारला एक वर्ष झाले असे म्हणण्यापेक्षा केवळ चार वर्ष िशल्लक रािहलेत या अंगाने बघितले तर या सरकारने आतापर्यंत याैवनात यायला पाहिजे हाेते. परंतु माेदींचे रांगणेच अद्याप संपायचे आहे पुढच्या चार वर्षात चालायला लागणे, तारुण्यात येणे, संसार फुलविणे ही कामे करायची आहेत. मात्र, गती अशीच राहिली तर हा अवधी कमी पडेल आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे काम वांझाेटे असा ठपका त्यांच्यावर पडेल.
अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण शाैरी यांनी दाेन दिवसांपूर्वी माेदी केवळ बातम्यांमध्ये राहणारी व्यक्ती असून त्यांची अर्थव्यवस्था याेग्य नाही, अशी जहाल टीका केली. स्वत:च्याच घरातून झालेली ही टीका बरेच काही सांगून जाते!