आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’ले काय होणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम आदमी पार्टीने दिल्लीत सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेताच राजकीय पक्षांना, विशेषत: भाजपला पोटशूळ उठला आहे. माध्यमेदेखील या पक्षातील नकारात्मक घडामोडी टिपण्यासाठी जणू टपून बसली आहेत. सरकार स्थापन करून पाहा, अरविंद केजरीवाल यांना शपथ तर घेऊ द्या, आश्वासने पाळून दाखवा, अशी विधाने करून भाजप नेत्यांनी आदळआपट सुरू केली आहे. दुसरीकडे ‘आप’ने असा दावा केला आहे की ही एकमेव अशी निवडणूक आहे ज्यात घोडेबाजार झालेला नाही. या दाव्यात तथ्यही आहे. ‘आप’ने घोडेबाजाराची आणि प्रसारमाध्यमांना भाकिते करण्याची संधी दिली नाही. जे काही झाले ते अगदी उघड-उघड. काँग्रेसने पाठिंबा दिला तरी काँग्रेसच्या नेत्यांच्या भानगडी जगजाहीर करू, असे विधान करायला धाडस लागते आणि ते केजरीवाल यांनी दाखवले. इकडे ‘आप’चे एक आमदार विनोद बिन्नी हे कॅबिनेट मंत्रिपदासाठी हटून बसल्याची आवई उठून ‘आप’मध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या फुटल्या. केजरीवाल यांच्या शपथविधीच्या एक दिवस आधी काँग्रेसने दिल्लीतील सीएनजीचे दर वाढवून विघ्न आणण्याचे प्रयत्न केले.
उपराज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी एका साध्या ‘हॅचबॅक’ मोटारीतून कोणता भावी मुख्यमंत्री गेला होता? पहिल्या शपथविधीला जाण्यासाठी कोणत्या मुख्यमंत्र्याने रेल्वेची निवड केली होती? मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतरही सर्वसामान्यांप्रमाणेच राहणीमान जपणारा नेता कधी पाहिला होता? राहण्यासाठी मोठे बंगले नाकारण्याचे धाडस आजतागायत कोणी दाखवले होते? लाल दिव्याची गाडी आणि व्हीआयपी दर्जा कोणी नाकारला होता? इतके सगळे डोळ्यांना दिसत असूनही देशभरातील नेतेमंडळी बोध घेण्यास तयार नाहीत. त्यांच्या हातातील अंगठ्या आणि गळ्यातील सोनसाखळ्यांचे वजन वाढतच चालले आहे. दररोज त्यांच्या खासगी ताफ्यात महागड्या मोटारींची भर पडतच चालली आहे. अर्थात, आज आहे ते पद आणि सत्ता निवडणुकीपर्यंत पुरती उपभोगून घ्यावी, असा विचारही त्यांनी केला असावा. आम आदमी पार्टी हा पक्ष किंवा सत्ता मिळवण्यासाठी उभारलेली संघटना नव्हे. तो एक विचार आहे, प्रवृत्ती आहे. या विचाराला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्रात डॉ. विजय पांढरे यांच्यासारखी नि:स्पृह (प्रस्थापितांच्या भाषेत भाबडी) मंडळी सरसावली आहेत आणि राजकारण प्रामाणिकपणे, एक व्रत म्हणून करता येते, हे दाखवण्यास आता या विचाराने सुरुवात केली आहे. असाच विचार सोबत घेऊन महात्मा गांधी देश बदलायला निघाले होते आणि त्यांनी ते करून दाखवले, याचा त्यांचे नाव घेऊन राजकारण करणार्‍ यांना विसर पडला आहे. कालपर्यंत ज्या गोष्टी काल्पनिक, पुस्तकी आणि तात्त्विक वाटत होत्या, त्या देशाच्या राजधानीत सत्यात उतरल्या आहेत.


‘आप’ची ताकद फक्त दिल्लीत आहे, देशाच्या अन्य भागात त्यांचे ‘नेटवर्क’ नाही, आमच्याकडे पूर्वीसारख्याच निवडणुका होणार, पैशाचा धुरळा उडणार आणि आम्हीच पुन्हा सत्ता काबीज करणार, अशा आविर्भावात सर्वच पक्ष वावरत आहेत. दुसरीकडे ‘आप’च्या महाराष्ट्रातील मंडळींनी प्रामाणिक, कर्तव्यकठोर सनदी अधिकार्‍यांचा शोध सुरू केला आहे. त्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे उत्साहाची पातळी वाढली आहे. ज्याप्रमाणे दिल्लीतील काँग्रेसच्या संगीता लांबा यांनी ‘आप’ला जवळ केले, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही अनेक मंडळी या पक्षात जाण्यास उत्सुक आहेत. पहिल्या निवडणुकीत या पक्षाला दिल्लीसारखे यश मिळेलच, याची खात्री नसली तरी सामान्य माणसाने या निमित्ताने राजकारणात पाऊल ठेवले, तर या क्षेत्राच्या शुद्धीकरणाला मदत होऊ शकेल.


महाराष्ट्रात सत्तेची समीकरणे दिल्लीपेक्षा क्लिष्ट जरूर आहेत. विरोधी पक्ष म्हणून भाजप, शिवसेना आणि काही भागांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्रिय आहे. हे सर्व पक्ष गेल्या 13 वर्षांपासून सत्तेबाहेर आहेत आणि सत्तेविना कोणत्याही पक्षाला कार्यकर्ते, नेटवर्क सांभाळून ठेवणे अवघड जाते. ती स्थिती या विरोधी पक्षांच्या वाट्याला आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी 13 वर्षांपासून सत्तेत असले तरी अनेक कार्यकर्ते या सत्तेच्या सावलीबाहेर राहिले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात नाराजांची जंत्री मोठी आहे आणि ‘आप’ने सर्वच पक्षांतील प्रामाणिक नेते, कार्यकर्त्यांना आवतन दिलेले असल्यामुळे सर्वच पक्षांना धोका आहे. शिवाय, ‘आप’चे आव्हान निवडणुकीच्या तोंडावर उभे राहिल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांना आपलेसे करून घेण्याची संधीही सत्ताधार्‍यांना मिळण्याची शक्यता दुरावली आहे. त्यातच गैरव्यवहाराचा संशय असलेली प्रकरणे दडपण्याचे सत्र आदर्श घोटाळ्याच्या निमित्ताने सुरू झाले आहे. यातून काही मंत्री, पुढारी आणि अधिकारी खुश होणार असले तरी जनतेवर त्याचा काय परिणाम होईल, याचा विचार कोण करणार? हे प्रकरण अंगलट येईल अशी शक्यता लक्षात आल्यामुळे राहुल गांधी यांनी पुन्हा ते उकरून काढण्याचे आदेश दिले आहेत, पण ‘बूंद से गई वो हौद से नहीं आती’. त्यामुळे व्हायचे ते नुकसान झालेच आहे. सत्ता कायम राहावी यासाठी वर्षानुवर्षे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावण्याची लगीनघाई सत्ताधारी आता दाखवत आहेत. मग तो मराठा आरक्षणाचा प्रश्न असो, जादूटोणाविरोधी कायदा असो, वा जायकवाडीत पाणी सोडण्याचा. हे सर्व दिल्लीतील घडामोडींचे परिणाम आहेत, याबद्दल शंका नको. त्यामुळे ‘आप’चा धडा अगदी योग्य वेळी उघडला गेला आहे आणि तो महाराष्ट्रातही आपला प्रभाव दाखवणार आहे. त्यामुळे आप ले काय होणार यांची चिंता पुढार्‍यांना सतावत आहे.
dhananjay.lambe@dainikbhaskargroup.com