आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिक्टो बाळासाहेबांचा सवतासुभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ज्यांच्या नावामागे आता मराठी ‘हृदयसम्राट’ अशी बिरुदावली लावली जाते ते मनसेप्रमुख राज ठाकरे यांची राज्य दौ-यातील पहिली जाहीर सभा कोल्हापुरातील गांधी मैदानात झाली. पश्चिम महाराष्‍ट्र हा दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असताना राज यांच्या सभेला झालेली गर्दी ही अनेकांना तोंडात बोटं घालायला लावणारी आहे यात शंका नाही. परंतु सभेची गर्दी आणि पडणारी मते याची गणिते किती वेगळी असतात याचा अनुभव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राहून राज यांनीही घेतला आहे.कोल्हापुरातील सभेच्या आधीच्या संध्याकाळी हॉटेल पॅव्हेलियन येथे पत्रकारांशी चर्चा करताना राज यांनी आठवण सांगितली.

मराठीच्या मुद्द्यावर आमदार निवडून येत नसल्याने मला हिंदुत्वाचा मुद्दा उचलावा लागला, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यांच्याशी तुलना करण्याची माझी पात्रता नसतानाही एक वस्तुस्थिती सांगतो की, केवळ मराठीच्या मुद्द्यावर पहिल्या झटक्यात आमचे 13 आमदार निवडून आले. त्यामुळेच मी सरधोपटपणे विचार न करता वेगळ्या पद्धतीनं विचार करतो. शरद पवारांपासून सगळे जण आघाड्यांशिवाय पर्याय नाही असं म्हणत असले तरी मराठीच्या मुद्द्यावर मी सत्ता आणून दाखवतो, असा आत्मविश्वास राज यांनी या चर्चेमध्ये व्यक्त केला.

कोल्हापुरातील राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये रेल्वे परीक्षा, परप्रांतीयांचे रॅकेट कसे काम करते आणि मग ते नगरसेवक, आमदार, खासदार कसे होतात हे जुनेच मुद्दे होते.त्यांनी पहिल्या पंधरा मिनिटांतच कुणाशीही युती नाही आणि स्वबळावर महाराष्‍ट्र काबीज करायला निघालोय, असं सांगून राज्यभर ज्यांची ज्यांची उत्सुकता ताणली होती त्यातील हवा काढून टाकली.

ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा ऐकता आल्या नाहीत त्यांनी आता राज ठाकरेंच्या सभांना हजेरी लावली की, त्या सभांचा अंदाज येईल असं वातावरण त्यांच्या सभेवेळी पाहायला मिळालं. बाळासाहेब येणार म्हटले की, पदाधिका-यांमध्ये जी अदब असायची तीच अदब राज यांच्या दौ-या वेळी दिसून आली. सभा सुरू झाल्यानंतर मग उशिराची एन्ट्री. बोलायला उभे राहिल्यानंतरची आतषबाजी.

‘माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो,’ हे सहा शब्दांचं वाक्य उच्चारल्यानंतरचा दीर्घ पॉझ. कारण या वेळी टाळ्यांचा खच आणि शिट्यांचा पाऊस सुरू असतो. झेंडे लहरत असतात आणि मग भाषणाला सुरुवात.तशाच उपमा, तशाच नकला, तसेच खणखणीत इशारे आणि तसाच नमस्कार.विठ्ठल या भक्ताच्या अंगात किती भिनला आहे याचं प्रत्यंतर राज ठाकरे यांच्या बोलण्यातून, हालचालीतून जाणवत असतं. मात्र, राज यांनी तात्पुरत्या लढाईसाठी आघाड्यांचा साकव बांधण्यापेक्षा दीर्घकालीन युद्ध जिंकण्यासाठी भरभक्कम सेतू उभारण्याचा निर्धार केल्याचं मात्र या सभेनं स्पष्ट केलं आहे हे निश्चित.