आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dipak Patwe Article About Sharad Pawar Politics, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईश्‍वरलाल जैन आणि पवारांची रणनिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन वर्षांपूर्वीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत खासदारपुत्र मनीष जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात लढून निवडून आले. वास्तविक, पक्षाने माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल हे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार होते. पवारांनी मुद्दाम कच्चा उमेदवार त्या निवडणुकीत दिला होता, कारण पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतच तसे ठरले होते. तिथे भाजपने ऐनवेळी आपला उमेदवार रिंगणातून काढून घेतला होता आणि त्या बदल्यात जळगावातून निखिल खडसे यांचा मार्ग सोपा करून घेतला होता, अशी गणिते त्यावेळपासून मांडली जात आहेत. मात्र, खडसेंचा सोपा मार्ग मनीष जैन यांनी खडतर करून त्यांचा पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काहीच करू शकले नाहीत.
खासदार जैन यांना वारंवार सांगूनही मनीष जैन यांची माघार ते करवून घेऊ शकले नाहीत आणि त्यामुळे पवार कुटुंबीय त्यांच्यावर कमालीचे नाराज होते. ती नाराजी व्यक्त करण्यासाठी नाही नाही ते प्रकार पवारांनी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून मधल्या काळात करवून घेतले आहेत. तेच शरद पवार दोन महिन्यांपूर्वी जळगावला येऊन गेले. त्यावेळी त्यांची ईश्वरलाल जैन यांच्याशी, अशी वर्तणूक होती की जणू मधल्या काळात जे काही झाले त्याच्याशी पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचा काहीच संबंध नव्हता.
विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी जळगाव जिल्ह्यात ईश्वरलाल जैन हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. आता पुन्हा पवारांशी झालेल्या चर्चेनंतर आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार आल्याचे संकेत ते देऊ लागले आहेत. आपण सांगू त्यालाच पक्ष उमेदवारी देणार आहे, असे त्यांनी जाहीर भाषणांतूनही सांगितले आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी पक्षनेत्यांच्या सांगण्यावरून ज्यांचा आपण घोर अपमान केला त्यांच्याच दारी जायची वेळ आपल्यावर आली आहे या जाणिवेने स्थानिक राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघात विधान परिषदेचे अपक्ष सदस्य असलेल्या मनीष जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे, असे जैन पिता-पुत्र जाहीरपणे सांगताहेत. तसं झालं तर मनीष जैन यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला सांगितलं जाईल आणि रिक्त झालेल्या जागेवर आणखी एखादा नाराज कार्यकर्ता जोडता येईल, असे गणित पवारांनी मांडले असेल तर सांगता येत नाही. रावेर मतदारसंघात लेवा आणि मराठा या दोन जातीच्या मतदारांच्या प्रभावी संख्येमुळे त्यांचा विचार करून उमेदवार देण्याची प्रमुख राजकीय पक्षांची रणनीती राहिली आहे. त्यामुळे एका पक्षाने लेवा पाटील समाजाचा उमेदवार दिला की प्रतिस्पर्धी पक्ष मराठा समाजाचा उमेदवार देणार हे ठरलेले आहे. तरीही वारंवार लेवा उमेदवारच या मतदारसंघात निवडून येत असल्यामुळे कधी कधी तर दोन प्रमुख पक्ष लेवा समाजाचे उमेदवार देऊन रिंगणात उतरले आहेत. त्यामुळेच असेल, पवारांनी सहा महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत लेवा समाजाचा प्रभावी उमेदवार दिला पाहिजे, असे मत मांडले होते.
प्रभावी लेवा उमेदवार आपल्याकडे नाही आणि मराठा उमेदवार दिला तर तो सातत्याने पराभूत होतो आहे. त्यामुळे एक वेगळा प्रयोग करण्याचा विचार पवारांनी केला आहे, असे खासदार जैन सांगतात. अर्थात, हा प्रयोग कसा यशस्वी होईल हे त्यांनीच पवारांच्या गळी उतरवलं आहे, हे लपून राहिलेलं नाही. लेवा आणि मराठा यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत इतर समाजाच्या मतांचे केंद्रीकरण केले तर अल्पसंख्याक जैन समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, असे या प्रयोगामागचे संभाव्य अनुमान आहे. त्यामुळेच मनीष जैन यांना उमेदवारी मिळेल, असा विश्वास खासदार जैन यांना वाटतो आहे. अर्थात, वस्तुस्थिती काय आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
खरं तर शरद पवार जळगाव जिल्ह्यातल्या दोन्ही जागा लढवायच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे रावेर मतदारसंघ काँग्रेसने मागितला तर त्यांना अन्य एखाद्या सोयीच्या मतदारसंघाच्या बदल्यात तो द्यायची मानसिक तयारीही त्यांनी केली होती, पण काँग्रेसलाच हा मतदारसंघ नको आहे, असे चित्र समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या शब्दावर विश्वास ठेवत महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तोंडावर पडले आहेत. त्यामुळे आता जळगावच्या बाबतीत धोका पत्करायचा नाही, अशी सावध भूमिका घेत त्यांनी रावेर मतदारसंघ राष्ट्रवादीसाठीच सोडून दिला आहे.
दोन्ही प्रमुख विरोधकांची ही पराभूत मनोवृत्ती भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत सोयीची आहे. त्याचा लाभ घ्यायला तो केडरबेस पक्ष कमी पडणार नाही, असे वाटत असतानाच त्या पक्षातील सुंदोपसुंदीही समोर येऊ लागली आहे. विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांना तिसर्‍यांदा उमेदवारी दिली जाईल, असे एकनाथ खडसे सांगत असले तरी त्यांची अंतर्गत इच्छा आपल्या सुनेला उमेदवारी देण्याची आहे, अशी माहिती पक्षांतर्गत एक गट जाणीवपूर्वक पसरवतो आहे. उमेदवार बदलायचाच असेल तर अन्य कार्यकर्ता का नाही? खडसेंच्याच घरातील व्यक्ती का? असेही प्रश्‍न काही पदाधिकारी पडद्याआडून उपस्थित करीत आहेत. त्यामुळे ऐनवेळी स्वत: खडसेही उमेदवार असू शकतात, अशीही चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे खजिनदार असूनही गेली तीन वर्षे वाळीत टाकलेले राज्यसभा सदस्य ईश्वरलाल जैन यांना पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला. पवारांच्या या बेरजेमागे त्यांचं लोकसभा निवडणुकीचं चुकू पाहणारं गणित आहे, हे उघड आहे; पण हीच लोकसभा निवडणूक ईश्वरलाल जैन यांना पुन्हा वजाबाकीकडे नेते की त्यांच्या राजकीय आलेखाचा गुणाकार करते हे लवकरच समोर येणार आहे.