आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marahti Third Anniversary Prashant Damle Article About Marathi

मराठमोळे पदार्थ जतन करण्याचे मोठे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वचितच हॉटेलमध्ये जाणारा, खानावळीच्या पलीकडे हॉटेल न उभारणारा मराठी माणूस गेल्या वीस वर्षांमध्ये बराच बदलला आहे. हॉटेलिंगपासून हॉटेल व्यवसायापर्यंत मराठी माणूस आता पोहोचतो आहे, स्थिरावतो आहे. मात्र या बदलाचा वेग वाढायला हवा.
आपल्याकडे उदारीकरण रुजायला लागल्यानंतर महाराष्ट्रात खास कुठला बदल झाला असेल तर तो खाद्यसंस्कृतीमध्ये. खानावळ वा एखाद-दुसरे हॉटेल यापुरतेच अडकून पडलेले हॉटेलविश्व बदलत गेले. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी हाऊस वा कॅफे असे ठळक फरक मराठी माणसाला अजमावता येऊ लागले. शिवाय मॅकडी, फास्ट फूड कॉर्नर, केएफसी, इटालिअँनो, मेन लॅँड चायना यांसारख्या राज्याराज्यातील व काँटिनेंटल पदार्थ उपलब्ध करणार्‍या प्रकारांची आपल्याकडे वर्दळ वाढली. मेयॉनीज घातलेल्या बर्गरपासून ग्रिल्ड चिकनपर्यंतचे पदार्थ असोत वा मॅकव्हेज्जीपासून इटालियन पास्ता वा ऑथेंटिक हक्का नूडल्स असोत, सर्व प्रकारचे पदार्थ मराठी माणसाला शहरांमध्ये उपलब्ध व्हायला लागले. चायनीजमध्ये भारतीय मसाले घालत रस्तोरस्ती वडापावच्या बरोबरीने गाड्या दाखल झाल्या. या सगळ्यामुळे झाले काय, तर हॉटेल वा खाद्यपदार्थ व्यवसायात गेल्या दहा-पंधरा वर्षांत प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढली. आपल्याच राज्यात ‘येथे अस्सल महाराष्ट्रीयन जेवण मिळेल’, ‘येथे मराठमोळे पदार्थ मिळतील’, ‘वर्‍हाडी ठेचा, पिठलं भाकरी, भाजणीचं थालीपीठ, उकडीचे मोदक येथे मिळतील’ अशा पाट्या आपल्याला आज लावायची व बघायची वेळ आली आहे. पारंपारिक, मराठी पदार्थांचा पुन्हा ट्रेंड सुरू झाला असला तरी त्यात अप्रूपाचाच अधिक भाग आहे. या पदार्थांचे
इतर प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय पदार्थांच्या मानाने फारसे चांगले मार्केटिंग झालेले नाही. नाश्त्याला सांजा वा उपमा, साजूक तुपातला शिरा, पोहे, जेवणामध्ये गोड्या मसाल्याचे पदार्थ, बाजरीची, तांदळाची भाकरी असे पदार्थ उपलब्ध करणार्‍या हॉटेल्सना आपल्याच राज्यात खास ओळख निर्माण करण्यासाठी इतर हॉटेल्सबरोबर स्पर्धा करण्याची वेळ आली आहे. पंजाबी पदार्थ उपलब्ध करणार्‍या हॉटेल्सच्या तुलनेत मराठमोळया पदार्थांचे हॉटेल काढणे आपल्याकडे सध्या तरी अवघड झाले आहे. वाडा संस्कृती दर्शवणारी हॉटेल्स आपल्याकडे अलीकडे थाटली जातात. त्यातून भातुकलीपासून चुलीवरच्या भाकरीपर्यंत, ठेच्यापासून पिठल्यापर्यंतचे सगळे पदार्थ उपलब्ध होतात. पण अशी खाद्यसंस्कृतीतले मराठीपण जपणारी हॉटेल्स कमीच. कित्येकदा अमहाराष्ट्रीयन माणसांनी महाराष्ट्रीयन हॉटेल्स उभारल्याचे दिसते. थोडक्यात, शेट्टींच्या तुलनेत इथले मराठी लोक हॉटेल्स व खाद्यपदार्थांच्या बाबतीत कमीच पडतात अजूनही. त्यातही मराठी माणसाची खवय्येगिरी ही काँटिनेंटलकडे झुकलेली आहे.