आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमवीर गिरीमित्रांचा गाैरव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेडी माणसं इतिहास निर्माण करतात. वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. मग ते कुठलंही क्षेत्र असो. गिर्यारोहणाच्या क्षेत्रात तर पुरुषांच्या जोडीने महिलांनीही इतिहास निर्माण केला आहे. त्यात ऑस्ट्रियाच्या गर्लिंडे काल्टेनब्रुनरचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. १९९४ ते २०११ या काळात  तिने आठ हजार मीटर उंचीवरच्या १४ शिखरांवर कृत्रिम प्राणवायू आणि शेर्पा वा उंचीवरील भारवाहकांच्या मदतीशिवाय यशस्वी आरोहण केलं.  या १४ शिखरांपैकी सगळ्यात शेवटचं जे शिखर सर झालं ते होतं, के-टू हे जगातलं दुसऱ्या नंबरचं शिखर. या शिखरावर यापूर्वी तिने सहा वेळा चढाईचे प्रयत्न केले होते. सातव्या प्रयत्नात उत्तरबाजूकडून शिखर सर करण्यात तिला यश मिळालं. २३ ऑगस्ट २०११ ला तिने १४ शिखरं सर करण्याचा विक्रम पूर्ण केला. 
 
गशेरब्रम-१ हे काराकोरम पर्वतराजीतलं, ८०८१ मीटर्स उंचीवरचं शिखर चढत असताना, गर्लिंडेचा नवरा राल्फ युमोव्हिटस आणि अन्य दोन गिर्यारोहक तिच्याबरोबर होते. दुसऱ्या टीममधील अन्य तीन आणि जोस अँटोनिओ लोपेझ हा एकांडा गिर्यारोहकही शिखर चढत होता.  दुपारी १ वाजता गर्लिंडे आणि तिच्या सहकाऱ्यांनी शिखर सर केलं.  आता सुरक्षित उतरणं आवश्यक होतं. जास्त वजन नको म्हणून त्यांनी कोणीच एकमेकांना दोर बांधून घेतले नव्हते. त्यामुळे प्रत्येक जण विशेष खबरदारी घेऊन उतरत होता. इतक्यात, काही कळायच्या आत, गर्लिंडेच्या अगदी जवळून कोणी तरी वरून कोसळलं. क्षणभर ती जागीच  खिळली. राल्फनं धीर देऊन तिला नीट उभं केलं. त्या प्रसंगी जे कोणी पडलं त्याचा देह खाली सुमारे हजार फुटांवर दिसत होता. आता आणखीनच सावधपणे ते खाली उतरत होते. हळूहळू ते त्या पडलेल्या गिर्यारोहकापाशी आले. तो जोस अँटोनिओ लोपेझ होता.  राल्फनं त्याचे फोटो काढले आणि त्यावर बर्फ टाकून त्याला चिरनिद्रा दिली. गशेरब्रम शिखर सर केल्याचा आनंद विरून गेला... 
 
धवलगिरी हे आठ हजार मीटर उंचीच्या १४ शिखरांपैकी आठव्या क्रमांकाचं शिखर याची उंची ८१६७ मीटर, नेपाळमधल्या या शिखराचं दर्शन गर्लिंडेला अन्नपूर्णा-१ शिखर मोहिमेच्या वेळी झालं होतं. तेव्हापासून तिची इच्छा होती. ती धवलगिरी शिखर सर करण्याची, त्याप्रमाणे ती २००७ मध्ये धवलगिरी शिखराच्या तळाच्या कँपवर पोहोचली. या वेळी तिच्याबरोबर राल्फ नव्हता. एक स्पॅनिश टीम हे शिखर चढण्याचा प्रयत्न करणार होती. त्यातले काही जण तिच्या ओळखीचे होते. त्यांनी कँप-२ वर तंबू लावले होते. गर्लिंडे तिच्या तंबूत एकटीच होती. बाजूच्या तंबूत रिकार्डो आणि सँटी हे दोघे, तर जरा बाजूला तिसऱ्या तंबूत जाव्ही हा गिर्यारोहक होता. सकाळचा सुमार होता. बाहेर वादळ सुरू होते. अचानक तिचा तंबू घसरू लागला. नंतर तिच्या लक्षात अालं की, पाय हलवणं अवघड झालंय, आपल्या तंबूवर बर्फ जमा झालाय.  हिमस्खलनामुळे आपण घसरलेलो आहोत. तिने कसाबसा आपला उजवा हात हारनेसजवळ नेला. तिथे राल्फने भेट दिलेला एक चाकू होता. तो तिने दातांनीच उघडला. आपल्या तोंडासमोरचा तंबू फाडला. तसा थोडा बर्फ आत सांडला. तिने, तेथून आपला उजवा हात बाहेर काढून वरचा बर्फ झटकला. तसा तिचा हात त्यातून बर्फावर आला. तिला जरा हायसं वाटलं. तिने मग दुसरा हातही मोकळा करून घेतला आणि दोन्ही हातांनी बर्फ झटकला. तंबू आणखी फाडून ती त्यातून बाहेर आली. आता तिला तंबूतले बूट शोधायचे होते. हातांनीच बर्फ बाजूला करून तिने बूट बाहेर काढले. गॉगलही मिळाला. तिचं बाजूला लक्ष गेलं. बाजूचा तंबू दिसत नव्हता. काय झालं असावं, याचा तिला अंदाज आला. ती थोडी वरच्या बाजूस असलेल्या दुसऱ्या तंबूच्या जागी आली. आपल्या तंबूतलं फावडं तिने आणलं आणि ती तिथला बर्फ उकरू लागली. एकीकडे ती रिकार्डो आणि सँटीला हाका मारत होती. साधारण ५ ते ६ फूट खणल्यावर तिला त्यांचा तंबू लागला. तिने तो फाडला. पण खूप उशीर झाला होता. रिकार्डो आणि सँटी काही कळायच्या आत चिरनिद्राधीन झाले होते. तिसरा तंबू दिसत होता. तिने जोरजोरात जाव्हीला हाका मारल्या तसा तो तंबूतून बाहेर आला. जो भीषण प्रकार घडला. त्याचा अंदाजच त्याला नव्हता. सहकाऱ्यांच्या मृत्यूमुळे दोघेही सुन्न झाले होते...त्यांनी तळाच्या कँपवर झाला प्रकार कळवला आणि ते खाली निघाले. गर्लिंडेने ती मोहीम गुंडाळली. पण त्यानंतरच्या वर्षी तिने धवलगिरी-१ हे शिखर सर केलंच. अशी एकपेक्षा एक थरारक अनुभव गाठीला असलेली गर्लिंडे म्हणते, ‘शिखरं माझ्याशी बोलतात.  शिखर मला कौल देतं. माझा आतला आवाजही मला सांगतो. हे आव्हान पेलायचं. तसा कौल मिळाला की, मी एकाग्र  होऊन चढाई करते.’ 
 
गर्लिंडेचा जन्म ऑस्ट्रियातला (१३ डिसेंबर १९७०). वयाच्या १३ व्या वर्षापासून वडिलांबरोबर आणि फादर तिशलर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ट्रेकिंग आणि क्लायंबिंगला सुरुवात केली.  १९९४ मध्ये तिने प्रथमच काराकोरमला भेट दिली. त्या वेळी तिने ८०२७ मीटरचं ब्रॉडपिकचं फॉल्स समीट सर केलं. २००५ मध्ये एव्हरेस्ट सर करण्याच्या प्रयत्नात त्यांचा सहकारी  हिरो ताकेउची अत्यवस्थ झाला. शिखर जेमतेम ५०० मीटर राहिलं होतं. पण हिरोचा जीव वाचणं महत्त्वाचं होतं. दोघांनी मिळून हिरोला सुरक्षितपणे खाली उतरवलं. त्यानंतर पाच वर्षांनी गर्लिंडेनं एव्हरेस्ट शिखर कृत्रिम प्राणवायू आणि भारवाहकांशिवाय सर केलं.  
 
प्रत्येक मोहिमेत वेगळी, जीवघेणी आव्हानं तिने आजवर पेलली. आपल्या या सगळ्या मोहिमांचे अनुभव तिने ‘माऊंटन्स इन माय हार्ट’ या पुस्तकात लिहिले आहेत. ते जितके थरारक आहेत, तितकेच मार्गदर्शकही आहेत. गर्लिंडेला नॅशनल जिऑग्राफ्रिक सोसायटीतर्फे दिला जाणारा ‘अॅडव्हेंचरर ऑफ द इयर’ या २०१२ सालच्या किताबासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
 
मुंबईतील मुलुंड येथे नुकतेच गिरीमित्र संमेलन पार पडले. या संमेलनात ऑस्ट्रियाच्या जगप्रसिद्ध महिला गिर्यारोहक गर्लिंडे काल्टेनब्रुनर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अभय अाेक यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात अाले. तसेच इरा पंडित यांना जीवन गाैरव पुरस्कार देण्यात अाला.  कमांडर अभिलाष टाॅमी, श्रीनिवास गाेकुळनाथ यांनाही गाैरवण्यात अाले. जगातली १४ शिखरे सर करण्याचा विक्रम करणाऱ्या गर्लिंडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा  हा थोडक्यात वेध.
-मिलिंद आमडेकर 
बातम्या आणखी आहेत...