आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Special Report On Marathwada Drought

नको तो दुष्काळ : तीन साखर कारखान्यांचा पट्टा दोन वर्षे पडणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - आनंदगावातून पुन्हा टँकरची मागणी आल्याचं कळालं अन् जिवाला चटकाच लागला, माजलगाव तालुक्यातील सुपीक व सधन अशा गावांपैकी एक आनंदगाव. माजलगाव धरणाचा कालवा आणि सुपीक जमिनीच्या बळावर ऊस, कापसाचे भरघोस उत्पादन मिळवणार्‍या आनंदगावात एकेकाळी विहिरी तुडूंब भरून वाहतील इतके पाणी असायचे. अगदी उन्हाळ्यातही शेतांमध्ये पीके डोलत असायची मात्र आता दोन वर्षांपासून टँकर धावत आहेत.
एक काळ असा होता, आनंदगावात पेरणीआधी रानातलं पाणी काढून टाकण्यासाठी मजूर लावावे लागत होते. गावातल्या विहिरी उन्हाळ्यातही भरलेल्या असायच्या. टंचाई, दुष्काळ हे शब्द फक्त पेपरमध्ये वाचूनच माहिती होते. पण, दोन वर्षातच आमच्यावर पाण्यासाठी फिरण्याची वेळ आली, असे विश्वंभरराव थावरे म्हणाले. जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट अशी माजलगाव तालुक्याची ओळख. जवळपास 65 टक्के शेतकरी बागायतदार. त्यामुळे बारमाही पीकाचं उत्पन्न तर मिळतंच, उसाचा पैसाही खुळखुळू लागला.
33 वर्षांपूर्वी सन 1980 मध्ये माजलगाव धरण झालं अन् तालुक्याची पीकपद्धतही बदलली. ज्वारी, गहू, हरभरा, बाजरी अशी हंगामी पीकं घेणारे शेतकरी उसाकडे वळाले पाठोपाठ तीन साखर कारखानेही आले. मराठवाड्यातल्या एकूण 12 कारखान्यांना माजलगाव तालुक्यातून ऊस जातो. दरवर्षी सरासरी 20 लाख मेट्रीक टन उसाचं उत्पादन होत. मात्र या तालुक्यात सध्या प्यायलाच पाणी नाही. दुष्काळाच्या वरवंट्यामुळं दोन वर्ष तालुक्यातील तिन्ही कारखान्याचा पट्टा पडण्याची चिन्हे असून त्याचा केवळ शेतकर्‍यानाच नव्हे तर ऊसतोड मजूर, मुकादम, कारखान्याचे कर्मचारी आदींना फटका बसणार आहे.
आनंदगावच्या गावकर्‍याना वाटतं की, गावात सिमेंटचे रस्ते आले अन् पाण्याचे वांदे झाले. ‘आधी पंढरीत पडलेलं पावसाचं पानी रानात जमा व्हायचं, थोडं गावातच मुरायचं. तवा टंचाई बिंचाई काय न्हवतं. जिकडंतिकडं शिमेंट रस्ते झाले. आमालाबी ग्वाड वाटलं, शेणामुतातून जाताना नाकाला कपडा लावून रस्ते पार करावे लागायचे. चिखलाच्या र्‍याडबडीनं जीव वैतागायचा. रस्ते झाले अन् जीवाला गार वाटलं. आन आता ध्यानात यायला लागलयं की, रस्ते झ्याक झाले पन गावात पाणी मुरणं बंद झालं’, मोहनराव सोळंके म्हणाले, गावात शे-दीडशे वर्षांपूर्वीचे सात पुरातन आड आहेत. पंढरीतल्या प्रत्येकाचा शिणवटा त्यातला पाण्यानंच दूर पळायचा. आता दिवस उजाडला की पोरंसोरं आणि बाया हंडे घागरी घेऊन रानोमाळ हिंडतात. पाच-सात किलोमीटरच्या परिघात कुठल्याच विहिरीला पाणी दिसत नाही.
दर पाच वर्षांनी माजलगाव धरणात मासेमारीचा ठेका दिला जातो. त्याची किंमत 10 ते 15 लाखांच्या पुढेच असते. सध्या भातवडगावच्या शेख मुख्तार यांच्याकडे ठेका आहे. ते म्हणाले, 2010-11 मध्ये 40 लाखांचं मत्सबीज धरणात सोडलं. त्यातून 45 टनपेक्षा जास्त मासे मिळाले. रोहू, कटला, सायपरनेस,मु्रगल, मरळ, वाभंट आदी प्रकारच्या माशांना मुंबई, हैदराबादपर्यंत मागणी आहे. पण, 2011-12 आणि 2012 च्या सुरूवातीला सोडलेलं जवळपास 26 लाखांचं मत्सबीज पूर्णपणे वाया गेलं. मागणी वाढल्यामुळं मुद्दाम कोळंबी पण सोडली होती. पण, सगळे कष्ट पाण्यात गेले. पूर्ण मराठवाड्यात आमच्याकडे तयार झालेलं मत्सबीज जातं. 2010 पर्यंत दरवर्षी 10 कोटी नग आम्ही विकायचो. पण, आता तो व्यवसायही ठप्प आहे.
माजलगावात परतल्यावर चिंचगव्हाणचे रणजित उगले भेटले ते म्हणाले, आमचं 35 एकरं रान आहे. त्यातलं पाच एकरं कोरडवाहू. पाडवा चार-आठ दिवसांवर आलाय्. मागच्या वर्षी 60 हजार उचल देऊन सालगडी ठेवले. यंदा गडी 75 हजार मागायला लागलेत. आधीच पाण्याची बोंब, त्यात गडी मानायला तयार न्हाईत. औंदा कसं करायचं, याच चिंतेनं काळीज पोखरून काढलंय्. माजलगाव तालुक्यात जालना, परभणी जिल्ह्यातून जवळपास दोन हजार शेतमजूर येतात. यंदा पाणीच नसल्यामुळं गडी ठेवायचे कसे, हा प्रश्न आहे.