नरेंद्रभाई म्हणाले होते, भ्रष्टाचार, महागाई यामुळे देशातील जनता कंटाळली आहे. काँग्रेसमुक्त भारत केल्याशिवाय देशाचा विकास नाही. त्यांच्या या हाकेला देशातील जनतेने ओ दिला. यंदा देशाच्या इतिहासात सर्वात मोठे स्थित्यंतर घडले.
स्वतंत्र भारतात आतापर्यंत लोकसभेच्या 16 निवडणुका झाल्यात. प्रारंभीच्या काळात म्हणजे 1952 पासून तर 1971 पर्यंत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळत गेली. 1977 ते 80 या काळात जनता पार्टीचे सरकार हा काळ आणि रालोआ सरकारची सहा वर्षे वगळली तर संपूर्ण काळात काँग्रेसचीच सत्ता केंद्रात होती. लोकांची मानसिकता ही काँग्रेसची झाल्याने भारतीय जनता पार्टीला पाय रोवण्यासाठी आणि विशेषत: अन्न, वस्त्र, निवारा आणि जगासोबतची स्पर्धा या बाबी मांडताना बरेच कष्ट उपसावे लागले. तब्बल सहा वर्षे एनडीएच्या सरकारने देशात उत्तम कामगिरी केल्याचे दिसून येते. देशातील राजकारणात जे विलक्षण बदल झाले तो 2014 च्या लोकसभा निवडणुकांचा काळ हा स्थित्यंतराचा म्हणावा लागेल. 1984 सारखी पाठीशी अशी कोणतीही संवेदनशील घटना नव्हती. मात्र, या वेळी लोकांच्या मनात आक्रोश होता, चीड होती. 2004 ला काँग्रेसचे लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आले. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असले तरी सरकार चालविण्याची सूत्रे त्यांच्या हाती असल्याचे दिसून आले नाही. 2009 मध्ये भाजपने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात निवडणुका लढविल्या, परंतु आम्हाला त्यात यश मिळाले नाही. मात्र, 2009 ते 2014 हा काळ कॉँग्रेसला उतरती कळा लागण्याचा असल्याची नोंद इतिहासात होईल. या काळात भ्रष्टाचाराचे विश्वरेकॉर्ड झाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, 2जी घोटाळा, आदर्श घोटाळा, कोळसा ब्लॉक्स घोटाळा, महागाई, बेरोजगारी आदींनी कधी नव्हे इतका कळस गाठला. देशातील जनतेच्या सहनशीलतेपलीकडच्या या बाबी होत्या. त्यांना बदल पाहिजे होता. याच काळात गुजरातचा विकास देशासाठी लक्षवेधी ठरला. नरेंद्र मोदी 2001 पासून 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींच्या विकासकामाचा झंझावात देशातील लोकांना भावला. कॉँग्रेसला पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या नावावर देशाने शिक्कामोर्तब केले. काँग्रेसचा यात दारुण पराभव झाला. अवघ्या 44 जागांवर कॉँग्रेसला नेऊन ठेवले. देशात ‘नॉन कॉँग्रेस गव्हर्नमेंट’ आणि राष्ट्रीय व्यासपीठावर मजबूत पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी असो की देशाचा कोणताही भाग असो, भाजप आज सर्वव्यापी झाला आहे. भाजपने सातत्याने विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळे राजकीय बदल हा वावटळासारखा नसेल तर दीर्घकाळ टिकणारा असेल. वास्तविक स्थित्यंतर घडण्यास महागाई, भ्रष्टाचार जसा कारणीभूत आहे तसाच तो बदलत्या काळाच्या, नवा पिढीच्या आकांक्षांचेही प्रतीक आहे. ‘परफॉर्म ऑर पेरिश’ ही तरुणाईची मानसिकता, अँटिट्यूड आहे. आजकालची पिढी जगण्याचा ‘अँटिट्यूड’ पाहते. ती मोदींमध्ये आहे. खंबीर, करारी आणि निर्णयक्षमता या त्यांच्या गुणांनी तरुणांना आकर्षित केले. त्यामुळे हा बदल लोकांचा विश्वास संपादन करणारा असेल. विकासाबाबतची चिकाटी आकर्षित करणारी ठरली. भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले त्याच दिवशी ‘अच्छे दिन आने वाले हैं’ ची चाहूल लागली.आता या देशात ‘अच्छे दिन आ गये हैं’. या राजकीय स्थित्यंतरामुळे देश जगातील शक्तिशाली राष्ट्र म्हणून अल्पावधीतच नावारूपास येईल.