आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोबोट आणणार किराणा सामान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भविष्यात तुम्हाला वस्तू, किराणा सामान हवे असेल तर ते तुमच्यापर्यंत कोण पोहोचवणार? वास्तविक अॅमेझॉन, गुगलने ड्रोनच्या माध्यमातून किराणा सामान घरी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत; पण आता तुम्हाला रोबोटच्या माध्यमातून वस्तू घरपोच मिळू शकणार आहेत. या रोबोटचे नाव आहे गीता. वेस्पा या प्रसिद्ध स्कूटरचे उत्पादन करणाऱ्या पियाजिओ कंपनीने हा रोबोट तयार केला आहे. गीतामध्ये एक सिलिंडरसारखा ड्रम तयार केला असून त्यामध्ये सामान ठेवले जाते. 
 
हा रोबोट ताशी ३५ किमी वेगाने चालू शकतो; पण वास्तवात गीता आपला मालक ज्या गतीने चालतो त्याच्या एवढ्या वेगाने मागे एक-दोन मीटर चालतो. ग्राहकाला एक इलेक्ट्रॉनिक बेल्ट दिला जातो व त्याच्याद्वारे रोबोटवर नियंत्रण केले जाते. बेल्टमध्ये स्टिरियोस्कोपिक कॅमेरा असतो तो रोबोटला मार्ग दाखवतो.
 
गीता १८ किलो वजन नेऊ शकतो व त्याला दर ८ तासांनी चार्ज करावे लागते. हा रोबोट प्रत्यक्ष दुकानात जाणाऱ्या व ऑनलाइनद्वारे बाजारहाट करू न इच्छिणाऱ्या ग्राहकांना फायद्याचा आहे. वास्तविक हा रोबोट ऑनलाइन बाजारहाट करणाऱ्यांसाठीसुद्धा फायद्याचा आहे. कारण हा रोबोट कॅमेरा, नकाशा व अल्ट्रासॉनिक सेन्सर यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवू शकतो. 
 
पियाजिओने अमेरिकेत एक डझन गीता रोबोट कार्यरत केले आहेत. हे रोबोट कामगारांना साहित्य देतात, विमानतळांवर प्रवाशांना दिशादर्शन करतात व वस्तूंच्या ने-आणीसाठी वापरले जात आहेत. असे रोबोट तयार करणारी पियाजिओ ही एकमेव कंपनी नाही. स्काइपचे संस्थापक अहती हिनला व जानुस फ्रिस यांची एस्तोनिया कंपनीच्या स्टारशिप टेक्नॉलॉजी या कंपनीनेही अशा रोबोटची निर्मिती केली आहे. स्टारशिपच्या रोबोटला सहा चाके असून तो १० किलो वजन उचलू शकतो व सहा किमी प्रतितास चालू शकतो. हा रोबोट कॅमेरा व सेन्सरच्या द्वारे काम करतो व वर्दळीतून रस्ताही पार करू शकतो.
 
स्टारशिपने युरोपमधील काही शहरे, वॉशिंग्टन, सिलिकॉन व्हॅलीमध्ये किराणा वस्तूंच्या डिलिव्हरीकरिता रोबोट तैनात केले आहेत. या कंपनीच्या मते त्यांचे आजमितीला रोबोट हजारो किमी चालले आहेत व लाखो लोकांना भेटले असून एकही दुर्घटना घडलेली नाही. सध्या रोबोट चालवण्यासाठी एक व्यक्ती लागते व भविष्यात एक व्यक्ती ऑनलाइन १०० रोबोट चालवू शकेल यावर संशोधन सुरू आहे.  
 
पण रोबोटच्या रचनेबाबत एक समस्या आहे. रस्त्यांवर चालण्यासाठी नियम असतात. रस्त्यांचे पदर, सिग्नल वाहतुकीवर नियंत्रण ठेवत असतात. फुटपाथावर लोक चालत असतात, कुत्री व अन्य जनावरेही चालत असतात. अशा वेळी  रोबोटना मर्यादा येतात; पण रोबोट माणसाचे वर्तन शिकू शकतात व काम करू शकतात.
बातम्या आणखी आहेत...